scorecardresearch

गौतम अदाणी प्रकरणावरून विरोधक आक्रमक; थेट ईडी मुख्यालयावर मोर्चा!

काँग्रेससह अन्य विरोधकांनी गौतम अदाणी प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत मोदी सरकारला कोंडीत पडकण्याचा प्रयत्न केला.

opposition protest
विरोधकांनी मोर्चा काढला (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम, काँग्रेस ट्विटर खाते)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये मोदी सरकार आणि भारतीय लोकशाहीबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद संसदेत उमटले. राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात माफी मागवी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. तर उत्तरादाखल काँग्रेससह अन्य विरोधकांनी गौतम अदाणी प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत मोदी सरकारला कोंडीत पडकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील खासदारांनी दिल्लीतील सक्तवसुली संचालनालयाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या मोर्चामध्ये एकूण १८ विरोधी पक्षांचे खासदार सामील झाले होते, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

हेही वाचा >> कर्नाटक, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी BRS चे प्लॅनिंग काय? के कवितांनी सांगितले; म्हणाल्या “अनेक नेते…”

तृणमूल काँग्रेस मोर्चापासून दूर

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज दिल्लीमधील ईडी मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या मोर्चाच्या माध्यमातून जनतेचे लक्ष हिंडेनबर्ग रिपोर्ट, गौतम अदाणी आणि भारतीय आयुर्विमा मंडळ (एलआयसी) प्रकरणाकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तृणमूल काँग्रेसचे खासदार मात्र या मोर्चामध्ये सामील झाले नाहीत. अदाणी समूहावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. ही मागणी करणाऱ्या विरोधकांमध्येही तृणमूल काँग्रेसचा समावेश नाही.

हेही वाचा >> भाजपाला बिहारमध्ये हवे आहेत नवे सहकारी; केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देऊन नवे सहकारी जोडण्याचा प्रयत्न

सरकार आम्हाला मोर्चा काढू देत नाही

आज काढण्यात आलेल्या मोर्चाविषयी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही सर्व जण सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र आम्हाला रोखण्यात आले आहे. सरकार आम्हाला मोर्चा काढू देत नाहीये. देशातल्या एका व्यक्तीने एलआयसी, एसबीआय तसेच अन्य बँकांना नेस्तनाबूत केले. लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे त्यांनी या बँकांमध्ये टाकले होते. मात्र हे सर्व पैसे एका माणसाच्या हातात गेले,” असे खरगे म्हणाले.

हेही वाचा >> जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्रात १७ लाख कर्मचारी संपावर, शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत; विरोधक आक्रमक!

गौतम अदाणी यांना पैसे कोण देते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून गौतमी अदाणी यांना संरक्षण दिले जात आहे, असा आरोपही खरगे यांनी केला. “गौतम अदाणी यांना कोण पैसे कोण देतं. अशा प्रकारे पैसे उभारण्यास अदाणी यांना कोण परवानगी देत आहे? याची चौकशी व्हायला हवी. मोदी आणि अदाणी यांच्यात काय संबंध आहे; याचीही चौकशी केली पाहिजे,” अशी मागणीही खरगे यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 20:50 IST