लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपाशासित राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या असताना तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचाराचा प्रश्न लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी जाणीवपूर्वक उपस्थित केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

राज्यातील महायुती सरकार हे गुजरातधार्जिणे असल्याचे आम्ही सातत्याने सांगत आहोत, त्याचा प्रत्यय पुन्हा आला. नारपार योजनेतील १२६ टीएमसी पाण्याचा ५० टक्के वाटा खान्देशाला मिळावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. पण, या नदीजोड योजनेतून राज्याच्या वाट्याला १० टीएमसी पाणी येणार आहे. उर्वरित पाणी गुजरातला देण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतला आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

हेही वाचा >>>BJP : भाजपा ‘वृद्धांचा’ पक्ष ? विरोधक तरुण नेत्यांना संधी देत असताना पार्टीसमोरचं वयोवृद्धांचं आव्हान?

गांधी-नेहरू कुटुंबावर टीका करताना भाजपामधील परिवारवादाकडे पंतप्रधानांनी पूर्ण दुर्लक्ष केले. आजच्या भाषणात शेतकरी, कामगार, जवान, बेरोजगार तरुण या विषयांवर पंतप्रधानांनी काही भाष्य केले नाही, असे पटोले यांनी अधोरेखीत केले.