अविनाश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : पक्षाकडून उमेदवारी केली काय किंवा अपक्ष लढलो काय, विजय निश्चित असल्याचा जबरदस्त आत्मविश्वास असल्याने भविष्यातील राजकीय वाटचालीचे गुपित निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत जाहीर न करण्याची चलाखी दाखविणारे सत्यजित तांबे त्यामुळेच कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे पाठिंबा न देताही सर्वपक्षीय विजयी उमेदवार ठरले. प्रथमपासूनच काँग्रेस अंगात भिनलेल्या तांबे घराण्यातील ही धाकली पाती घराण्याची परंपरा पुढे चालविणार की, सत्ताधारी भाजपकडे खेचली जाणार, हे बघणे आता महत्वपूर्ण ठरेल.

अर्ज भरतानाचे डावपेच, काँग्रेसवर ओढावलेली नामुष्की आणि भाजपचा पडद्याआडून पाठिंबा अशा रंगतदार घटनाक्रमाने भारलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा २९ हजार ४६५ मताधिक्याने पराभव केला. विजयासाठी ५८ हजार ३१० मतांचा कोटा असताना तांबे यांनी पहिल्या पसंतीच्या मतांवरच कोटा पूर्ण करुन विजय मिळविला. तांबे यांना ६८,९९९ तर, पाटील यांना ३९,५३४ मते मिळाली.

हेही वाचा… कोकणात भाजपची रणनीती फळाला

नाशिक पदवीधरची निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यापासून राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिली. त्याचे कारणही तसेच. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर विखेंव्यतिरिक्त पकड बसविणाऱ्या थोरात-तांबे घराण्याशी संबंधित हे प्रकरण होते. सलग तीनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसने एबी अर्ज दिलेला असतानाही ऐनवेळी माघार घेऊन पुत्र सत्यजित तांबे यांना अपक्ष रिंगणात उतरविले. डाॅ. तांबे यांना मुलालाच उमेदवार म्हणून पुढे करायचे होते तर, त्यांनी काँग्रेसचा पर्याय का निवडला नाही, हा प्रश्न चर्चत आला. त्यामुळेच या सर्व घडामोडींमागे भाजपचे डावपेच असल्याची चर्चा रंगली. भाजपनेही उमेदवार उभा न करण्याचा चाणाक्षपणा दाखवित डावपेच अधिकच गहिरे केले. तांबे यांना शेवटपर्यंत अधिकृतपणे पाठिंबा जाहीर करण्याचे टाळणाऱ्या भाजपने स्थानिक पातळीवर कार्यकर्तेच काय ते ठरवतील, अशी भूमिका घेऊन नेमकं काय शिजत आहे, हे दाखवून दिले.

हेही वाचा… औरंगाबादमध्ये विक्रम काळे यांचे सलग चौथे यश अवघड का बनले ?

भाजपने उमेदवारी नाकारलेल्या अपक्ष शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने प्रथम पाठिंबा दिल्यावर महाविकास आघाडीला त्यांच्यामागे उभे असल्याचे जाहीर करण्यावाचून गत्यंतर राहिले नाही. परंतु, शेवटपर्यंत महाविकास आघाडी पाटील यांच्यामागेच उभी राहिली. आघाडी पुढे आल्याचे दिसलेच नाही. एकट्या ठाकरे गटानेच थोडाफार नेट लावण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… Maharashtra Latest Breaking News Today : अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी; भाजपाचा पराभव

कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार नसणाऱ्या या निवडणुकीतील प्रचार जसजसा पुढे सरकत गेला. त्याप्रमाणे चित्र अधिकच स्पष्ट होत गेले. तांबे यांच्यासाठी भाजप काँग्रेस, राष्ट्रवादीसह जणूकाही संपूर्ण नगर जिल्हा कार्यरत राहिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सत्यजित यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित यांच्या बंडखोरीविषयी अवाक्षरही काढले नसले तरी त्यांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रातील सर्व संस्था ही निवडणूक म्हणजे घरातील कार्य असल्याप्रमाणे कामाला लागल्या होत्या. निवडणूक जाहीर झाल्यापासून तर संबंधित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, प्राध्यापक वर्ग निवडणूक एके निवडणूक हाच धडा घोकत होते, अशी चर्चा रंगली. शिवाय नगर जिल्ह्यातीलच अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी तर थेट नाव न घेता या निवडणुकीत मतदारांना पैठणी, पैशांचे वाटप झाल्याचा आरोपही केला.

निकालानंतरचे तांबे-थोरात घराण्याचे राजकारण आता कोणते वळण घेणार,याची काँग्रेसपेक्षाही भाजपला अधिक उत्सुकता असणार. भाजपने तर सत्यजित यांना आपल्याकडे येण्याचे थेट निमंत्रणच दिले आहे. उमेदवारीवरुन जे झाले ते संपले, असे समजून काँग्रेसपुढेही आता तांबे पिता-पुत्रांविरुध्दचे निलंबन मागे घेण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस याबाबत कायमच लवचिक राहिली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून निकाल लागेपर्यंतच्या राजकीय नाट्यात बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे कोणतीही भूमिका न मांडणे काँग्रेससाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. तांबे घराणे पक्षापासून दूर जात असल्याचा राजकीय दबाव निश्चितच काँग्रेसवर राहणार आहे. त्यामुळेच थोरात यांनी पुढे येणे, काँग्रेससाठी तर, सत्यजित यांनी लवकर भूमिका मांडणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity about satyajeet tambe next stand after victory in election print politics news asj
First published on: 03-02-2023 at 13:28 IST