अकोला : एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या अकोला जिल्ह्यात काँग्रेस मागील काही वर्षांमध्ये रसातळाला गेली. गत ३५ वर्षांमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये अकोला मतदारसंघात पाडापाडीच्या राजकारणात काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी यंदा प्रथमच नव्या दमाचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांना संधी देण्यात आली. त्यांनी स्वत:ची यंत्रणा कामाला लावून जिंकण्याच्या दृष्टीने लढा दिला. त्यामुळे साडेतीन दशकांमध्ये अकोल्यात प्रथमच काँग्रेस स्पर्धेत येऊन ३५ टक्क्यांवर अधिक मते प्राप्त केली. अंतर्गत गटबाजी, निष्क्रिय व प्रभावहिन नेत्यांमुळे अकोल्यात काँग्रेसच्या पराभवाची परंपरा अबाधित राहिली असली तरी पक्षाचा जनाधार वाढल्याचे स्पष्ट होते.

१९८४ पर्यंत अकोला जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, त्यानंतरच्या काळात काँग्रेसची प्रचंड वाताहत झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार साडेतीन दशकात निवडून येऊ शकला नाही. दोन दशकापासून जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. विविध नेत्यांच्या गटबाजीमध्ये काँग्रेस विभागली गेली. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस कायम अॅड. प्रकाश आंबेडकरांमागे फरपटत गेला. १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भारिप-बमसंमध्ये आघाडी झाल्याने अॅड. आंबेडकरांनी दोन वेळा लोकसभा गाठली. त्यानंतर दोघेही स्वतंत्र लढल्याने भाजपला पराभूत करू शकले नाही. गत चार निवडणुकीप्रमाणे यावेळेस देखील अॅड. प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडीसाठी बोलणीचे सत्र चालूनही आघाडी न झाल्याने अंतिम क्षणी काँग्रेसने निवडणूक रिंगणात उमेदवार दिला. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस जिंकण्याऐवजी पाडण्याच्या नकारात्मक मानसिकतेतून लोकसभा निवडणूक लढली. यावेळेस मात्र चित्र वेगळे होते.

हेही वाचा….PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागलेल्या खासदारांचे देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन; म्हणाले…

काँग्रेसकडून लोकसभा लढण्यासाठी २०१९ मध्येच डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी काही कारणाने संधी चुकली असली तरी डॉ. पाटील यांनी पाच वर्ष तयारी सुरू ठेवली होती. वर्षभरापासून त्यांनी गावपातळीवर दौरे करून जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला. ॲड. आंबेडकरांसोबत आघाडी न झाल्याने अपेक्षेप्रमाणे डॉ. पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. जिल्ह्यात खिळखिळी काँग्रेस व गटातटात विभागलेले पदाधिकारी व कार्यकर्ते लक्षात घेता डॉ. अभय पाटील यांनी प्रचारासाठी स्वत:ची यंत्रणा उभी केली. काँग्रेसने १० निवडणुकांमध्ये तिसऱ्यांदा मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिले. अकोला लोकसभेच्या रिंगणात दोन प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मतविभाजन अटळ होते. डॉ. पाटील यांनी प्रचारात मतदारसंघातील प्रश्न केंद्रस्थानी आणले. भाजप विरोधातील नाराज गठ्ठा मतदार काँग्रेसकडे वळला. शिवाय जातीय राजकारणात देखील भाजप व काँग्रसमध्येच लढत झाली. डॉ. पाटील यांची व्यक्तिगत संबंध देखील काँग्रेसचे मताधिक्य वाढण्यास उपयुक्त ठरली. १९८९ पासून २०१९ पर्यंत २२ ते ३० टक्क्यांच्या दरम्यान मिळणारी काँग्रेसची मते यावेळेस प्रथमच ३५.४९ टक्क्यांवर पोहोचली. या अगोदर १९८४ मध्ये काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आलेले मधुसुदन वैराळे यांना ३६.८६ टक्के मते मिळाली होती. यावेळेस अकोला मतदारसंघ राखताना भाजपला चांगलीच कसरत करावी लागली. या निवडणुकीमध्ये भाजपचे अनुप धोत्रे यांना चार लाख ५७ हजार ०३०, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांना चार लाख १६ हजार ४०४ व ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७६ हजार ७४७ मतांवर समाधान मानावे लागले. ४० हजार ६२६ मतांनी अनुप धोत्रे यांनी डॉ. अभय पाटील यांचा पराभव केला. डॉ. अभय पाटील यांनी दिलेल्या तुल्यबळ लढतीमुळे पराभवानंतरही काँग्रेसला अकोल्यात नवी उभारी मिळाली आहे.

जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मोडकळीस निघाले आहे. केंद्र व राज्यस्तरीय नेत्यांचे जिल्ह्यात आगमन झाले, त्याचवेळी काँग्रेस नेत्यांची गर्दी होते. इतर वेळी काँग्रेस नेते दिसतही नाहीत. एकेकाळी कार्यकर्त्यांनी गजबजून राहणारे काँग्रेसचे कार्यालय स्वराज्य भवन आता ओसाड पडले असते. या भवनाची जागा व्यावसायिक कामासाठी भाड्याने देऊन महसूल जमा करणे एवढाच उद्योग काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सुरू असतो. पक्षाला संघटनात्मक बळकटी देण्याकडे नेत्यांनी कायम दुर्लक्ष केले. त्यामुळे पक्षाची आज दयनीय अवस्था झाली.

हेही वाचा…दलित मते डोळ्यांसमोर ठेवूनच रामदास आठवले यांना मंत्रिपद

काँग्रेसला सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मतदान केले. भाजपबहूल मतदान केंद्रावर देखील काँग्रेसने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. हे काँग्रेस पक्षाचे यशच म्हणावे लागेल. एकूणच जिल्ह्यात पक्षाचा जनाधार वाढला आहे. – डॉ. अभय पाटील, काँग्रेस नेते, अकोला.