मुंबई : भारतीय संविधान बदलण्याचा भाजपा व संघ परिवाराचा घाट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आता खात्री देता येत नाही, अशी भीती व्यक्त करत संविधानावरील संकटाची माहिती सामान्यांपर्यंत पोचवण्याची पुरोगामी म्हणवणाऱ्यांवर जबाबदारी असून काळाची ती हाक आहे, असे आवाहन ‘वंचित बहुजन आघाडी’चे संस्थापक -अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दादरमधील ‘शिवाजी पार्क’वर ‘वंचित’ने मंगळवारी आयोजित केलेल्या भारतीय संविधान महासन्मान सभेमध्ये केले.
देशात विरोधी पक्ष शिल्लक नाही. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न पुढे येत नाहीत. माध्यमे वास्तव मुद्यावर बोलायला तयार नाहीत. जाती व धर्मामध्ये भांडणे लावली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरचे अनिवासी भारतीय अडचणीत आले आहेत. मोदी यांनी अनेक नवे प्रश्न निर्माण केले असून भारत आज धोकादायक राष्ट्र बनले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रे भारताशी मैत्री करायला धजावत नाही, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
भारतीय संविधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला बदलवायचे आहे. त्यांनी ते जरुर बदलवावे, पण तुमचे संविधान काय आहे, ते तरी प्रथम सांगा, असा सवाल आंबेडकर यांनी केला. राष्ट्रीय पक्षाचे जे हाल आहेत, ती पाळी उद्या प्रादेशिक पक्षांवर येणार आहे. त्यानंतर भाजपला एकट्याला रान असणार आहे. मनुवाद केवळ जातीयवाद नसून देशाचे विघटन करणारी विचारसरणी आहे. भाजपाला मत म्हणजे अशांततावाद्यांना मत, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कायद्यापेक्षा स्वत:ला मोठा समजतो. त्यामुळे ते संघटना नोेंदणी करत नाहीत. संघ जोपर्यंत नोंदणी करत नाही, तोपर्यंत आम्ही भांडत राहू. अगदी टोकाला जावू, असा इशारा आंबेडकर यांनी दिला.
मनुवादाला संपवण्याची ताकद केवळ आंबेडकरवादामध्ये आहे. बाबासाहेबांनी १९४९ रोजी या दिवशी संविधान सभेत संविधानावर शेवटचे भाषण केले होते. ज्या संविधानाला ते संपवू पाहात आहेत, त्या संविधानाच्या सन्मानार्थ शिवाजी पार्कवर सभा आयोजित केल्याचे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात म्हणाले केले.
यावेळी दिशा पिंकी- शेख, अरुण सावंत, रेखा ठाकूर, भिमराव आंबेडकर, सिद्धार्थ मोकळे, लक्ष्मण हाके यांनी विचार व्यक्त केले. समता सैनिक दलाने प्रकाश आंबेडकर यांना मानवंदना दिल्यानंतर सभेला प्रारंभ झाला. परभणी पोलीस अत्याचारात शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाईंच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. मुंबई महानगर क्षेत्र परिसरातून मोठ्या संख्येने ‘वंचित’चे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीचे रणशिंग –
मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व २२७ जागा स्वबळावर लढवणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शिवाजी पार्कवर संविधान महासभेचे आयोजन करुन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.
