काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची गृहजिल्ह्यातील आंदोलनाकडे पाठ!

राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली असताना आणि नेते पत्रकार परिषद व प्रसार माध्यमांना सामोरे जात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत असताना पटोलेंनी मात्र हे सर्व टाळणेच पसंत केले.

Congress, State president, Nana Patole, Bhandara, party agitation program
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची गृहजिल्ह्यातील आंदोलनाकडे पाठ!काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची गृहजिल्ह्यातील आंदोलनाकडे पाठ! ( Photo Source – Indian National Congress Bhandara FB page )

कविता नागापुरे

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा हा गृहजिल्हा. सुकळी हे त्यांचे जन्मगाव. साकोली विधानसभेचे ते आमदार. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याच आदेशानुसार काँग्रेस नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यात आंदोलने केलीत. मात्र, गृहजिल्ह्यातील आंदोलनांकडे पटोलेंनीच पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले.

पटोले २७ आणि २८ मार्चला सुकळीत होते. मात्र, त्यांच्या येण्याची कुणालाही कुणकुण नव्हती. विशेष म्हणजे, ते कधी आले आणि कुठे थांबले याबाबत त्यांनीच कोणालाही कळू दिले नाही. राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली असताना आणि नेते पत्रकार परिषद व प्रसार माध्यमांना सामोरे जात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत असताना पटोलेंनी मात्र हे सर्व टाळणेच पसंत केले. पटोलेंना गृहजिल्ह्यातच असे लपूनछपून का यावे लागले, असा प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनाही पडला आहे.

हेही वाचा… लोकसभा निवडणूकीपुर्वी गोवा महामार्गांचे काम मार्गी लावण्याचा भाजपचा प्रयत्न

भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने मोदी-अदानी यांच्याविरोधात ‘पर्दाफाश रॅली’ काढण्यात आली. राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ सत्याग्रह, निदर्शने करण्यात आली. महागाईच्या विरोधात काँग्रेसने आंदोलने केली. मात्र, या सर्वच आंदोलनात पटोले कुठेच दिसले नाही. अशातच, २८ मार्चला नाना सुकळीत आल्याची कुजबूज सुरू झाली. मात्र, ते २७ मार्चपासूनच सुकळीला मुक्कामी असल्याचे समोर आले. आंदोलनाच्या दिवशी जर नाना जिल्ह्यात होते तर त्यात सहभागी का झाले नाही? नाना जर त्या दिवशी जिल्ह्यात नव्हते तर नंतर येण्याएवजी आंदोलनाच्याच दिवशी का आले नाही? आपल्याच जिल्ह्यात ही लपवाछपवी कशासाठी? असे प्रश्न आता जिल्हा काँग्रेसमधूनच दबक्या आवाजात उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा… प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैशांचा व्यवहार काँग्रेसच्या आमदारावर शेकणार ?

प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि जिल्ह्यातील आमदार असल्यामुळे त्यांनी येथे पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी माध्यमांना टाळले. नाना सुकळीत असल्याची माहिती मिळताच काही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गाठले. मात्र, नानांनी त्यांनाही फारसा प्रतिसाद दिला नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ ते पोटतिडकीने बोललेच नाही. सावरकरांबाबतच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य टाळले.

हेही वाचा… राजू शेट्टी, संभाजीराजे यांची लोकसभेची तयारी सुरु

पक्षाच्या आंदोलन, मोर्चांना अनुपस्थित राहणाऱ्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना थेट निलंबनाची तंबी देणारे नाना आपल्याच गृहजिल्ह्यातील आंदोलनांत अनुपस्थित राहात असेल तर इतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जाईल, याचा विचार नानांनी करायला हवा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे नानांवर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे, हे मान्यच. मात्र, वेळात वेळ काढून नाना गृहजिल्ह्यातील आंदोलनात सहभागी झाले असते तर स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले असते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 12:58 IST
Next Story
लोकसभा निवडणूकीपुर्वी गोवा महामार्गांचे काम मार्गी लावण्याचा भाजपचा प्रयत्न
Exit mobile version