प्रबोध देशपांडे

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात गत सलग चार निवडणुकांमध्ये एकहाती विजय मिळवणाऱ्या भाजपने आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी आत्तापासून तयारीवर जोर दिला. भाजपचा उमेदवार कोण राहणार याची चर्चा रंगत आहे. महाविकास आघाडी सुद्धा जोमाने कामाला लागली असून सातत्याने पराभव पचवणाऱ्या काँग्रेसने जागा वाटपात पुन्हा एकदा अकोला मतदारसंघावर दावा केला. वंचित आघाडीच्या भूमिककडे देखील लक्ष राहील. आगामी लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातील समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.

Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Three candidates named Anant Geete have apply for Lok Sabha election from Raigad Constituency
रायगडमध्ये नामसाधर्म्य उमेदवारांची पंरपरा यंदाही कायम, तीन ‘अनंत गीते’ निवडणुकीच्या रिंगणात
bihar pariwarvad bjp candidates for loksabha
घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी
Mahayuti candidate is not announced but election committee is announced
महायुतीचा उमेदवार जाहीर नाही पण, निवडणूक समिती जाहीर

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. निवडणुकीत पोषक वातावरण राहण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांकडून राजकीय मशागत केली जात आहे. त्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी देशातील लोकसभा मतदारसंघनिहाय नियोजन केले. दरम्यान, अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. पश्चिम विदर्भात भाजपचे अकोल्यातून संजय धोत्रे एकमेव खासदार आहेत. लोकसभेच्या गेल्या चार निवडणुकांमध्ये तिरंगी लढतीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत खासदार संजय धोत्रेंनी दोन दशकांपासून आपला निर्विवाद दबदबा कायम ठेवला. त्याचे बक्षीस म्हणून खा.संजय धोत्रेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. शिक्षण, दूरसंचार व तंत्रज्ञान आदींसह महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रभावी कामगिरी केल्यावरही प्रकृतीच्या कारणामुळे २६ महिन्यांच्या कार्यकाळातच खा.धोत्रेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. भाजपला आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. आरोग्याच्या कारणावरून आगामी लोकसभा निवडणूक खा. संजय धोत्रे लढणार नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. लोकसभेची उमेदवारी धोत्रे कुटुंबात दिली जाते की इतर दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेचा फड रंगतो. संजय धोत्रे यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे किंवा पूत्र अनुप धोत्रे यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे.

हेही वाचा… शिवसेनेच्या जागेवर काँग्रेसचा दावा

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रधणीर सावरकर यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र, लोकसभेत जाण्याऐवजी राज्यात विधिमंडळातच कायम राहण्याकडे आ. सावरकर यांचा कल दिसून येतो. त्यामुळे भाजपची उमेदवारी धोत्रे कुटुंबातच जाण्याची दाट शक्यता आहे. एनवेळी एखादे अनपेक्षित नाव देखील समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात महाविकास आघाडीने जागा वाटपावरून बोलणी सुरू केली. अकोला मतदारसंघात स्वबळावर काँग्रेस किंवा वंचितला गेल्या तीन दशकात यश मिळवता आलेले नाही. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. त्रिकोणी लढतीचा नेहमी भाजपला फायदा झाल्याचा इतिहास आहे.

हेही वाचा… विरोधकांच्या बैठकीआधीच वर्चस्वाचा वाद चव्हाट्यावर

‘मविआ’मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाची शिवसेना एकत्र आहे. वंचित आघाडीने ठाकरे गटासोबत युती केली असली तरी ते अद्याप ‘मविआ’तील घटक पक्ष नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये ॲड.प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेसच्यावतीने झाले. मात्र, बोलणी फिस्कटली आणि स्वबळावर सलग चार पराभवाचा सामना करावा लागला. पाडापाडीचे राजकारण रंगले. आता ‘मविआ’मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने मतदारसंघावर दावा केला आहे. स्थानिक नेत्यांनी आढावा बैठकीत आपणच लढावे, असा आग्रह काँग्रेसच्या वरिष्ठांकडे धरला. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेस नेत्यांचे मनोबल उंचावले आहे. दुसरीकडे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपले पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. वंचित आघाडीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उमेदवार ठरले नसले तरी प्रमुख पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहेत.

१९८९ पासून काँग्रेसची पराभवाची मालिका

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सातत्याने निवडणूक लढून देखील १९८९ पासून काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. १९८४ मध्ये मधुसूदन वैराळे काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते. पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असेल.

भाजपाध्यक्ष प्रचाराचे रणशिंग फुंकणार

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सूक्ष्म नियोजनावर भर दिला. विविध उपक्रम, विकास कामांच्या कार्यक्रमांमधून जनसंपर्कावर जोर दिला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.जे.पी. नड्डा १४ जूनला अकोल्यात जाहीर सभा घेऊन प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. इतर वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्याचे देखील नियोजन आहे.