यवतमाळ : पंधरा दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले ॲड. सचिन नाईक यांना पदभार घेताच विधान परिषद निवडणुकीच्या दिव्यास सामोरे जावे लागले. मात्र, त्यांनी स्वत: उमेदवारी घोषित केलेल्या उमेदवाराने पक्षासोबत गद्दारी करत, निवडणुकीतून माघार घेत थेट शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. या निवडणुकीत आपल्या नेतृत्वात काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील अशी स्वप्न रंगवत असताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांना मुहूर्तालाच अपयशास सामोरे जावे लागले. अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणात राहून पहिल्याच अनुभवात गृहमैदानावर ॲड. सचिन नाईक निवडणुकीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याची भावना काँग्रेस कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

ॲड. सचिन नाईक मागील १८ वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रीय स्तरावर कार्य करत आहेत. विविध निवडणुकांमध्ये अनेक राज्यात निरीक्षक म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. मागील तीन वर्षांपासून ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे प्रांताध्यक्षांच्या कार्यालयाचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी होती. संघटन कार्याचा प्रदीर्घ अनुभव असल्याने यवतमाळात रसातळाला गेलेल्या काँग्रेसला जिल्हाध्यक्ष म्हणून ते उभारी देतील, असा विश्वास सर्वांना होता. २० मे रोजी त्यांची नियुक्ती झाली. त्यांनतर लगेचच यवतमाळ विधान परिषद निवडणूक कार्यक्रम लागला. या निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीकडे अवघे १८० संख्याबळ असताना, २०२४ मध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पराभूत उमेदवार साहेबराव कांबळे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली.

उमेदवारी दाखल करताना झालेल्या सभेत ॲड. सचिन नाईक यांनी जोरदार भाषण केले. महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी असूनही ही निवडणूक ‘क्रॉस व्होटिंग’च्या बळावर महाविकास आघाडीच जिंकेल असा दावा काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी साहेबराव कांबळे यांच्या हातात हात घालून केला होता. त्यांचा नामांकन अर्ज दाखल करायला झाडून सारे काँग्रेस नेते उपस्थित होते. पण, रात्रीतूनच काँग्रेसचे नशीब फुटले. दोनच दिवसांत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी गुपचूप जिल्हाधिकारी कार्यालय गाठून, संख्याबळाचे कारण पुढे करत आपली उमेदवारी मागे घेतली.

आतापर्यंत दिल्लीतून राजकारण करणाऱ्या नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्षांना गल्लीतील राजकारणाचा हा पहिला जोरदार झटका होता. त्यानंतर आरोप, प्रत्यारोप सुरू झाले. तर काँग्रेसमध्ये खुर्चीला चिपकून बसलेल्या अनेक ज्येष्ठांनी तरुण जिल्हाध्यक्षांची ‘बरी जिरली’ म्हणत आपल्या भावनांना खासगीत वाट मोकळी करून दिली. साहेबराव कांबळे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आणि तिकडे मुंबईत शिवसेनेने त्यांच्यासाठी लाल गालिछा अंथरत त्यांच्या हाती भगवा दिला.

या सर्व घडामोडीत काँग्रेससोबतच विद्यमान मतदार नगरसेवकांचे नुकसान झाले आणि फायदा शिवसेनेचा झाल्याची चर्चा आहे. पुरेसे संख्याबळ नसताना साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेणारेच आता कांबळे यांच्या गद्दारीचा पाढा वाचत आहे. काँग्रेस आपल्याच लोकांकडून वारंवार तोंडघशी पडूनही अशा घटनांमधून धडा का घेत नाही, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. महायुतीसारख्या बलाढ्य राजकीय घटकांवर विजय मिळवण्यासाठी त्यांचीच ‘स्ट्रॅटेजी’ वापरण्याची सुबुद्धी काँग्रेसला का येत नसावी, असा प्रश्न पक्षातच विचारला जात आहे. संध्याछायेत वावरणाऱ्या पक्षाला उभारी देण्यासाठी नव्या दमाच्या, तरुण कार्यकर्त्यांच्या हाती पक्षाची सर्व सूत्रे गेल्याशिवाय आणि निवडणुकीत विश्वासापेक्षा साम-दाम-दंड-भेद अशा फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर केल्याशिवाय काँग्रेसला अच्छे दिन येणे अवघड असल्याची संतप्त भावना पक्षाचे सामान्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.