पवारांची डी.लिट. : नांदेडला देणगी तर औरंगाबादेत वादाची ठिणगी! | D.Litt for Sharad pawar, Controversy in Aurangabad at University program | Loksatta

पवारांची डी.लिट. : नांदेडला देणगी तर औरंगाबादेत वादाची ठिणगी!

मराठवाड्यातील चारही विद्यापीठांकडून मानद पदवीने सन्मानित झालेले ‘एकमेव,’ अशी नोंदही त्यांच्या नावावर झाल्याचे दिसून येते.

पवारांची डी.लिट. : नांदेडला देणगी तर औरंगाबादेत वादाची ठिणगी!
पवारांची डी.लिट.: नांदेडला देणगी तर औरंगाबादेत वादाची ठिणगी!

संजीव कुळकर्णी

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना गेल्या ९ वर्षांत मराठवाड्यातील चारही विद्यापीठांनी डी.लिट. या मानद पदवीने गौरविले. यांतील नांदेडच्या विद्यापीठाची पदवी स्वीकारताना पवारांनी या विद्यापीठाला घसघशीत देणगी दिली; पण मागील आठवड्यात औरंगाबादच्या विद्यापीठात त्यांच्या अशाच सन्मानप्रसंगी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यातून पडलेली वादाची ठिणगी चांगलीच पेटली आहे. पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या अर्धशतकीय कालखंडात त्यांच्या शिरपेचात अनेक मान-सन्मान खोवले गेले; पण मराठवाड्यातील चारही विद्यापीठांकडून मानद पदवीने सन्मानित झालेले ‘एकमेव,’ अशी नोंदही त्यांच्या नावावर झाल्याचे दिसून येते.

सार्वजनिक जीवनात पवारांचा राजकारणाशिवाय इतर अनेक क्षेत्रांमध्ये कृतिशील सहभाग राहिला. पण कृषी आणि या क्षेत्राशी संबंधित संस्थांमध्ये ते जास्त रमले. या पार्श्वभूमीवर परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने २०१३ साली त्यांना मानद पदवीने गौरविले. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ आणि औरंगाबादच्या एमजीएम विद्यापीठातही त्यांचा असाच सन्मान झाला. आता पवारांनी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘डी.लिट.’ पदवी नुकतीच स्वीकारली. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ही पदवी बहाल केली. याप्रसंगी राज्यपालांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ माजल्यानंतर पवारांनी नांदेडच्या विद्यापीठाला देणगी दिली; पण औरंगाबादच्या विद्यापीठाची थैली रिकामी ठेवल्याची बाबही चर्चेत आली आहे.

हेही वाचा… गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान

२०१५ साली पवारांच्या वयाला ७५ वर्षे आणि त्यानंतर दोन वर्षांनी त्यांच्या संसदीय कारकिर्दीत ५० वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधत, नांदेडच्या मराठवाडा विद्यापीठाने फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांचा मानद पदवीने सन्मान केला. या विद्यापीठाच्या स्थापनेचा निर्णयही पवारांनी १९९४ साली केला होता. या जुन्या ऋणानुबंधाचा धागा घट्ट करण्यासाठी पवारांनी आपल्या पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नांदेड विद्यापीठाला ५० लाखांची देणगी दिली होती. त्यातून विविध विषयांतल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याची योजना नंतर अंमलात आली. ती व्यवस्थित सुरू असल्याचे या विद्यापीठातून सांगण्यात आले.

हेही वाचा… राहुल यांची शेगाव सभा विक्रमी, पण जनमानसावर परिणाम किती ?

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड या दोन विद्यापीठांनी आजवर विविध क्षेत्रांतील दिग्गज, नामवंतांना ‘डी.लिट.’ ने गौरविले आहे. या उपक्रमात राजकीय क्षेत्रांतील यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, एन.डी.पाटील, नितीन गडकरी प्रभृतींचा मानद पदवीने सन्मान झाला; पण विद्यापीठासारख्या संस्थेच्या तिजोरीत भर घालण्याचे औदार्य केवळ पवार यांनी नांदेडमध्ये दाखविले. या पार्श्वभूमीवर त्यांनी ज्या विद्यापीठाचा नामविस्तार करून एक जुना वाद संपुष्टात आणला, त्या औरंगाबादच्या विद्यापीठाच्या वाट्याला डी.लिट. पदवीदान सोहळ्यानंतर देणगी नव्हे, तर वादाची ठिणगी आली.

हेही वाचा… महेश लांडगे : क्रीडाप्रेमी आमदार

३७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

नांदेड विद्यापीठाने शरद पवार यांच्या ५० लाखांच्या देणगीचे पाच भाग केले आहेत. या रकमेवर मिळणारे व्याज शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी वापरले जाते. यातील शारदाबाई पवार शिष्यवृत्ती केवळ मुलींसाठी असून गणित व जैवतंत्रज्ञान या विषयांतील गुणवान आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थिंनींची या शिष्यवृत्तीसाठी निवड होते. इतर शिष्यवृत्तींना महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण व श्यामराव कदम यांची नावे आहेत. गेल्या ५ वर्षांत ३७ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 13:39 IST
Next Story
गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान