Congress infighting intensifies in Jammu-Kashmir : गेल्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार पुनरागमन करीत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखलं. मात्र, त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा व दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठं अपयश आलं. तेलंगणाच्या सत्तेतून भारत राष्ट्र समितीला बाहेर काढल्यानंतर काँग्रेसने राज्यात एकहाती सत्तास्थापन केली. झारखंड व जम्मू-काश्मीरमधील मित्रपक्षांना पाठिंबा देऊन काँग्रेसने तिथे थोडंफार वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान राजकीय चढउताराचा सामना करणाऱ्या काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे आणि त्यामागचं कारणही तसंच आहे.
एकीकडे कर्नाटकमधील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राजकीय मतभेद सुरू असताना दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्येही पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे, राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वादातून एका गटाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला थेट बंडखोरीचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांच्या विरोधात पक्षातील अनेक नेते नाराज असून त्या संदर्भात थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली आहे.
बंडखोर गटाचे मल्लिकार्जुन खरगेंना पत्र
काँग्रेसमधील एका गटाने आरोप केलाय की, प्रदेशाध्यक्ष कर्रा यांच्याकडून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारले जात असून बाहेरून आलेल्या नेत्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात येत आहे. काँग्रेसच्या एका गटाने पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून त्यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणीही केली आहे. या गटातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “कर्रा यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यांनी जुने, निष्ठावान नेते दूर लोटले आहेत. पक्षात सल्लामसलत होत नाही, जो गट सध्या राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे, तो बाहेरून आलेल्या लोकांचा आहे.”
आणखी वाचा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे भाजपाची कोंडी? राज्यघटनेच्या प्रस्तावनेत का होतेय बदलाची मागणी?
पक्षांतर्गत वारंवार बंडखोरी
- जम्मू-कश्मीर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वावर बंडखोरी ही नवीन गोष्ट नाही.
- गेल्या दशकभरात काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला आहे.
- २०१५ मध्ये, सैफुद्दीन सोझ यांच्या विरुद्ध बंडखोरी झाली होती.
- ही बंडखोरी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थकांनी केली होती.
- त्यानंतर गुलाम अहमद मीर यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली
- मात्र, काही दिवसांनंतर त्यांच्या विरोधातही मोठी बंडखोरी झाली.
- मीर यांच्यानंतर वकार रसूल वाणी हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले.
- काही दिवस पक्षाचा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनाही पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला.
- अखेर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तारिक हमीद कर्रा यांच्याकडे प्रदेशाध्यपदाची जबाबदारी दिली.
- कर्रा यांना गुलाम अहमद मीर यांचा पाठिंबा आहे, जे आता काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.
- विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर आता कर्रा यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस दुभंगणार?
विशेष बाब म्हणजे, यावेळची काँग्रेसमधील बंडखोरी इतकी तीव्र आहे की, जम्मूतील काही नेत्यांनी स्वतंत्र प्रदेश काँग्रेस युनिटची मागणी केली आहे, जे यापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. काँग्रेसमध्ये परतलेल्या ताज मोहिउद्दीन आणि जी. एम. सरुरी यांच्या पक्ष प्रवेशाने काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, कर्रा समर्थक गटाने स्पष्ट केलं आहे की, या नेत्यांना पक्षात परत घेण्याचा निर्णय खुद्द काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला होता आणि यामध्ये आपला कोणताही सहभाग नव्हता.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर जम्मू-कश्मीरमधील नेतृत्व प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पक्षापुढे हे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसमधील एका नाराज नेत्याने सांगितलं की, पक्षातील नेत्यांमधील नाराजी इतकी टोकाला पोहोचली आहे की, जम्मूतील नेते आता स्वतंत्र युनिटची मागणी करीत आहेत. जसं महाराष्ट्रात मुंबईसाठी स्वतंत्र मुंबई काँग्रेस युनिट आहे, तसं जम्मूसाठीही स्वतंत्र युनिट असावं अशी आमची भूमिका आहे.
हेही वाचा : भाजपाने निवडणुकीपूर्वी केलेली घोषणा हवेतच विरली? विरोधकांनी कशी केली सत्ताधाऱ्यांची कोंडी?
हे भाजपा-आरएसएसचे षडयंत्र असल्याचा आरोप
दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष कर्रा यांच्या गटातील नेत्यांनी काँग्रेसमधील बंडखोरीसंदर्भात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केला आहे. “जम्मू-काश्मीर तीन भागांत विभागणे हा आरएसएसचा जुना अजेंडा असून आज हेच लोक त्याला चालना देत आहेत. राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये भाजपाचे स्लीपर सेल्स आहेत, त्याचाच प्रत्यय जम्मू-काश्मीरमध्ये येत आहे,” असं कर्रा यांच्या गटातील नेत्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव
आम्ही जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक या बंडखोर गटामुळेच हरलो, असा आरोप कर्रा गटातील एका नेत्याने केला आहे. दरम्यान, केंद्रातील भाजपा सरकारविरोधात नाराजीचा सूर असतानाही काँग्रेसला गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विशेष यश मिळवता आलेलं नाही. गेल्यावर्षीच्या निवडणुकीत पक्षाला केवळ सहाच जागा जिंकण्यात यश मिळालं आहे. त्यापैकी पाच जागा काश्मीर खोऱ्यातील असून एक जागा जम्मूमधील राजौरीतील आहे. त्यातच पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता असल्याने काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.