गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मोठी पीछेहाट झाल्यानंतर भाजपमध्ये विधानसभेसाठी गटबाजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षातच गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी विरुद्ध इच्छुक असे चित्र निर्माण झाले आहे.काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपला जोरदार फटका बसला. पक्षांतर्गत विरोधानंतरही नेतृत्वाने शेवटच्या क्षणी माजी खासदार अशोक नेते यांनाच उमेदवारी दिली होती. तब्बल १ लाख ४१ हजार मतांनी भाजपचा पराभव झाला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नवा चेहरा देणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. यातूनच पक्षांतर्गत गटबाजीला उधाण आल्याचे चित्र आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाजपने काढलेल्या तिरंगा रॅलीमध्ये आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अनुपस्थितीची चर्चा होती. दुसरीकडे त्यांनी स्वतंत्र रॅली काढून शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केला. त्यानंतरही शहरात होत असलेल्या विविध कार्यक्रमात हेच चित्र दिसून येत आहे. भाजपाकडून सलग दोन वेळा गडचिरोली विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार डॉ. होळी यांच्यावर ‘मेक इन गडचिरोली’ उपक्रमात झालेल्या कथित घोटाळ्याचे आरोप आणि वादग्रस्त विधान यावरून कायम चर्चेत असतात. त्यामुळे यावेळी भाजप नेतृत्व उमेदवार बदलू शकतात, अशी चर्चा आहे. त्यांच्याऐवजी संघ परिवाराच्या खास मर्जीतील डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासाठी भाजपामधील एक गट आग्रही आहे. लोकसभेसाठी संघाकडून त्यांचे नाव पुढे करण्यात आल्याने ते चर्चेत आले होते. डॉ. नरोटे हे भाजपच्या आदिवासी आघाडीचे पदाधिकारी असून विधानसभेसाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या पाठोपाठ लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आणि माजी खासदार अशोक नेते देखील उत्सुक असून विधानसभा क्षेत्रात त्यांनी दौरे सुरु आहे. त्यामुळे भाजप नेतृत्व याठिकाणी नवा चेहरा देणार की जुन्यांनाच पुन्हा संधी देणार, याविषयी पक्षातील कार्यकर्ते व नेते संभ्रमात आहे.

हेही वाचा >>>‘श्रीमंत बहिणी’ही सरकारी योजनेच्या लाभार्थी, अजित पवार यांना आला अनुभव

“ विधानसभा निवडणुकीसाठी आमचा पक्ष ताकदीने कामाला लागला असून गडचिरोली विधानसभेसाठी अनेकांनी दावा केला आहे. त्या दृष्टीने इच्छुक उमेदवार प्रयत्न करीत आहेत. शेवटी अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाच्या हाती असून पक्षात कुठलीही गटबाजी नाही.”- प्रशांत वाघरे, जिल्हाध्यक्ष, भाजप, गडचिरोली