नाटय़मय घडामोडींनतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हे स्पष्ट झाले. ‘तटस्थ’ सोनिया गांधी यांनी खरगे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्यामुळे आणि ‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांनीही पसंती दिल्यामुळे खरगे हेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता असून निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असल्याचे मानले जात आहे. खरगे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या बाजूने प्रस्तावक म्हणून काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी गर्दी केली होती. यामध्ये भुपेंद्रसिंग हुड्डा, आनंद शर्मा, मनिष तिवारी, दिग्विजय सिंह, पृथ्वीराज चव्हाण इत्यादी काँग्रेसच्या जी-23 गटातील नेत्यांचाही समावेश होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

तर खरगे यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या शशी थरूर यांना मात्र याचा अजिबात धक्का बसला नसल्याचे दिसत आहे. खरंतर थरूर हे जी-23 नेत्यांपैकी एक होते ज्यांनी २०२० मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना संघटनात्मक सुधारणांसाठी पत्र लिहिले होते. मात्र तरीही या गटातील दिग्गज नेत्यांपैकी कोणीही थरूर यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना आढळून आले नाहीत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थरूर यांनी गटातील अनेकांशी संपर्क साधला होता. परंतु या दिग्ग्ज नेत्यांकडून थरूर यांना फारसे गंभीर नसलेले उमेदवार अशा दृष्टीनेच पाहिले गेले. शिवाय, थरूर यांच्यापेक्षाही पक्षात प्रदीर्घ अनुभव असणारे अन्यही नेते आहेत, जे थरूर यांच्या नेतृत्वात काम करू शकत नाहीत. त्यांच्या तुलननेत खरगे हे ज्येष्ठ व अनुभवी याचबरोबर हायकमांड यांच्या विश्वासातील नेते म्हणून परिचित आहेत. त्यामुळे पक्षातील दिग्गज नेत्यांचा कल थरूर यांच्या ऐवजी खरगे यांच्याकडेच दिसून आला आहे.

अनेक दिग्गज नेत्यांनी खासगीत काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत नाराजी उपस्थित करत, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वातावरण तयार केले होते. असे असतानाही आता या नेत्यांची भूमिकाही अनेकांना आश्चर्चचकित करणारी दिसत आहे.

माझ्या उमेदवारीचे उद्दिष्ट हे पक्षाचे पुनरुज्जीवन करणे आहे –

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी थरूर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पुढे काय होईल याबाबत सूचक विधान केलं होतं. “मी जी-23 च्या वतीने निवडणूक लढवत नाही किंवा त्यांच्याकडून समर्थनही मागत नाही. माझ्या उमेदवारीचे उद्दिष्ट हे पक्षाचे पुनरुज्जीवन करणे आहे, त्यामध्ये व्यत्यय आणणे नाही.” असं त्यांनी म्हटलं होतं.

तर, “पक्षामधील परिस्थती जैसे थे हवी असेल तर तुम्ही मल्लिकार्जुन खरगे यांना मतदान करावे. तसेच तुम्हाला काही बदल हवा असेल तर त्यासाठी मी उभा आहे. तुम्हाला तळागाळातील लोकांमध्ये बदल पाहायचा असेल. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असे वाटत असेल. ब्लॉक, जिल्हा, राज्य पातळीवर तुम्हाला पक्षामध्ये नवी उर्जा हवी असेल, तर मला मतदान करा”, असे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शशी थरूर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसमधील बंडखोर जी-23 गटातील काही नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावरही शशी थरूर यांनी भाष्य केले. जी-23 गटातील चार ते पाच नेते खरगे यांना पाठिंबा देत असतील, तर मी त्यांच्या मताचा आदर करतो. मात्र हे चार किंवा पाच नेते काँग्रेसमधील पूर्ण ९१०० मतदारांचे मत ठरवू शकत नाहीत. एवढेच नाही तर ते स्व:ताच्या मताशिवाय जी-23 गटातील अन्य नेत्यांचेही मत ठरवू शकत नाहीत, असे म्हणत त्यांनी जी-23 गटातील खरगे यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला.