अकोला : महापालिका निवडणुकीमध्ये मुस्लीमबहुल भागात ‘हाता’ला मतदारांची साथ मिळाल्याने काँग्रेसचे संख्याबळ वाढले. काँग्रेसचे २१ पैकी १७ मुस्लीम नगरसेवक आहेत. निवडक ठिकाणी काँग्रेसला मतविभाजनाचा फटका बसला. मुस्लीमबहुल व मिश्र मतदारांची संख्या असलेले प्रभाग वगळता इतर ठिकाणी काँग्रेसची चांगलीच वाताहत झाली. पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम देखील जप्त झाली. मुस्लीमबहुल भागात काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा अधारेखित झाले आहे.

अकोला महापालिकेची निवडणूक रंगतदार झाली. मतदारांनी अनपेक्षित असा कौल दिला. भाजपला सर्वाधिक ३८ जागा, तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून काँग्रेसने २१ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसची लक्षवेधी कामगिरी ठरली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ४६ उमेदवार रिंगणात उतरवले. मुस्लीमबहुल प्रभागांवरच काँग्रेसची भिस्त होती. त्यामुळे नेत्यांनी त्याच भागात अधिक लक्ष केंद्रित केले. त्या परिसरात काँग्रेसपुढे ‘एआयएमआयएम’, राष्ट्रवादी अजित पवार गट, वंचित आघाडी आणि महानगर विकास समितीचे आव्हान होते. मतांचे ध्रुवीकरण होण्याचा अंदाज होता. त्यामुळे काही ठिकाणी काँग्रेसचे नुकसान देखील झाले.

प्रभाग दोन ड जागेवर काँग्रेसचा ३८७ मतांनी पराभव झाला. सात ब मध्ये महानगर विकास समितीने काँग्रेसला २७ मतांनी मात दिली. प्रभाग आठ अ, क, ड आदी जागांवरही मतविभाजनाचा प्रभाव दिसून आला. मात्र, बहुतांश मुस्लीमबहुल भागात काँग्रेसला मतदारांचे पाठबळ मिळाले. त्यामुळेच काँग्रेसचे १७ मुस्लीम नगरसेवक निवडून आले आहेत. चार इतर असे एकूण काँग्रेसचे संख्याबळ २१ वर पोहोचले.

मुस्लीमबहुल प्रभाग वगळता विशेषत: अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये काँग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्न आजही कायमच आहे. या प्रभागांमधील हात चिन्हावरील अनेक उमेदवारांना सन्मानजनक मते देखील घेता आली नाही. अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की काँग्रेसच्या उमेदवारांवर ओढवली. विविध प्रभागातील काँग्रेसच्या उमेदवारांना एक हजार, ५०० पेक्षाही कमी मते पडली. या भागात प्रचारासाठी देखील नेते फिरकले नव्हते. विविध प्रभागात काँग्रेसकडे उमेदवार सुद्धा नव्हते.

अखेर काही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवर आली. विशेष म्हणजे, जुन्या शहरातील प्रभागांमध्ये हात आणि मशाल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. काही जागांवर विरोधात, तर विशिष्ट ठिकाणी पाठिंबा असे विचित्र समीकरण काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात होते. नेत्यांच्या सोयीस्कर भूमिकेमुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व गोंधळ होता. मुस्लीमबहुल भागात जनाधार मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षापुढे इतर ठिकाणी मात्र अस्तित्वाचा गंभीर प्रश्न आहे.

महापालिका सभागृहात २५ मुस्लीम नगरसेवक

महापालिका निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या सभागृहात २५ मुस्लीम नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १७ सदस्य काँग्रेसचे विजयी झाले. ‘एआयएमआयएम’चे तीन, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन, वंचित एक, भाजप सोबतच्या युतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आणि भाजप समर्थित महानगर विकास समितीचा एक असे एकूण २५ जण आहेत. त्यात १४ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे.