Congress leader quits party बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमधील मतदान प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीच्या निकालाबाबतचे संभाव्य अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, याचदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक निकालांच्या केवळ तीन दिवस आधी बिहारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार शकील अहमद यांनी राजीनामा दिला आहे. दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील मतदान संपल्यानंतर लगेच त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामागील कारण काय? शकील अहमद कोण आहेत? काँग्रेससाठी याचा अर्थ काय? जाणून घेऊयात…
राजीनामा देण्याचे कारण काय?
“पक्षात सध्या महत्त्वाच्या पदांवर असलेल्या काही व्यक्तींशी माझे मतभेद आहेत,” असे कारण देत त्यांनी हा राजीनामा दिला. बिहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांनी राज्यातील मतदान संपल्यानंतर काही तासांतच पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात बिहारचे माजी आरोग्य मंत्री असलेल्या शकील अहमद यांनी म्हटले आहे की, त्यांनी हा निर्णय अतिशय जड अंतःकरणाने पूर्वीच घेतला होता, पण त्यांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना असे वाटत होते की, “मतदानापूर्वी कोणताही चुकीचा संदेश जावू नये किंवा माझ्यामुळे पक्षाचे एकही मत कमी व्हावे.”

अहमद यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, त्यांची दुसऱ्या कोणत्याही पक्षात किंवा संघटनेत सामील होण्याची इच्छा नाही. “माझ्या पूर्वजांप्रमाणेच, माझा काँग्रेसच्या तत्त्वे आणि धोरणांवर अढळ विश्वास आहे,” असे ते म्हणाले. “माझ्या संपूर्ण आयुष्यात मी काँग्रेसच्या आदर्शांचा आणि तत्त्वज्ञानाचा हितचिंतक आणि समर्थक राहीन. माझ्या आयुष्यातील शेवटचे मतदेखील काँग्रेसच्याच बाजूने टाकले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पत्रात म्हटले आहे की, त्यांचे आजोबा अहमद गफूर हे १९३७ मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. १९४८ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचे वडील शकूर अहमद हे १९५२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आणि १९५२ ते १९७७ दरम्यान ते वेगवेगळ्या मतदारसंघातून पाच वेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. “माझ्या वडिलांचे १९८१ मध्ये निधन झाल्यानंतर मी स्वतः १९८५ पासून काँग्रेस पक्षाकडून पाच वेळा आमदार आणि खासदार म्हणून निवडून आलो आहे,” असे अहमद यांनी सांगितले.
एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी यापुढे कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यांनी पक्षाला सांगितले होते की ते आयुष्यभर काँग्रेसचे सदस्य राहतील, परंतु आता तेदेखील शक्य वाटत नाही असे त्यांनी नमूद केले. “शेवटी मला पुन्हा एकदा हेच सांगायचे आहे की, माझे मतभेद कदाचित सध्या पक्षात महत्त्वाच्या पदांवर असलेल्या काही व्यक्तींशी असतील, पण काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर आणि तत्त्वांवर माझा अढळ विश्वास आहे.”
मनमोहन सिंग सरकारमध्ये माजी केंद्रीय गृह आणि दळणवळण राज्यमंत्री असलेले आणि वैद्यकीय डॉक्टर म्हणून प्रशिक्षित असलेले अहमद यांनी खासदार आणि बिहारचे आरोग्य मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांचा मधूबनीमध्ये मजबूत प्रभाव आहे, त्यामुळे हा निर्णय काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे.
शकील अहमद काय म्हणाले?
बिहारमधील काँग्रेसच्या सर्वात मोठ्या मुस्लीम नेत्यांपैकी एक असलेल्या अहमद यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मी काही दिवसांपूर्वीच पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता, पण अंतिम टप्प्यातील मतदानापूर्वी मला राजीनामा द्यायचा नव्हता, कारण त्याचा पक्षावर परिणाम होऊ शकला असता.” त्यांना त्यांच्या या निर्णयाच्या विशिष्ट कारणांबद्दल विचारले असता, अहमद म्हणाले: “मला कोणत्याही टप्प्यावर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सामील केले गेले नाही.” त्यांचा राजीनामा बिहार एआयसीसीचे प्रभारी कृष्णा अल्लवारू किंवा बिहारचे प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार यांच्याशी संबंधित आहे का असे विचारले असता अहमद म्हणाले, “कोणत्याही बाबतीत माझा सल्ला घेतला गेला नाही.. पण, मी कोणत्याही पक्षात सामील होणार नाहीये.”
बिहार एक्झिट पोल्स
मंगळवारी संध्याकाळी वेगवेगळ्या माध्यमांनी व तटस्थ संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलद्वारे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळेल; तर राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसप्रणित महागठबंधनचा दारूण पराभव होईल.
एक्झिट पोल्सने प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ची पहिल्याच निवडणुकीतील कामगिरी निराशाजनक राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. दैनिक भास्करच्या पोलने एनडीएला १४५-१६० जागा, महाआघाडीला ७३-९१ आणि इतरांना ५-७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला, तर ‘टाईम्स नाऊ-जेव्हीसी’ पोलने एनडीएला १३५-१५० जागा, महाआघाडीला ८८-१०३ आणि इतरांना ३-६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला.
‘न्यूज १८’ पोलने एनडीएला १४०-१५० जागा, महाआघाडीला ८५-९५ आणि ‘जन सुराज’सह इतरांना ०-१५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला. ‘आयएएनएस-मॅट्रिझ’ने एनडीएला १४७-१६७ जागा, महाआघाडीला ७०-९० आणि इतरांना २-८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला. ‘पी-मार्क’ पोलने एनडीएला १४२-१६२ जागा, महाआघाडीला ८०-९८ आणि इतरांना ०-३ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला.
