Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीला एका महिन्याचा अवधी शिल्लक आहे. यानिमित्त लोकप्रिय अशा बंगळुरू शहरावर कोणत्या पक्षाचे वर्चस्व असेल, यावर चर्चा सुरू आहे. कर्नाटकात भाजपाची सत्ता असली तरी बंगळुरू जिल्ह्यात मागच्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपा आणि जेडी(एस)पेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने बंगळुरू जिल्ह्यातील सर्व २५ जागा लढविल्या होत्या. मात्र २०१७ साली जेडीएस-काँग्रेसचे सरकार कोसळल्यानंतर भाजपाला या मतदारसंघात तीन आमदार वाढविण्याची संधी मिळाली. भाजपाने जेडीएस आणि काँग्रेसला काही प्रमाणात धूळ चारली असली तरी बंगळुरूमध्ये मागच्या दोन निवडणुकांत फारशी चमक त्यांना दाखवता आलेली नाही. २००८ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाला २८ पैकी फक्त १७ जागा मिळाल्या. २०१३ साली १२ आणि २०१८ साली ११ जागा जिंकता आल्या. त्याच वेळी काँग्रेसने २००८ साली १० जागा, २०१३ साली १३ आणि २०१८ साली १५ जागा जिंकल्या होत्या. २०१९ साली काँग्रेसच्या तीन आमदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. यात काँग्रेसचे नेते एस टी सोमशेखर (यशवंतपूर मतदारसंघ), ब्राती बसवराजू (क्रिष्णाराजापूरम) आणि मुनीरत्न (राजाराजेश्वरी नगर) यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर जेडीएसचे आमदार के गोपालाह्या (महालक्ष्मी) यांनीदेखील भाजपात प्रवेश केला होता. हे वाचा >> Karnataka Assembly Election 2023 Date: कर्नाटकात होणार निवडणुकीचा रणसंग्राम, आयोगानं जाहीर केलं वेळापत्रक २०१९ मध्ये एकूण १७ आमदारांनी काँग्रेस आणि जेडीएसची साथ सोडून भाजपाला पाठिंबा दिला होता. यांपैकी सर्वांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवून आपली आमदारकी शाबूत ठेवली. यामुळे भाजपाने २०१८ साली जिंकलेल्या ११ जागांमध्ये भर पडून त्यांची बंगळुरूमधील आमदारांची संख्या १५ वर पोहोचली. या वेळी बंगळुरूमध्ये चांगली कामगिरी होण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून गोपालाह्या आणि मुनीरत्ना यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बंगळुरू जिल्ह्यातील १६ उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. भाजपाच्या उमेदवार निवडीबाबत प्रतिक्रिया देताना एका नेत्याने सांगितले की, पक्ष या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे. जुन्या नेत्यांना या वेळी बाजूला सारले जाऊ शकते. तसेच ज्यांनी मंत्रिपदे भोगली आहेत, त्यांचाही उमेदवारीसाठी विचार न केला जाण्याची या वेळी शक्यता आहे. जेडीएस पक्षाचे बंगळुरू जिल्ह्यातील एकमात्र आमदार गोपालह्या यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर जेडीएसचे या ठिकाणी शून्य अस्तित्व आहे. त्यामुळेच कुमारस्वामी यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या जुन्या म्हैसूर क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. हे ही वाचा >> कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर बंगळुरूबाबत सर्वच राजकीय पक्षांना एक चिंता सतावते, ती म्हणजे गेल्या काही वर्षांपासून घसरत असलेली मतदानाची टक्केवारी. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बंगळुरू शहरात ५० टक्के एवढे मतदान झाले. त्याआधी २००८ च्या विधानसभा निवडणुकीत ४९.८७ टक्के मतदान झाले. २०१३ साली ५७.३८ टक्के मतदान झाले आणि २०१८ साली ५४.७३ टक्के एवढेच मतदान झाले. मतदारांचा निरुत्साह कमी करण्यासाठी बृहत बंगळुरू महानगरपालिका (BBMP), मुख्य निवडणूक आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तुषार गिरिनाथ यांनी सांगितले की, रहिवासी भागातील विविध सोसायट्यांसोबत आम्ही बैठका घेऊन मतदार जागृती मोहीम राबविली आहे. आम्हाला आशा आहे की, या वेळी जास्तीत जास्त लोक मतदानास बाहेर पडतील.