कॉँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत इथे गुणवत्तेपेक्षा गुलामगिरी महत्त्वाची असल्याचे कारण पुढे केले आहे. आपण विशिष्ट समुहाला आपलासे न केल्याने नेतृत्वासाठी गर्दी जमविण्यात अपयशी  ठरल्याचेही ते म्हणाले. शेरगील हे व्यवसायाने अॅडव्होकेट असून काही काळापासून ते पक्षासोबत नाखूष होते.

कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की “कॉँग्रेस पक्षाचे विचार आणि सध्याच्या धोरणकर्त्यांचे द्रष्टेपण यांचा ताळमेळ तरूण आणि आधुनिक भारताशी जमत नाही.” ते पत्रात पुढे म्हणाले, पक्षाच्या निर्णयावर अन्य व्यक्तिंच्या गुंतलेल्या स्वारस्याचा प्रभाव दिसतो. ज्यामुळे सातत्याने वास्तविकतेकडे दुर्लक्ष होते”.

उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात आमंत्रित न केल्याने शेरगील खट्टू होते. ते मूळ जालंदरचे असून यांचा पक्षप्रवेश कॉँग्रेस पक्षाने 2014 मध्ये तरूण आणि आश्वासक चेहऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या टॅलेंट हंटमधून झाला होता.   त्यांची 2014 मध्ये राष्ट्रीय मीडिया पॅनलिस्ट म्हणून निवड करण्यात आली तर 2018 मध्ये राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवडले गेले. विधानसभा निवडणुकांदरम्यान छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पक्षाचे संवाद समन्वयक म्हणून काम पाहण्याची संधी देण्यात आली. काही राज्यांत ते पक्षाचे  स्टार प्रचारक ठरले होते.   

आपण काही जणांच्या लहरी आणि कल्पनाआधारित स्वभावाशी जुळवून घेऊ शकत नसल्याने पक्षाचे कार्यक्रम आणि पत्रकार परिषदांमधून बाजूला राहणे पसंत करत असल्याचे त्यांनी सांगितले.“राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या कार्यालयात काही व्यक्ती आहेत.. मी त्यांच्या तालावर नाचू शकत नाही. मी दर आठवड्याला भेट घेऊ शकत नाही किंवा संपर्कात राहू शकत नाही.. जर कारणांवरून माझी पात्रता ठरत असेल तर मग मी पक्षासाठी योग्य नाही,” त्यांनी सांगितले. शेरगील यांचा आरोप आहे की, “कॉँग्रेस पक्षातील धोरणकर्त्यांनी निवडणुकीत मिळालेल्या जय-पराजयावरून निर्णयांचे तोलमाप थांबवले असून स्वत:च्या फायद्यासाठी काम करणाऱ्यांचे सल्ले पाळले जात आहेत.”