कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने आपले लक्ष आता इतर राज्यांच्या निवडणुकांकडे वळविले आहे. मध्य प्रदेशमध्ये येत्या काळात विधानसभा निवडणूक होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्य प्रदेशमधील नेत्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह यांच्यासह राज्यातील नेते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले कमलनाथ हे निवडणूक प्रचाराचा चेहरा असतील यावर एकमत झाले आहे. मात्र कमलनाथ हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का? याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करू नये, असे खुद्द कमलनाथ यांचेच मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० पैकी १५० जागा जिंकेल, असा विश्वास बैठकीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलत असताना सूत्रांनी माहिती दिली की, काँग्रेस पक्ष मुख्यमंत्रीपदाचा नेता जाहीर न करण्याची परंपरा यावेळी बाजूला ठेवू शकते. कारण कमल नाथ यांच्या तोडीचा नेता सध्या काँग्रेसमध्ये नाही. पण यासाठी निवडणूक जवळ येण्याची वाट पाहिली जाईल.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, कर्नाटकच्या धर्तीवर मध्य प्रदेशच्या नेत्यांनी निवडणुकीला सामोरे जावे असे आवाहन राहुल गांधी यांनी नेत्यांना केले आहे. तसेच राहुल गांधी यांनी असेही सांगितले की, उमेदवारी देत असताना कुणालाही झुकते माप दिले जाणार नाही. पक्षाकडून अंतर्गत सर्व्हे करून त्यानंतर तिकीट वाटप केले जाईल. झुकते माप याचा अर्थ पक्षातील वरिष्ठ नेते आपल्या निकटवर्तीयांना तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रथेला यावेळी फाटा दिला जाईल, असे त्यांना सुचवायचे होते.

हे वाचा >> Video : “सरकारने तुमच्यासाठी काय केलं पाहिजे?” राहुल गांधींच्या प्रश्नावर ट्रक चालकाचं भावूक उत्तर, म्हणाला…

कर्नाटकमध्ये काँग्रेसने विद्यमान राज्य सरकारला घेरता येतील अशा विषयांवर लक्ष केंद्रीत केले होते. त्याप्रमाणेच मध्य प्रदेशमध्येही भ्रष्टाचार आणि सरकारची फोल ठरलेली आश्वासने या दोन मुद्द्यांना घेऊन काँग्रेस राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जवळपास २०,००० आश्वासने दिली होती. मात्र त्यापैकी हजारो आश्वासने अमलात आणण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यांचे अपयश ही आमची सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे, एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.

तसेच कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे स्थानिक मुद्द्यांना प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले गेले, त्याप्रमाणेच मध्य प्रदेशची प्रचाराची रणनीती आखण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या विश्वासार्हता आणि सरकार चालविण्याच्या क्षमतेवरच घाव घालण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. पुढील महिन्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकर्जुन खरगे आणि राहुल गांधी हे मध्य प्रदेश निवडणुकांसाठी जाहीर सभा घेण्याचा सपाटा लावू शकतात. यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात मध्य प्रदेशच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

माध्यमांना संबोधित करत असताना राहुल गांधी म्हणाले की, आजच्या बैठकीत आम्ही बरीच चर्चा केली. ही चर्चा पक्षांतर्गत विषयाबद्दल होती. कर्नाटकमध्ये आम्ही १३६ जागा जिंकण्यात यशस्वी झालो. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस जवळपास १५० जागा मिळवण्यात यशस्वी ठरेल. जे कर्नाटकात झाले, त्याचीच पुनरावृत्ती आम्हाला मध्य प्रदेशमध्ये करायची आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११४ जागी विजय मिळवला तर भाजपाला १०९ जागा मिळाल्या होत्या. २३० मतदारसंघाच्या विधानसभेत बहुमताचा आकडा ११६ आहे. काँग्रेसने अपक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्यात यश मिळवले होते. पण २०२१ साली काँग्रेसचे नेते जोतीरादित्य सिंधिया यांच्यासोबत २१ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला, ज्यामुळे काँग्रेसचे सरकार गडगडले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress will win 150 seats in madhya pradesh says rahul gandhi karnataka template will be repeated in madhya pradesh kvg
First published on: 30-05-2023 at 22:57 IST