आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : विधानपरिषदेसाठी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर होताच ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी काँग्रेसने तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली… सत्ताधारी भाजपाला मदत व्हावी म्हणून निवडणूक आयोग दहशतवादाचा अवलंब करतोय, असा सनसनाटी आरोप खासदार संजय राऊत यांनी केला… बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा धक्कादायक पराभव झाला… एकनाथ शिंदे यांच्याकडून चर्चेसाठी बोलवणे आले नाही, पण शेतकरी-दिव्यांगांसाठी त्यांच्याबरोबर जायला काय हरकत आहे, असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले… भाजपा आमदारांच्या हस्तक्षेपामुळेच वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींची निवडणूक रडखडली असल्याचा आरोप महापौर अजीव पाटील यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरे गटाला धक्का देण्याची काँग्रेसची तयारी

विधान परिषद निवडणुकीवरून राज्यातील विरोधकांच्या महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसने दानवेना पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला आहे. या निवडणुकीत आता काँग्रेसही आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषद लढवावी, अशी आग्रही भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी तसे स्पष्ट केले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक न लढता अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजीची भावना असून त्यांनी स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज न भरण्यापासून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांना काँग्रेसची मनधरणी करावी लागणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेमकी काय भूमिका जाहीर घेणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप

सत्ताधारी भाजपाला मदत व्हावी म्हणून निवडणूक आयोग दहशतवादाचा अवलंब करतोय, असा सनसनाटी आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेतून केला. पश्चिम बंगालसारख्या राज्यात ममता बॅनर्जी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व असताना त्यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अडीच लाख पॅरा मिलिट्री फोर्स बंगालमध्ये नेऊन ठेवली आहे, असेही ते म्हणाले. ‘एन्काऊंटर स्पेशलिस्टवर निवडणुका जिंकण्याची गरज नरेंद्र मोदींसारख्या लोकप्रिय नेत्याला का भासावी? पंतप्रधान मोदी हे जगाचे नेते आहेत. अंतराळात राजकारण सुरू झाले तर ते तिथले नेते होतील आणि त्यांच्या जोडीला अमित शाह आहेतच, तरीही त्यांना पोलिसांचे बळ वापरून निवडणुका जिंकण्याची वेळ येत आहे. याचाच अर्थ त्यांना पराभव दिसतो आहे, अशी बोचरी टीकाही राऊत यांनी केली. त्यांच्या या टीकेला भाजपाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

सगळ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रतिस्पर्धी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाल्याने या रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्‍विनी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्याविरोधात स्वरुपानंद देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अश्विनी देशमुख यांनी त्यांच्या पतीचे विकासाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांना साथ देण्याचे आवाहन केले होते, तर स्वरुपानंद देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात गावासाठी केलेल्या कामांच्या जोरावर गावकऱ्यांकडे मतांचे दान मागितले होते. सरतेशेवटी या अटीतटीच्या लढतीत आश्विनी देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या पराभवाची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

बच्चू कडूंचा पक्ष शिंदे गटात विलीन होणार?

विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आमदारकीसाठी पक्षाचे शिंदेसेनेत विलिनीकरण करण्याची अटही शिंदे यांनी बच्चू कडू यांच्यासमोर ठेवली असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधान परिषदेची आमदारकी मला मिळणार असल्याचे मी प्रसारमाध्यमांमधून ऐकले आहे, पण मला शिंदेंक़डून चर्चेसाठी बोलावणे आलेलं नाही. मात्र शेतकरी दिव्यांगांसाठी शिंदेसोबत जायला हरकत काय, असे म्हणत बच्चू कडू यांनी विधान परिषदेच्या आमदारकीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यांच्या या विधानामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदे गटात नक्कीच विलीनीकरण होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपाच्या आमदारांवर गंभीर आरोप

भारतीय जनता पक्षातील आमदारांच्या हस्तक्षेपामुळेच वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींची निवडणूक रडखडली, असा आरोप महापौर अजीव पाटील यांनी केला. जनतेची कामे रखडली जाऊन त्यांच्या मनात बहुजन विकास आघाडीबद्दल नाराजी निर्माण व्हावी, यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. वसई विरार महापालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर बहुजन विकास आघाडीने महापालिकेत सत्ता स्थापन केली. त्यामुळे महापौरांपासून विविध महत्त्वाची पदे बविआकडेच आहेत. आता सर्वांच लक्ष लागून प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीकडे लागून आहे. यादरम्यान निवडणुका लागल्या होत्या, जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, अचानक त्याला स्थिगिती देण्यात आली. महापालिकेत निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांवर नागरिकांनी रोष व्यक्त करावा म्हणून हे प्रयत्न केले जात असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला भाजपाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.