-प्रबोध देशपांडे

राज्यात अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर आता २०२४ च्या दृष्टीने नेत्यांची तयारी सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी कुठला पक्ष योग्य ठरेल, यासाठी नेत्यांची चाचपणी सुरू आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्याचा विचार केल्यास बहुतांश विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजपच्या प्रस्थापित नेत्यांमुळे एक-दोन अपवाद वगळता तिन्ही जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुक भाजप प्रवेश करण्याच्या विचारापासूनच लांब आहेत. भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा तीव्र असल्याने नव्यांना संधी मिळणे कठीण झाले हे त्यामागचे कारण आहे.

जळगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सध्या तरी भाजपपासून दूर

राजकीय भूकंपानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर पक्ष संघटन मजबूत करून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यावर पक्ष नेतृत्वांनी जोर दिला आहे. या निवडणुकांसाठी इच्छुकांनी देखील आतापासून तयारी सुरू केली आहे. आगामी राजकीय परिस्थिती लक्षात घेता कुठला पक्ष निवडून येण्यासाठी पोषक ठरेल, या दृष्टीने इच्छुकांकडून विचार सुरू आहे. पश्चिम वऱ्हाडात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली. दोन्ही पक्ष गटातटात विभागलेले आहेत. शिंदे गट फुटल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची रांग –

अकोला जिल्हा भाजपचा गड आहे. विधानसभेच्या पाचपैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदारही युतीत निवडून आले आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघातून गोवर्धन शर्मा सलग सहाव्यांदा विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी आता निवडणूक न लढण्याचा विचार केला तरी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना संधी मिळण्याची शक्यता दिसत नाही. विधानसभेतील जिल्ह्यातील इतर तीन भाजपचे आमदारही अनेक वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये देखील बाहेरच्या इच्छुकांसाठी दारे बंदच आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची रांग लागली आहे. शिंदे गटात सहभागी झालो तरी महापालिका निवडणुकीत संधी मिळणार की नाही? अशी साशंकता असल्याने शिवसेनेतील पदाधिकारी व नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

सत्तांतरामुळे सांगलीत राष्ट्रवादीच्या भरतीला ब्रेक; प्रवाह पुन्हा भाजपाच्या दिशेने

राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत ठाकरे हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा –

वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत ठाकरे हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या भाजप नेत्यांच्या वाशीम जिल्हा दौऱ्यात चंद्रकांत ठाकरे त्यांचे स्वागत करताना दिसले. त्यामुळे ठाकरे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना अधिक जोर आला. कारंजा मतदारसंघातून चंद्रकांत ठाकरे इच्छुक आहेत. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे राजेंद्र पाटणी करीत आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्यासाठी नवी वाट देखील बिकट ठरू शकते. सध्या हा विषय थंडबस्त्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यात चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार श्वेता महाले व काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. एकमेकांना अडचणीत आण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू असतात. मध्यंतरी राहुल बोंद्रे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, बदलेल्या राजकीय परिस्थितीनुसार आता हा मुद्दा मागे पडला आहे. इतर मतदारसंघांमध्ये प्रस्थापितांच्या प्रभावामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील कुठलाही मोठा नेता भाजपच्या संपर्कात नसल्याचे चित्र आहे.