Congress victory Telangana Local Election 2026 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या भाजपाला तेलंगणात मोठा फटका बसला आहे. तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात सत्ताधारी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यातील ११६ पैकी तब्बल ७० नगर परिषदांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्याशिवाय सात पैकी चार महानगरपालिकांवरही काँग्रेसचाच झेंडा फडकला आहे. बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकांच्या निकालाने सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे.

तेलंगणात काँग्रेसची मुसंडी

तेलंगणात सात महानगरपालिकांसह ११६ नगर परिषदांसाठी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान घेण्यात आले होते. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने ही निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती, त्यामुळेच या निवडणुकीच्या निकालाकडे अनेक राज्यांचे लक्ष लागून होते. शुक्रवारी मतमोजणीचे कल हाती आल्यानंतर राज्यात काँग्रेसची जणू त्सुनामीच पाहायला मिळाली. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसने नगर परिषदांच्या निवडणुकीतील २,९९५ पैकी तब्बल १,५३७ प्रभागांमध्ये निर्णायक विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने ७८१ प्रभागांमध्ये बाजी मारली आहे.

भाजपाला पराभवाचा फटका

भारतीय जनता पक्षाला केवळ ३३६ प्रभागांमध्ये विजय मिळवता आला आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमला ७० आणि सीपीआयला केवळ १३ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. इतर १८३ प्रभाग अपक्ष उमेदवारांनी आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. त्याशिवाय सात पैकी चार महानगरपालिकांवरही काँग्रेसचाच झेंडा फडकला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा निकाल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठी बळकटी देणारा ठरला आहे. या निवडणुकांकडे काँग्रेसच्या शहरी जनाधाराची कसोटी तसेच डिसेंबर २०२३ मध्ये विधानसभा जिंकल्यानंतर स्थापन झालेल्या सरकारसाठी ‘मिनी जनमत चाचणी’ म्हणून पाहिले जात होते, त्यामुळेच खुद्द मुख्यमंत्री रेवंत रेड्डी व काँग्रेसचे दिग्गज नेते या निवडणुकांच्या प्रचारात उतरले होते. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत शह देण्यासाठी भाजपानेही राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली होती.

आणखी वाचा : बांगलादेशच्या निवडणुकीत विजय मिळवणारे हिंदू उमेदवार कोण? त्यांनी कोणाचा पराभव केला?

काँग्रेसने निवडणुकीत कसा केला प्रचार?

प्रचारादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा आढावा जनतेसमोर मांडला होता. आमचे लक्ष हैदराबादसह शहरी भागातील विकासकामांवर केंद्रित होते, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. निवडणुकांचा प्रचार ऐन जोमात असताना काँग्रेसच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना प्रामुख्याने लक्ष्य केले. तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केसीआर यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा संदेश काँग्रेसने मतदारांपर्यंत पोहोचवला. भाजपाही जातीय तेढ निर्माण करून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसने प्रचारादरम्यान केला होता, असे एका स्थानिक पत्रकाराने सांगितले.

विजयानंतर काँग्रेसचे नेते काय म्हणाले?

तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष महेश कुमार गौंड यांनी पक्षाच्या विजयावर आनंद व्यक्त केला. राज्यातील शहरी भागांनीही काँग्रेसला साथ दिली असून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विकासकामांवर विश्वास दर्शवला आहे, असे त्यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. राज्यात काँग्रेसला कडवी झुंज देणारा कोणताही पक्ष नाही. भारत राष्ट्र समिती पक्षासह भाजपाचा निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे, असेही ते म्हणाले. या विजयानंतर महेश कुमार गौंड यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हैदराबाद येथील गांधी भवन परिसरात एकच जल्लोष केला. दुसरीकडे- भारत राष्ट्र समिती पक्षातील नेत्यांनी काँग्रेसला कडवी झुंज दिल्याचा दावा केला. महापालिका आणि नगर परिषदांच्या अनेक जागांवर आमचे मतदार अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले असे त्यांनी सांगितले.

भाजपा व बीआरएसचा आरोप काय?

बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव पत्रकार परिषदेत म्हणाले की- आमचा पक्ष हा राज्यातील सत्ताधारी काँग्रेसविरोधातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. काही जागांवर आमचे उमेदवार कमी फरकाने पराभूत झाले असले तरीही बीआरएसने दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या आहेत. त्या तुलनेत भारतीय जनता पार्टी आमच्या खूपच मागे आहे. यादरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपाने या निकालांवर नाराजी व्यक्त करीत सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने या निवडणुकांमध्ये मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. एमआयएमसह बीआरएस आणि डाव्या पक्षांतील नेतेही फक्त आमच्याच पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न करीत होते, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र राव यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

हेही वाचा : भाजपाला फटका देण्याची शिंदे गटाची तयारी? ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा? काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

भाजपाला कोणकोणत्या जागांवर यश?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असली तरीही भाजपासाठीही हा निकाल दिलासा देणारा ठरला आहे. मागील महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपाने चांगली कामगिरी केली असून पक्षाच्या मताधिक्यातही वाढ झाली आहे. भाजपाला सर्वात मोठे यश करीमनगर, निजामाबाद येथे मिळाले आहे. करीमनगरमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा नगराध्यक्ष होणार आहे. लोकसभा खासदार व केंद्रीय मंत्री संजय कुमार यांनी काही नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक यश मिळवून दिले आहे. तेलंगणात भाजपाच्या मतांची टक्केवारी सातत्याने वाढून २० टक्के इतकी झाली आहे, त्यामुळे भाजपाचा वाढता आलेख हा भारत राष्ट्र समिती पक्षाची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे.

काँग्रेसची पुढची रणनीती काय?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील यशामुळे सत्ताधारी काँग्रेसचा आत्मविश्वास आणखीनच बळकट झाला आहे. आगामी काळात होणाऱ्या हैदराबाद महापालिकेसह मुख्य शहरी भागातील निवडणुकांसाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका, मलकाजगिरी महानगरपालिका आणि सायराबाद महानगरपालिकेत एकूण ३०० प्रभाग आहेत, त्यासाठी यावर्षीच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. नगरपालिकांपाठोपाठ हैदराबादच्या या मेगा निवडणुकांमध्येही सत्ताधारी काँग्रेसलाच यश मिळणार, असा दावा महेश गौड यांनी केला आहे.