तमिळनाडू राज्यामध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्यांचे सत्र सुरू आहे. यावरून सध्या तमिळनाडूतील राजकारण तापले असून सत्ताधारी द्रमुक पक्षावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या महिन्यामध्ये तब्बल पाच राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पाचही हत्यांमागे कोणतेही राजकीय कारण नसून वैयक्तिक वैर आणि टोळीयुद्धातून या हत्या घडल्या असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, या हत्यांमध्ये गुंतलेल्या लोकांचे राजकीय संबंध असल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हत्यांमागे कोणताही राजकीय हेतू आढळून आलेला नाही. हेही वाचा : “माध्यमकर्मींना काचेच्या पिंजऱ्यात का बंद केलंय?” राहुल गांधींचा सवाल; करोना काळापासून लागू असलेले निर्बंध अद्याप तसेच सर्वांत आधी राज्यामध्ये तमिळनाडूतील बहुजन समाज पार्टीचे प्रमुख के. आर्मस्ट्राँग यांची हत्या झाल्यानंतर वातावरण ढवळून निघाले. ६ जुलै रोजी झालेली ही हत्या टोळी युद्धातून झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. के. आर्मस्ट्राँग यांच्यावर अनेक गुन्हेगारी खटले दाखल होते. २०२३ मध्ये अक्रॉट सुरेश यांच्या हत्येमागे आर्मस्ट्राँग यांचाच हात आहे, असे आर्मस्ट्राँग यांच्या हल्लेखोरांना वाटते. त्याबद्दलच्या सूडभावनेतूनच हल्लेखोरांनी आर्मस्ट्राँग यांची हत्या केली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येनंतर राज्यातील दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक पा. रंजित यानेही हा मुद्दा उचलून मोठा मोर्चा काढला होता. विशेष म्हणजे अक्रॉट सुरेश आणि के. आर्मस्ट्राँग हे दोघेही दलित समाजाचे होते आणि चेन्नईमध्ये दोन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या वादात अडकले होते. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक केली असून त्यांनी या हत्येमागे राजकीय किंवा जातीय हेतू असल्याचा दावा पूर्णपणे नाकारला आहे. या हत्येच्या दहा दिवसांनंतर नाम तमिलार काचीचे मदुराई नॉर्थचे उपसचिव सी. बालसुब्रमण्यम यांचीही मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बालसुब्रमण्यम यांच्यावरही २० गुन्हेगारी खटले होते. त्यांनी आपल्या भाचीच्या पतीच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्यासाठी राजकीय संबंधांचा वापर केला आणि सूडाच्या भावनेतून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी या हत्येमागे राजकीय हेतू असल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. त्यानंतर तमिळनाडूमध्ये आणखी तीन राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे मानले जात आहे. शनिवारी रात्री शिवगंगाजवळ भाजपाचे जिल्हा पदाधिकारी सेल्वकुमार यांची हत्या झाली असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या मुक्कालथूर समाजाचेच दोन उपसमूह म्हणजेच मारावर आणि आगमुडायर समुदायांमधील दीर्घकाळ चाललेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी असा दावा केला आहे की, सेल्वकुमार यांच्यावर चार गुन्हेगारी खटले दाखल होते. त्यांना २०१९ मधील एका हत्येचा बदला म्हणून लक्ष्य करण्यात आले. हेही वाचा : केंद्र सरकारचा इतका ‘महाराष्ट्र द्वेष’ कशासाठी? महामार्गांच्या दुर्दशेवरून आदित्य ठाकरे यांचा सवाल रविवारी सकाळी सहा जणांच्या एका टोळीने कन्याकुमारी येथील काँग्रेस नगरसेवकाच्या पतीची हत्या केली आहे. जॅक्सन असे त्यांचे नाव असून डिसेंबरमध्ये ड्रायव्हिंगच्या वादातून ही हत्या झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातील दोन जणांना सोमवारी अटक केली आहे. दरम्यान, रविवारी पहाटे एआयएडीएमके पक्षाचे पदाधिकारी पद्मनाभन यांचीही कुड्डालोरमध्ये हत्या करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या एका हत्येप्रकरणी पद्मनाभनचे नाव समोर आले होते. त्या प्रकरणामध्ये पीडितेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पीडितेच्या नातेवाईकांचा समावेश आहे. राज्यात हत्यांची ही मालिका सुरूच असून विरोधकांनी आता त्यावरून सत्ताधारी द्रमुकला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एआयएडीएमके पक्षाचे प्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी २०२४ मध्ये ५९५ खून झाल्याचा दावा केला आहे. तसेच हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना स्वायत्तता देण्याचीही मागणी केली. राज्य भाजपाचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी द्रमुक सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत, त्यांच्या राजवटीत असामाजिक घटक फोफावत असल्याचा दावा केला आहे. गेल्या चार वर्षांतील आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, तमिळनाडूमध्ये जानेवारी ते जून या कालावधीत दिवसाला सरासरी चार खून होतात. २०२० मध्ये राज्यात ७७० खून झाले होते, म्हणजेच दिवसाला सरासरी चार खून होत होते. पुढील वर्षी या कालावधीमधील खुनाची संख्या किरकोळ वाढून ७७४ वर पोहोचली. २०२२ मध्ये राज्यात वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ८१६ हत्या झाल्या, तर २०२३ आणि २०२४ मध्ये राज्यात अनुक्रमे ७७७ आणि ७७८ खून झाले.