गुजरात भाजपाचा बालेकिल्ला आहे. परंतु, एकदा भाजपा नेत्याच्याच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे गुजरातमधील क्षत्रिय समाज रस्त्यावर उतरला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे राजकोट येथील उमेदवार पुरुषोत्तम रूपाला यांनी क्षत्रिय समाजाविरोधात एक वक्तव्य केले होते; ज्यामुळे त्यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये, त्यांचे तिकीट परत घ्यावे, अशी क्षत्रिय समाजाची मागणी होती. मात्र, १६ एप्रिलला रूपाला यांनी आपला निवडणूक अर्ज भरला. गुजरातमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या तिकिटासाठी मतभेद असल्याच्या चर्चा अलीकडे सुरू होत्या; मात्र राजकोटमध्ये याच विरोधाचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने रूपाला यांच्या जुन्या प्रतिस्पर्ध्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

९ एप्रिलला काही स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते अमरेली येथील परेश धनानी यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पुरुषोत्तम रूपाला यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची विनंती केली. आपल्या वक्तृत्व कौशल्यासाठी ओळखले जाणारे धनानी म्हणाले की, जर रूपाला यांनी तिकीट परत दिले नाही, तर ते त्यांच्या जुन्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरतील. क्षत्रियांचे रूपाला यांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असताना त्यांनी १६ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रूपाला यांनी अर्ज दाखल केल्यावर धनानीदेखील त्याच दिवशी प्रचारासाठी मैदानात उतरले आणि त्यांनी शुक्रवारी (१९ एप्रिल) आपला अर्ज दाखल केला. “पाटीदार केवळ त्यांच्या समुदायाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. धनानी हे काही सौम्य स्वभावाच्या पाटीदारांपैकी आहेत. ते जातीयवादी नाहीत आणि म्हणूनच त्यांची उमेदवारी बिगर-पाटीदारांनादेखील मान्य आहे,” असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

काँग्रेस नेते परेश धनानी (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : “अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव

कोण आहेत परेश धनानी?

परेश धनानी यांनी १९८९ मध्ये शिक्षण सुरू असतानाच राजकारणात प्रवेश केला होता. “काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते संजय गजेरा यांनी सांगितले की माझे हस्ताक्षर चांगले आहे. त्यामुळे १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते मला काँग्रेसच्या कार्यालयात मतदारांच्या स्लिप लिहिण्यासाठी घेऊन गेले. तेव्हापासून मी राजकारणात आहे,” असे परेश धनानी म्हणाले, अमरेली येथील माजी काँग्रेस खासदार नवीनचंद्र रवाणी आणि मनू कोटाडिया यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.

कॉलेजमध्ये असताना, धनानी यांनी अमरेलीच्या स्टुडंट्स कल्चरल ग्रुपची स्थापना केली. हा ग्रुप विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करायचा. १९९७ मध्ये त्यांनी परिवर्तन ट्रस्टची स्थापना केली. ही संस्था ते अजूनही चालवतात. त्यानंतर काँग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)च्या अमरेली जिल्हा युनिटचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

२००२ मध्ये काँग्रेसने त्यांना अमरेलीमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी तिकीट दिले आणि नरेंद्र मोदींच्या राज्य मंत्रिमंडळातील गुजरातचे कृषिमंत्री रूपाला यांच्याविरोधात त्यांना उभे करण्यात आले. “अमरेलीला काँग्रेसने अंतर्गत ‘क’ गटात वर्गीकृत केले होते. कारण- १९७२ पासून पक्षाला ही जागा जिंकता आली नव्हती. परंतु, आम्ही ती निवडणूक जिंकण्यात यशस्वी झालो,” असे धनानी म्हणाले. जेव्हा त्यांनी तीन वेळा आमदार राहिलेल्या रूपाला यांचा पराभव केला तेव्हा ते २६ वर्षांचे होते.

पराभवानंतर रूपाला यांनी पुढील २१ वर्षे निवडणूक लढवली नाही. ते राज्यसभा सदस्य झाले. त्यासह ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री होते. “रूपाला त्यांच्या निवडणूक सभेत म्हणायचे की, परेश हा अजून लहान आहे आणि जोपर्यंत तो अमरेली विधानसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या ७२ गावांचा दौरा पूर्ण करील, तोपर्यंत निवडणूक संपलेली असेल. परंतु, आमच्याकडे सुमारे १० हजार विद्यार्थ्यांची फौज होती; ज्यांनी रूपाला यांच्याविरोधात सभा घेतल्या आणि त्यांचा पराभव झाला,” असे धनानी यांचे धाकटे बंधू शरद म्हणाले.

धनानी हे पाटीदारांच्या ल्युवा पटेल या उपजातीतील आहेत. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासून अमरेलीतील प्रबळ राजकीय व्यक्तिमत्त्व आणि रूपाला यांचे जवळचे मित्र भाजपाचे दिलीप संघानी यांच्याकडून ते निवडणूक हरले. पाच वर्षांनंतर धनानी यांनी संघानी यांचा पराभव करून २००७ च्या पराभवाचा बदला घेतला. संघानी तेव्हा मोदी यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळातील कृषिमंत्री होते.

यश आणि अपयश

काँग्रेसने धनानी यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपवली; जिथे त्यांनी २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधी महागठबंधनाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील वर्षी त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी समन्वयक म्हणूनही काम केले; ज्यामध्ये काँग्रेसने ४४ जागांवर विजय मिळविला.

पाटीदार आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत धनानी हे राज्यातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून उदयास आले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने गुजरातमध्ये ८२ जागा जिंकल्या. ही गोष्ट दोन दशकांहून अधिक काळातील गुजरातमध्ये पक्षाचे सर्वोत्तम प्रदर्शन मानली जाते. पण, तरीही ते बहुमताच्या तुलनेत नऊ जागांनी कमी पडले. भाजपाची संख्या ९९ वर आली. १९९५ नंतर भाजपा पहिल्यांदाच इतक्या कमी जागांवर निवडून आली होती. धनानी यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते १९८५ मध्ये चिमणभाई पटेल यांच्यानंतर गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे पहिले पाटीदार बनले.

पाटीदार कोटा आंदोलनामुळे काही गोष्टी बदलल्या. काँग्रेस आणि धनानी यांच्यासाठी निवडणुकीत विजय मिळविणे कठीण झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमरेलीचे खासदार नारन कछाडिया यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कारण- भाजपाने दुसऱ्यांदा राज्यातील सर्व २६ लोकसभा जागांवर विजय मिळवला होता. डिसेंबर २०२१ मध्ये अमरेलीमधून विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा : ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित

या पराभवानंतर धनानी अमरेली येथील गीर जंगलाच्या सीमेवरील आपल्या शेतात वेळ घालवतात. या महिन्याच्या सुरुवातीला धनानी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या वेळेची गरज असल्याने त्यांनी ही लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. २००२ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर दोन दशकांहून अधिक वर्षांनी रूपाला यांच्याशी लढण्याचे आवाहन पक्षाने त्यांना केले, असे त्यांनी सांगितले.