राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये येत असताना, सिल्लोड मतदारसंघात आदित्य ठाकरे पोहचत असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरत राजकीय असभ्यतेच्या सीमा ओलांडल्या. वादग्रस्त विधाने आणि वर्तन ही अब्दुल सत्तार यांची ओळखच असली तरी सुप्रिया सुळे यांना उद्देशून वापरलेली शिवराळ भाषा ही सत्तार यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भारत जोडो यात्रेत विसर; भाजप खासदार चिखलीकरांनी घडवून आणली बैठक

वाद आणि अब्दुल सत्तार यांचे नाते तसे जुनेच. कार्यकर्त्यास लाथा-बुक्क्याने मारहाण केल्यामुळे काँग्रेसमध्ये असताना त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. अलिकडेच महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन महसूल राज्यमंत्री म्हणून काम करताना एकाच व्यक्तीच्या किती तक्रारींना ‘आशीर्वाद’ दिले याची माहिती न्यायालयात सादर करा, अशी चपराक दिल्यानंतरही सत्तार यांच्या वर्तनात आणि बोलण्याच्या शैलीत अजिबात फरक पडला, असे दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू पिता का असे अब्दुल सत्तारांनी विचारल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. तरीही सत्तार यांच्या वागण्यात बदल झालेला नाही. त्यातूनच त्यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी अपशब्द वापरले आणि नवा वाद ओढवून घेतला.

हेही वाचा- ‘भारत जोडो’ स्वागतासाठी ८० किलोमीटरचा परिसर सजला; तिरंगा, राहुल गांधींची हसरी प्रतिमा आणि अशोकराव चव्हाण यांच्या मुलीचेही फलक

बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप असे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना स्थान मिळणार की नाही, यावरून चर्चा सुरू झाल्या. त्यामागेही वाद होताच. शिक्षक पात्रता परीक्षेत स्वत:च्या नोकरदार मुलीला पात्र नसताना पात्रतेच्या यादीत मुलीचे नाव घुसविल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मंत्रिमंडळ स्थापनेपूर्वी कोणीतरी ते जाणीवपूर्वक केले असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण सत्तारांभोवतीचे वाद काही थांबले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकास त्यांनी एकदा झापले. तीही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली. सत्तार पुन्हा स्वत:भोवती वादाचे रिंगण आखत आले. मग अतिवृष्टी आली. ती एवढी अधिक होती की, काही ठिकाणी शेतात घोट्यापर्यंत पाणी होते. पण तरीही सत्तार म्हणाले, हा काही ओला दुष्काळ नाही. मग समाजमाध्यमांतून त्यांच्यावर पुन्हा जोरदार टीका झाली. ही टीका पुसली जावी म्हणून एका दिवसात त्यांनी औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांचा तातडीने दौरा केला. एका बाजूला हे सारे सुरू असतानाच मतदारसंघात आनंदशिधा मोफत वाटला. येणाऱ्या नेत्यांच्या गाड्यांसमोर प्रचंड गर्दी उभी करायची, त्यांच्या गाड्यांवर फुले उधळायला लावायची आणि त्यानंतर माध्यमांमध्ये वाद निर्माण करत चर्चेत राहायचे, अशी जणू त्यांची कार्यपद्धती आहे. वादांच्या जमिनींमध्ये एकाच व्यक्तीला ते का खूश करतात, असा प्रश्न उच्च न्यायालयानेही त्यांच्याबाबतीत विचारलेला आहे. हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याबद्दलही त्यांच्याभोवती वादाचे रिंगण होते. तेव्हा त्यांनी वापरलेली शिवराळ भाषाही अनेकांच्या लक्षात आहे.

हेही वाचा- भारत यात्रेत राहुल गांधींबरोबर चालताना सर्फराज काझीला दिसले बेरोजगारीचे विक्राळ रूप

शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसंवाद यात्रा सोमवारी सिल्लोड येथे येणार होता. त्याचवेळी सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा आयोजित केली. आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार, असे नंतर जाहीर करण्यात आले. मग श्रीकांत शिंदे यांनीही शेतीची पाहणी करण्याचे ठरविले. कुरघोडीच्या या खेळात माध्यमांमध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेची चर्चा अधिक होऊ शकते, असे चित्र असल्याने सत्तार यांनी वादाचे रिंगण राष्ट्रवादीभोवती आखले. त्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घरावर दगडफेक केली. राज्यभर सत्तार यांचे पुतळे जाळले गेले. सत्तार यांनी वादाची कक्षा आणखी वाढविली. महिलांविषयी मी काही बोललो नाही, असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला खरा. पण त्यातही भाषेचा उर्मट सूर त्यांनी कायम ठेवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका झाली. सत्तार हे नेहमीच वादाच्या रिंगणात असतात. तरीही सत्ताधाऱ्यांना त्यांना दूर करता येत नाही, हे ते काँग्रेसमध्ये असतानाचे चित्र भाजपचा जोडीदार म्हणूनही कायम आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial statements and offensively behavior is the identity of abdul sattar print politics news dpj
First published on: 07-11-2022 at 20:21 IST