देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनेही त्याच पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ सुरु केली आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी देशातील स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘भारत जोडो यात्रा’ नुकतीच केरळमधून कर्नाटकमध्ये पोहचली आहे. गुरुवारी ( २९ सप्टेंबर ) केरळमधील मलप्पुरमम जिल्ह्यात ‘भारत जोडो यात्रे’च्या समारोप करण्यात आला. त्यानंतर ट्वीट करत राहुल गांधी जनतेचे आभार मानले. “जिथे तुम्हाला प्रेम मिळतं, तेच तुमचं घरं असते. केरळ हे माझ्यासाठी घरचं आहे. येथील जनतेने मला नेहमीच प्रेम दिलं. त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी आहे. धन्यवाद,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

मात्र, केरळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष ( सीपीएम ) आणि काँग्रेसमध्ये ‘भारत जोडो यात्रे’वरून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू होत्या. त्यांच्या केंद्रस्थानी होता ‘पराठा’. मागील आठवड्यात राहुल गांधी यांच्यासमोर चहा आणि पराठ्याचे ताट असल्याचा फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाला. यावरून काँग्रसेने आपल्या ताटातील अन्य गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे, असा टोला सीपीएमने लगावला होता.

तर, सीपीएमची युवक संघटना डेमोक्रॉटिक युथ फेडरेशने तर त्रिशूरच्या पुथुक्कडमध्ये राहुल गांधींचे पराठा खातानाचे बॅनर लावले होते. त्यावर लिहलं होतं, “संघर्ष हा उपाय आहे, पराठा नाही.” हे बॅनर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फाडले होते. पण, त्यानंतर ‘भारत जोडो यात्रे’च्या मार्गावर ठिकठिकाणी डेमोक्रॉटिक युथ फेडरेशने हे बॅनर लावले होते.

त्यानंतर मलप्पुरममध्ये सीपीएमने बॅनरबाजी करत येथील ‘बिर्याणी पराठापेक्षा अधिक लोकप्रिय आहे,’ असं लिहलं. या बॅनरबाजीला काँग्रेसने प्रत्युत्तर देत कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, ‘आपला संघर्ष भाजपा आणि आरएसएस विरुद्ध आहे, शांत रहावे.’ तर, काँग्रेस नेते आणि माजी आमदार व्ही. टी. बलराम यांनी सीपीएम कार्यालयाबाहेर उभारलेले कार्यकर्ते ‘भारत जोडो यात्रा’ पाहत असलेला फोटो समाजमाध्यमावर टाकला होता.