संजय मोहिते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : शेगावच्या सभेसाठी काँग्रेसने जणू ‘दिवसाची रात्र’ करणे सुरू केले आहे. १९ एकर शेत, अडीच लाखांवर प्रेक्षक क्षमता, १८ सेक्टर अन ११ प्रवेशद्वार, अशी जय्यत तयारी जोरात सुरू आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशा भारत जोडो पदयात्रेवर निघालेले काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील दुसरी सभा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे १८ नोव्हेंबरला होणार आहे. ही सभा जंगी व्हावी यासाठी प्रदेश काँग्रेस, राज्यातील प्रमुख नेते ते जिल्हा काँग्रेस असेच सर्वच नियोजनात व्यस्त आहेत.

हेही वाचा… धुळ्यासाठी मंजूर ३० कोटींच्या निधीचे म्हणणे तरी काय ? श्रेयवादावरून एमआयएम विरुध्द भाजप जुगलबंदी

ही सभा आता प्रदेश काँग्रेसच्या प्रतिष्ठेचाच प्रश्न झाला की काय, असे वाटावे इतकी ती काँग्रेसने गंभीरतेने घेतली आहे. कसेही करून सभा विक्रमी व्हावी व राज्यात तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या गेलेल्या पक्षातील मरगळ दूर सारून नवचैतन्य निर्माण करता यावे यासाठी अनेक दिग्गजांनी आपली राजकीय झूल दूर सारून व विशेष म्हणजे, पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण काही काळासाठी लांब ठेवून शेगावात मुक्काम ठाेकला आहे. आनंद सागर जवळील १९ एकर शेतजमिनीवर होणाऱ्या या सभेचे नियोजन देखील अभूतपूर्व म्हणावे असेच आहे. या मैदानाची प्रेक्षक क्षमता अडीच लाखांवर आहे. मागील मोकळ्या जागेत उभे राहून का होईना लाखाच्या आसपास प्रेक्षक सभा ऐकू शकतात. या सभेत तीन व्यासपीठ राहणार असून श्रोत्यांसाठी १८ सेक्टर आणि ११ प्रवेशद्वार असतील. या सभेची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात असून या तयारीवर काँग्रेस नेते बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा… अवंतिका लेकुरवाळे : समाजकारणातून राजकारणात

रिंगण सोहळयात ‘पावली’ खेळणार!

१८ नोव्हेंबर रोजी सकाळी राहुल गांधी हे बाळापूर (अकोला जिल्हा) येथून शेगाव येथे दाखल होतील. तिथे जंगी स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतर वरखेड येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या शिबिरात दाखल होणार आहेत. याठिकाणी उभारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या महाकाय मूर्तीसमोर रिंगण सोहळा पार पडणार आहे. पावली खेळणाऱ्या कमीअधिक एक हजार वारकऱ्यांसोबत ते काहीकाळ रमणार आहेत. यावेळी गांधी यांचा वारकऱ्यांचा वेश, टोपी व वीणा देऊन खास वारकरी पद्धतीने सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली. यानंतर संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यावर संध्याकाळी चारला जाहीर सभा प्रारंभ होणार आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : वाचा राज्यभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी एकाच क्लिकवर

जागीच पेयजल, फिरती प्रसाधन गृहे

या सभेला येणारी गर्दी लाखांमध्येच असणार हे गृहीत धरून किशोर पालडीवाल यांच्या १९ एकर सलग शेतीची सभेसाठी निवड करण्यात आली आहे. याठिकाणी सभेची तयारी करणारे संगमनेर (जिल्हा अहमदनगर) येथील महेश जोंधळे यांनी सांगितले, स्काय वॉकला समांतर व लागून असलेल्या जागेत ४० बाय १०० चे तीन व्यासपीठ राहणार आहेत. सभेची एकूण जागा ५०० बाय १४०० फूट इतकी विस्तीर्ण असून या मैदानाची प्रेक्षक क्षमता अडीच लाखांवर आहे. यासाठी अडीच लाख खुर्च्या लावण्यात येणार आहेत. या खुर्च्या खास इंदौर व मुंबईहून मागवण्यात आल्या आहेत. मैदानाची १८ सेक्टरमध्ये विभागणी केली जाणार असून प्रेक्षकांना कोणत्याही सेक्टरमधून सहजपणे येणे जाणे करता येणार आहे. तसेच प्रेक्षकांना बसल्या जागीच पिण्याचे पाणी मिळेल, असे सुसज्ज नियोजन असल्याचे जोंधळे यांनी सांगितले. सभास्थळी ११ प्रवेशद्वार राहणार असून पासेसच्या वर्गवारीनुसार निर्धारित द्वारातूनच प्रवेश मिळणार आहे. याशिवाय सहा ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था राहणार असून त्याचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले आहे. ही वाहनतळे सभेच्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर राहतील. सभेच्या ठिकाणी ‘एलईडी टीव्ही’असतील. व्यासपीठापासून ‘डी’ चे अंतर ६५ फूट राहणार असून पहिल्या रांगेत महत्त्वाची व्यक्ती व प्रसिद्धी माध्यमांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सभास्थळी फिरते प्रसाधन गुहे असतील.

हेही वाचा… “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य

मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील भारत जोडो पदयात्रा व सभेची जंगी तयारी करण्यात येत असल्याची माहिती आ. यशोमती ठाकूर व जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी शेगाव येथे भेटी देऊन नियोजनासंदर्भात बैठका घेतल्या. तसेच पदयात्रेचा मार्ग व सभास्थळाची पाहणी केली. मागील आठवड्यापासून मी व राहुल बोंद्रे शेगावात तळ ठोकून असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. याशिवाय स्थानिक नेते ज्ञानेश्वर पाटील, रामविजय बुरुंगले, शेलेंद्र पाटील, किरण देशमुख, तेजेंद्रसिंह हे शेगावातील कार्यक्रमाची विविध जबाबदारी सांभाळत आहेत. १८ तारखेला सकाळी पदयात्रा शेगाव येथे दाखल होणार आहे. यानंतर राहुल गांधी हे वरखेड येथे आयोजित रिंगण सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. दुपारी विश्रांती व श्रींचे दर्शन घेतल्यावर ते वाहनाद्वारे सभास्थळी दाखल होतील. संध्याकाळी चारच्या आसपास होणारी ही सभा विक्रमी होणार असा दावा माजी आमदार बोंद्रे केला. १८ तारखेला राहुल गांधी हे शेगाव येथील गजानन दादा मार्केट यार्ड येथे मुक्कामी राहणार आहेत. १९ तारखेला ते जलंब मार्गे जळगाव जामोदकडे रवाना होतील. भास्तन येथे त्यांची कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली असून भेंडवळ येथे ते मुक्कामी राहणार आहेत. २० तारखेला भारत जोडो यात्रा जळगाव जामोद तालुक्यातून मध्यप्रदेशकडे कूच करणार असल्याचेही या दोघा नेत्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress working on war footing for rahul gandhis mass public rally at shegaon print politics news asj
First published on: 15-11-2022 at 12:32 IST