manmohan singh bharat ratna award : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान देण्याची मागणी तेलंगणा सरकारने केली. सोमवारी (३० डिसेंबर) विधानसभेत यासंदर्भातील ठराव देखील मंजूर करण्यात आला. या ठरावानंतर काँग्रेस नेत्यांनी आपली मागणी अधिक जोरकसपणे लावून धरली आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी तेलंगणा सरकारच्या ठरावाला पाठिंबा दिला आहे. “मी केंद्र सरकारला हा ठराव स्वीकारण्याची विनंती करतो. मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे महान नेते होते. त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्यात यावा”, असं प्रमोद तिवारी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुभ्रांश कुमार राय म्हणाले की, “तेलंगणा विधानसभेने शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, मनरेगा आणि इतर मुद्द्यांसाठी लढणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. “देशाचा सर्वोच्च सन्मान त्यांना (डॉ. मनमोहन सिंग) देण्याची मागणी योग्यच आहे.”

हेही वाचा : अदाणी समूहाला मोठा धक्का, तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरची निविदा रद्द का केली?

२०१३ मध्ये काय घडलं होतं?

या ठरावाव्यतिरिक्त, तेलंगणातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधीपक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) व भाजपाचे नेते विधानसभेच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनासाठी एकत्रित आले होते. हैदराबादमधील एका प्रमुख ठिकाणी माजी पंतप्रधानांचा पुतळा उभारण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. २०१३ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची शिफारस केली होती. मात्र, काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या शिफारशीला प्रतिसाद दिला नाही, असा आरोप भाजपाने केला होता. या आरोपानंतर काही दिवसांनीच काँग्रेसने विधानसभेत हा ठराव मंजूर केला आहे.

भाजपाने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

भाजपाने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पार्टीचे प्रवक्ते शहजाद पूनावाला हे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, “रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत प्रस्ताव पारित करण्याऐवजी सोनिया गांधी यांना प्रश्न विचारला पाहिजे की, प्रणव मुखर्जी यांनी आणलेला आणि पुलक चॅटर्जी यांनी पाठवलेला प्रस्ताव योग्य पद्धतीने पुढे का नेण्यात आला नाही? भारताच्या पहिल्या शीख पंतप्रधानांना ‘भारतरत्न’ का देण्यात आला नाही? नेहरू-गांधींव्यतिरिक्त कोणीही पंतप्रधानपदी विराजमान झालं तर गांधी कुटुंबाला असुरक्षित वाटतं.”

भाजपाचे काँग्रेसवर आरोप काय?

भाजपाच्या आणखी एका नेत्याने दावा केला की, काँग्रेस “काँग्रेसचा शीख समाजाच्या मतांवर डोळा आहे. त्यामुळेच ते डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी आपली बांधिलकी दाखवत आहेत. मात्र, या निर्णयाचा कोणताही राजकीय परिणाम होणार नाही. कारण केंद्र सरकारने सिंग यांचे स्मारक बांधण्याची मागणी आधीच मान्य केली आहे.”

गेल्या आठवड्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. शनिवारी निगमबोध घाट येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, काँग्रेसने २०१३ मध्ये मनमोहन सिंग यांना भारतरत्न दिला नाही, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुभ्रांश कुमार राय यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. भाजपाचे नेते खोटं बोलत असून त्यांनी केलेला दावा कागदोपत्री पुराव्यांसहित सर्वांसमोर मांडावा, असं राय यांनी म्हटलं आहे.

Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर माफी का मागितली होती?

काँग्रेस नेत्यांकडून आरोपांचं खंडण

तेलंगणा सरकारच्या ठरावाबाबत काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, “असा ठराव मंजूर करण्याचा विधानसभेला विशेषाधिकार आहे. परंतु यासंदर्भात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने कोणतीही माहिती दिलेली नाही.” काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “जर काही राज्यं असा ठराव घेत असतील तर आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र, असा निर्णय घेण्यास आम्ही त्यांना काहीही सांगितलेलं नाही.”

दुसरीकडे डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कार आणि स्मारकाच्या जागेवरून काँग्रेस आणि भाजपात मंगळवारपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. माजी पंतप्रधान यांच्या निधनानंतर सरकारने ७ दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. परंतु, काँग्रेस नेते राहुल गांधी हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी विदेशात गेले होते, असा आरोप सत्ताधारी भाजपाने केला आहे. तर लोकसभेतील काँग्रेसचे व्हिप मणिकम टागोर यांनी भाजपाचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून असा अपप्रचार केला जात असल्याचं टागोर यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे कृत्य लज्जास्पद : काँग्रेस

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी यमुना नदीच्या काठावर जागा दिली नाही. त्यांच्या मंत्र्यांनी ज्या प्रकारे सिंग कुटुंबियांना बाजूला केले ते लज्जास्पद आहे. जर राहुल गांधी हे वैयक्तिक कामासाठी विदेशात गेले असतील, तर तुम्हाला त्यात काय अडचण आहे?” असा प्रश्नही टागोर यांनी उपस्थित केला. “राहुल गांधी यांचा दौरा पूर्वनियोजित होता. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील कोट्यवधी लोकांनी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले होते”, असंही ते म्हणाले.

Story img Loader