जनतेशी नाळ तुटलेल्या महाराष्ट्रातील वासनिकांना राज्यसभेची संधी दिल्याने नाराजी | congress mukul vasnik rajyasabha election candidate unrest in party | Loksatta

जनतेशी नाळ तुटलेल्या महाराष्ट्रातील वासनिकांना राज्यसभेची संधी दिल्याने नाराजी

पक्षाने कार्यकर्त्यांशी आणि जनसामान्यांशी नाळ तुटलेल्या वासनिक यांना संधी दिल्याने पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

mukul vasnik congress
मुकुल वासनिक यांना काँग्रेसची राज्यसभा उमेदवारी (फोटो – एएनआय)

राजेश्वर ठाकरे

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संपर्कात नसलेले काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, राज्यात पक्ष बळकट करण्यासाठी सक्रिय नेत्याची गरज असताना निष्क्रिय वासनिकांना पद देऊन पक्षाने काय साधले असा सवाल कार्यकर्ते करू लागले आहेत.

काँग्रेसने सरचिटणीस मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. वासनिक विद्यार्थी दशेपासून काँग्रेससोबत आहेत. त्यांनी बुलढाणा आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु त्यांच्या लोकसभेत जाण्याने या दोन्ही मतदारसंघात पक्ष वाढल्याचे दिसून येत नाही. उलट ते दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेले असून तेथे शिवसेनेचे खासदार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात ते १८८० पासून ते १९९९ पर्यंत खासदार राहिले आहेत. ते लोकसभेत असताना बुलढाणा जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काही प्रयत्न नसल्याची टीका तेथील जुनेजाणते कार्यकर्ते आजही करतात. रामटेक लोकसभा मतदार संघातून निवडून गेल्यावरही येथे बुलढाण्याचीच पुनरावृत्ती झाली. उलट येथे शिवसेना वाढीस लागली. सध्या येथे शिवसेनेचा खासदार आणि आमदार आहे. वासनिक यांनी १९९३ ते २०१२ या काळात केंद्रात मंत्रीपद भूषवले. पण त्याचा ना मतदारसंघाला फायदा झाला ना पक्ष बळकटीसाठी उपयोग झाला. ते कायम दरबारी राजकारणी राहिले आहेत. भाजपच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यानंतर काँग्रेसची सर्वत्र धुळधाण होत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षवाढीस लाभदायक ठरेल अशा नेत्यांना संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र पक्षाने पुन्हा कार्यकर्त्यांशी आणि जनसामान्यांशी नाळ तुटलेल्या वासनिक यांना संधी दिल्याने पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विक्रमी मताधिक्यात महाराष्ट्रातील भाजप नेत्याचा हातभार

वासनिक यांचे नागपुरात गांधीनगरमध्ये निवासस्थान आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क नसल्याने, लोकांमध्ये मिसळत नसल्याने त्यांनी येथून महापालिकेची निवडणूक लढली तरी त्यांना यश मिळण्याची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया येथील पक्षाचे कार्यकर्ते देतात. यावरून वासनिकांचे नागपूरच्या राजकारणातील स्थान लक्षात येते. केवळ गांधी घराण्याशी एकनिष्ठता हेच त्यांचे राजकारणातील बलस्थान ठरले असून त्या आधारावरच त्यांना काँग्रेसची सत्ता असताना मंत्रिपद आणि सत्ता नसताना राज्यसभेची संधी मिळाली आहे, प्रामाणिक व पक्षासाठी झटणाऱ्या सक्रिय नेत्यांवर हा एकप्रकारचा अन्यायच असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे.

सोलापूर : सक्षम नेतृत्वाअभावी सोलापूरच्या ‘विकासा’ची राजकीय चोरी

दरम्यान, वासनिक यांना महाराष्ट्रातून विरोध आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर न पाठवता त्यांना राजस्थानमधून संधी देण्यात आली आहे. यासंदर्भात विचारले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यभेच्या निवडणुकीत मतफुटाचा धोका नसतो. त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे, असे चव्हाण म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2022 at 14:24 IST
Next Story
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विक्रमी मताधिक्यात महाराष्ट्रातील भाजप नेत्याचा हातभार