नागपूर: शिवसेना फोडल्याबद्दल भाजपने मुख्यमंत्रीपद दिल्याने सुखावलेले एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपद काढून घेतल्याने भाजपवर नाराज आहेत. त्यांची नाराजी या- ना त्यानिमित्ताने प्रगट होते. त्याला कधी कधी पक्षविस्तार कारणीभूत ठरते. नागपूर हा भाजपचा गढ. तेथे पक्षविस्तार करायचा म्हणजे एकप्रकारे भाजपला शह देणे होय. त्यामुळे असे काही करताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक ठरते. पण शिवसेनेने ( शिंदे गट) अशी काळजी न घेताच खुद्द एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इतर पक्षातील नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतला. यावेळी गर्दीत एका कुख्यात गुंडाचाही पक्ष प्रवेश झाला आणि त्या निमित्ताने झालेल्या टीकेमुळे शिवसेनेला तोंडावर आपटण्याची वेळ आली.
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्याचाच भाग म्हणून शनिवारी उपराजधानी नागपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख राजू तुमसरे, माजी नगरसेविका अलका दलाल, अजय दलाल यांच्यासह उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही माजी नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.कार्यक्रमात एक असा प्रवेश घडला ज्यामुळे संपूर्ण शहरात चर्चेला तोंड फुटले.
कुख्यात गुंडाचा पक्षप्रवेश
नागपूरचा कुख्यात गँगस्टर युवराज माथनकर शिवसेनेत दाखल झाला. मकोका सारख्या गंभीर आरोपांतून कारागृहात गेलेल्या माथनकरचा हा प्रवेश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सर्वांच्या नजरेत आला. या व्हिडिओत माथनकर थेट उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन शिवसेनेचा उपरणे स्वीकारताना दिसत आहे. युवराज माथनकर नागपूरमध्ये कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर खंडणी, खून अशा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
२०१६ मध्ये नागपूरमधील एका बिल्डरला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. इतकेच नव्हे, तर त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यात आला होता. नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. मात्र, बहुतांश प्रकरणांत तो निर्दोष सुटल्याचे समजते. असे असले तरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने सत्ताधारी शिवसेनेत खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
कार्यक्रमानंतर माध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणावर विचारले असता त्यांनी सांगितले की, “स्थानीय पातळीवर कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय तेथील पदाधिकाऱ्यांचा असतो. परंतु कोणत्याही वादग्रस्त व्यक्तीला पक्षात घेऊ नये, याची काळजी स्थानिक नेतृत्वाने घ्यावी.”
दरम्यान, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माथनकरच्या प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा देण्यास नकार दिला आहे. तसेच माथनकरने प्रवेशानंतर फार वेळ कार्यक्रमात न थांबता तात्काळ तेथून निघाला. मात्र व्हिडिओमुळे या प्रकरणाने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिवसेनेने पक्ष प्रवेश नाकारला
शिवसेना नागपूर लोकसभा जिल्हा प्रमुख सुरज गोजे यांनी यासंदर्भात एका निवेदन प्रसिध्दीला दिले असून त्यात माथनकर याचा पक्ष प्रवेश झाल्याचे नाकारले आहे. कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीत युवराज माथनकर उपस्थित असल्याचे आणि त्याने पक्ष प्रवेश केल्याची माहिती मिळाली. याबाबत स्थानिक पदाधिकारी यांच्या कडून माहिती घेतली असता त्यांचे नाव पक्षप्रवेश करणा-यांच्या यादीत नव्हते, असे गोजे यांनी स्पष्ट केले.
व्हिडिओ कोणी व्हायरल केला
एका गुंडावे शिवसेनेत प्रवेश केल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमापर्यत कोणी पोहचवला? त्याच्यावर किती आणि कशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत याची सखोल माहिती कोणी काढली याबाबतही जोरात चर्चा सुरू झाली आहे.