Shashi Throor Praise PM Modi काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्याने काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ गोयंका व्याख्यानमालेत केलेल्या भाषणाची शशी थरूर यांनी स्तुती केल्यामुळे काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्पष्टीकरण मागितले आहे. ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी थरूर यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. त्यांचे मत पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असल्याचे सांगून, दीक्षित यांनी थरूर यांच्या राजकीय निष्ठेबद्दल शंका व्यक्त केली आहे. शशी थरूर पंतप्रधान मोदींविषयी काय म्हणाले? काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर काय टीका केली? जाणून घेऊयात…

काँग्रेस नेत्याने शशी थरूरांना सुनावले

संदीप दीक्षित यांनी त्यांना थेट विचारले, “तुम्ही काँग्रेसमध्ये कशासाठी आहात?” काँग्रेस ज्या धोरणांना मूलतः विरोध करते, त्याच धोरणांचे कौतुक केल्याबद्दल त्यांनी थरूर यांना ढोंगी म्हटले. दीक्षित म्हणाले, “शशी थरूर यांची समस्या ही आहे की, मला वाटत नाही त्यांना देशाबद्दल फारशी माहिती आहे. तुमच्या मते, जर कोणी काँग्रेसच्या धोरणांविरुद्ध जाऊन देशासाठी चांगले काम करीत असेल, तर तुम्ही त्या धोरणांचे अनुसरण केले पाहिजे. तुम्ही काँग्रेसमध्ये कशासाठी आहात? केवळ तुम्ही खासदार आहात म्हणून का?”

ते पुढे म्हणाले, “तुम्हाला खरोखरच वाटत असेल की, भाजपा किंवा पंतप्रधान मोदींच्या रणनीती तुम्ही ज्या पक्षात आहात, त्यापेक्षा चांगल्या प्रकारे काम करीत आहेत, तर तुम्ही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. जर तुम्ही ते देत नसाल, तर तुम्ही ढोंगी आहात.” यापूर्वी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही पंतप्रधानांच्या भाषणाचे कौतुक करण्याच्या थरूर यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “कौतुक करण्यासारखे काहीही नाही,” असे त्या म्हणाल्या होत्या.

श्रीनेत म्हणाल्या, “निष्पक्ष पत्रकारितेबद्दल त्यांची (थरूर यांची) काय अडचण आहे, हे त्यांनी आम्हाला सांगितले पाहिजे. मला त्यांचे कौतुक करण्याचे कोणतेही कारण दिसले नाही.” त्यांनी पुढे म्हटले की, शशी थरूर यांना कौतुक करण्याचे कोणते कारण सापडले हे मला समजले नाही. मुख्य म्हणजे मोदींनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर वारंवार टीका केली होती.

थरूर पंतप्रधान मोदींविषयी काय म्हणाले होते?

या आठवड्याच्या सुरुवातीला शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एका व्याख्यानावर आपले मत व्यक्त केले आणि एक्सवर त्याचे एक संक्षिप्त विश्लेषण पोस्ट केले. त्यांनी भाषणाच्या काही पैलूंवर टीका केली असली तरी त्यांनी काही भागांचे कौतुकही केले. हे भाषण आर्थिक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक कृती अशा दोन्ही गोष्टी साधणारे होते, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यावर नेहमी ‘निवडणूक मोड’मध्ये असल्याचा आरोप केला जातो; परंतु ते लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खऱ्या अर्थाने ‘भावनात्मक मोड’मध्ये असतात.”

थरूर यांच्या मते, मोदींनी भारताचा वारसा, भाषा आणि ज्ञान प्रणालींचा अभिमान पुनरुज्जीवित करण्यासाठी दशकभर चालणाऱ्या राष्ट्रीय मिशनचे आवाहन केले. थरूर म्हणाले, “रामनाथ गोयंका यांनी भारतीय राष्ट्रवादासाठी आवाज उठविण्याकरिता इंग्रजीचा कसा वापर केला होता, याचा उल्लेखही त्यांनी करायला हवा होता!”

बिहार निवडणुकीतही काँग्रेसविरोधी भूमिका?

बिहार निवडणुकीत महाआघाडीला केवळ ३८ जागा मिळाल्या. या निकालावर शशी थरूर यांनी आपले मत व्यक्त केले. त्यावेळी थरूर यांनी, “मला खात्री आहे की, पक्षाची (काँग्रेस) ही जबाबदारी आहे की, त्यांनी या कारणांचा सखोल अभ्यास करावा. पण लक्षात ठेवा, राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. त्यामुळे त्यांनीदेखील त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे काळजीपूर्वक परीक्षण करणे आवश्यक आहे. पण मी एवढे नक्कीच सांगेन की, अशा विषयावर आपल्या एकूण कामगिरीकडे पाहणे खूप महत्त्वाचे आहे,” असे म्हटले होते.

यापूर्वीही केले होते मोदींचे कौतुक

शशी थरूर यांनी ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकातील एका लेखात पंतप्रधानांचे कौतुक केले होते. थरूर यांनी ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात म्हटले होते, “ऑपरेशन सिंदूरनंतरचा राजनैतिक संपर्क हा राष्ट्रीय संकल्प आणि प्रभावी संवादाचा एक मार्ग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा, त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि संवाद साधण्याचे कौशल्य यामुळे ते जागतिक स्तरावर भारतासाठी अनमोल व्यक्ती आहेत; परंतु त्यांना अधिक पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे.”

ते असेही म्हणाले होते, “ऑपरेशन सिंदूर नंतर झालेला राजनैतिक संपर्क हा राष्ट्रीय दृढनिश्चय आणि प्रभावी संवादाचा मार्ग होता. त्यामुळे जेव्हा भारत एकजूट होतो तेव्हा तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्पष्टतेने आणि दृढनिश्चयाने आपला आवाज उठवू शकतो, हे स्पष्ट झाले.” खासदार शशी थरूर यांनी द हिंदू या इंग्रजी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात म्हटले, “ऑपरेशन सिंदूरनंतरचा राजनैतिक संपर्क हा राष्ट्रीय संकल्प आणि प्रभावी संवादाचा एक मार्ग होता.”