काँग्रेसने आता संघटनात्मक बदल करण्यासाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू झाले आहे. या अंतर्गत साडेसात हजार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. पक्षाच्या स्थितीची माहिती आणि नवीन पदाधिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी काँग्रेसने निरीक्षकही नेमले आहेत. काँग्रेसच्या या ‘मेगा भरती’त तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी तरुण उमेदवारांचीच वानवा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

काँग्रेसने संघटन सृजन अभियान राबवून पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रदेश काँग्रेसने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पुणे शहर आणि जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठी कंबर कसली आहे. पुण्याबरोबरच शिरूर, बारामती आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांतील मरगळ झटकण्यासाठी निरीक्षक नेमण्यात आले आहेत.

या प्रक्रियेसाठी योगेश एच.सी, प्रफुल्ल गुडधे पाटील, रामहरी रूपनवर, प्रशांत जगताप, अनंत मोहोद आणि विश्वजीत हाप्पे यांसारख्या अनुभवी नेत्यांवर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडून ब्लॉक आणि शहर स्तरावर दौऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रदेश सचिव देविदास भन्साळी आणि जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांच्याकडून या पदाधिकाऱ्यांवर निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, ‘नवे चेहरे’ शोधण्याचे आव्हान या निरीक्षकांसमोर असल्याचे सांगण्यात येते.

पुण्यातील काँग्रेसमधून ‘तरुण’ हरवले?

पुणे हे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. दिवंगत केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी यांसारख्या नेत्यांनी पुण्याच्या राजकारणात काँग्रेसचा दबदबा निर्माण केला. मात्र, भाजपचा वाढता विस्तार आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक राजकारणात काँग्रेसचा तरुण कार्यकर्ता हरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वर्षानुवर्षे त्याच जुन्या चेहऱ्यांना पदे आणि उमेदवारी दिल्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली नाही. आक्रमक नेतृत्वाचा अभाव असल्याने स्थानिक पातळीवर तरुणांना आकर्षित करणाऱ्या नेतृत्वाची पोकळी काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून तरुणांना सत्तेच्या आणि संघटनेच्या माध्यमातून पदे देण्यात येत आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये पद मिळणे कठीण असल्याने पुण्यातील काँग्रेसमधून तरुणच हरवला असल्याची स्थिती आहे. राज्यात साडेसात हजार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असली, पात्र आणि तितक्याच ताकदीचे तरुण कार्यकर्ते शोधणे हे निरीक्षकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने शिरूर, बारामती आणि मावळ या तीन महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणी प्रस्थापित नेत्यांविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसला नव्या दमाचे नेतृत्व हवे आहे. मात्र, सध्याच्या निरीक्षकांमध्येही जुनेच पदाधिकारी आहेत. त्यामध्ये तरुण पदाधिकारी हे कमी आहेत.