ठाणे : लैंगिक अत्याचाराविरोधात जे रस्त्यावर उतरतात. त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. तर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना सरकार संरक्षण देत आहे. अशा सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केली. तसेच मुख्यमंत्री हरवले आहेत असे फलक लावण्याचीही वेळ आली आहे असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेसच्या वतीने ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचा प्रकार झाला. त्यांनी प्रथम पीडित मुलींच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला हवी होती. परंतु घटनेच्या १० दिवसानंतरही एकनाथ शिंदे यांनी तेथे जाण्याचा विचार केला नाही. जे नागरिक आंदोलन करून न्याय मागत होते. त्यांना तुम्ही राजकीय आंदोलन म्हणता असा आरोप श्रीनेत यांनी केला. मुख्यमंत्री साताऱ्यात आलिशान जीवन जगत आहे. तर फडणवीस दिल्लीत त्यांच्या वरिष्ठांना खूष करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशात फिरण्यासाठी वेळ आहे, पण माणिपूरला जायला वेळ नाही, असेही श्रीनेत यांनी सांगितले.