पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपाने आता आपले लक्ष्य आगामी निवडणुकांकडे वळवले आहे. २०२७ मध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार असून पक्षाकडून सहा राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते, त्याविषयी…
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. केरळ वगळता इतर राज्यांमध्ये पक्षाला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आली नाही. हीच बाब लक्षात घेता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने आता विविध राज्यांतील पक्ष संघटना तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतील फेरबदलाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वात मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. पंजाब काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांच्याऐवजी राज्याची सूत्रे जालंधरचे खासदार व माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्याकडे देण्यात यावी, अशी मागणी पक्षातील एका गटाकडून केली जात आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली. या अपयशामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद आणखीनच उफाळून आले आहेत. त्यामुळेच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. काँग्रेस पक्षाकडून आगामी काळात सहा राज्यांमधील नेतृत्वाबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याशिवाय राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनी दिली आहे. केरळमध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सनी जोसेफ यांचा व्ही. डी. सतीशन सरकारमध्ये मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पदासाठी जातीय, सामाजिक आणि गटबाजीची समीकरणे महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.
लोकसभा खासदार कोडिकुन्नील सुरेश, बेनी बेहानन आणि अँटो अँटनी यांच्यासह यूडीएफचे संयोजक अदूर प्रकाश आणि ज्येष्ठ नेते जोसेफ वाझॅकन यांची नावे चर्चेत आहेत. केरळमधील काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांनी मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकारी निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या असून या पदासाठी जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे. या शर्यतीत लोकसभेचे खासदार कोडीकुन्नील सुरेश, बेनी बेहानन आणि अँटो अँटनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. आठ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले कोडिकुन्नील सुरेश यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, पक्षाने यावेळी दलित समाजातील नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी द्यावी, तर दुसरीकडे- राज्यातील ख्रिस्ती समाजाने काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे आणि भाजपाने या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपली संपर्क मोहीम वाढवली आहे. हीच बाब लक्षात घेता जोसेफ यांच्यानंतर ख्रिश्चन नेत्यालाच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जावी, अशी मागणी काही नेत्यांकडून केली जात आहे.
तमिळनाडूमध्ये के. सेल्वापेरुन्थगाई यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व नाराज असल्याचे समजते, त्यामुळे त्यांना पदावरून हटवले जाणे निश्चित मानले जात आहे. तर कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज असलेले डी. के. शिवकुमार यांच्या जागी कोणाची निवड करायची हा निर्णय आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाशी जोडलेला आहे. सिद्धरामय्या सरकारमधील मंत्री सतीश जारकीहोळी हे या शर्यतीत आघाडीवर मानले जात असले, तरी अंतिम निर्णय मंत्रिमंडळातील नियुक्त्यांवर अवलंबून असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे हरियाणा प्रभारी बी. के. हरिप्रसाद हेदेखील या शर्यतीत असल्याचे समजते. डी. के शिवकुमार हे मंत्रिमंडळ स्थापनेच्या संदर्भातील चर्चेसाठी लवकरच दिल्लीला जाणार असून, ३ जून रोजी होणाऱ्या त्यांच्या शपथविधीपूर्वी कर्नाटक काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा हे जुलै २०२० पासून या पदावर कार्यरत आहेत, तर अजय राय हे ऑगस्ट २०२३ पासून उत्तर प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांमध्ये नेतृत्वात बदल करण्याची गरज आहे का, चाचपणी वरिष्ठ नेतृत्वाकडून सुरू आहे.
आंध्र प्रदेश काँग्रेसमध्येही नेतृत्वबदल होण्याची शक्यता असून, सध्याच्या प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला यांना कर्नाटकमधून राज्यसभेवर पाठविण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जाते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा पक्ष नेतृत्वाने त्यांना हे आश्वासन दिले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, गोवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याने राज्यातील पक्ष संघटनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर चोडणकर यांनी मार्च २०२२ मध्ये प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राज्य पातळीवरील या बदलांव्यतिरिक्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पातळीवरही फेरबदल करण्याचा विचार सुरू आहे. अनेक राज्यांच्या प्रभारी नेत्यांच्या कामगिरीबाबत पक्ष नेतृत्व समाधानी नसल्याने त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रस्तावित बदलांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून संघटनात्मक पातळीवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यास राहुल गांधी हे उत्सुक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
