मोहन अटाळकर अमरावती : दहीहंडी या धार्मिक सणाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर करण्याचा प्रकार नवीन नसला, तरी अमरावती जिल्ह्यात मात्र खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी निवडणुकीपुर्वी मतांचा जोगवा मागताना द्वेषमूलक शब्दांचा भडीमार केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आजवर अनेक नेत्यांनी परस्परांवर टीकेचे बाण सोडले आहेत. मात्र अलीकडच्या काळात भाषेचा खालावलेला दर्जा चांगलाच चर्चेत आला आहे. यंदाची दहीहंडी ही खऱ्या अर्थाने गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा की राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा? असा प्रश्न उपस्थित करणारी ठरली. राणा दाम्पत्याने जिल्ह्यात पाच ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन केले. तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी संगीत-नृत्याचे कार्यक्रम, चित्रपट कलावंताची हजेरी यातून दहीहंडी या धार्मिक उत्सवाचे राजकीय गर्दी जमविण्याच्या कार्यक्रमात रुपांतर झाले. अमरावतीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तास हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय देखील बनला. खासदार डॉ. अनिल बोंडे आणि माजी शहराध्यक्ष किरण पातूरकर वगळता इतर स्थानिक भाजप नेत्यांनी या कार्यक्रमापासून दूर राहणेच पसंत केले. त्यातून आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत, पण यात राणा दाम्पत्याने शक्तिप्रदर्शनाची संधी साधली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी फार बोलणे टाळले होते. पण, अंजनगाव सुर्जी येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात रवी राणांनी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्याविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि कार्यक्रमानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यासोबत झालेला हाणामारीचा प्रकार राजकारणातील घसरलेल्या पातळीचा निदर्शक ठरला. बळवंत वानखडे हे आमदार यशोमती ठाकूर यांच्या चपला उचलतात, असे राणा म्हणाले. त्यावर वानखडे यांनीही प्रत्युत्तर दिले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर निवडून आले. शरद पवारांना बाप म्हणणारे मोदींना बाप समजत आहेत, जात प्रमाणपत्र वाचविण्यासाठी मोदी-शहांच्या आश्रयाला गेले, अशी टीका त्यांनी केली. हेही वाचा. गणेश नाईकांचा नेम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात? अंजनगाव सुर्जी येथे रवी राणा यांच्या कानशिलात आपण लगावली, त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे, तर आपल्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे रवी राणांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. हेही वाचा. शिर्डीतील ऐनवेळच्या उमेदवारीची परंपरा ठाकरे गट यंदाही कायम राखणार? राणा दाम्पत्य आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील वितुष्ट जगजाहीर आहेच, पण आता राणा दाम्पत्याने कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना टीकेचे लक्ष्य केले. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, पण विरोधात काम केले, असा आरोप नवनीत राणा यांनी तिवसा येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना केला. तिवसा हा यशोमती ठाकूर यांचा मतदार संघ. रवी राणांनी तर यशोमती या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या, असा दावा केला. त्यामुळे यशोमती ठाकूर संतापल्या. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी नवनीत राणा यांच्या कथित बनावट जात प्रमाणपत्राचा उल्लेख करून डिवचले. हेही वाचा. पालघर भाजपमधील हेवेदावे मिटेनात रवी राणा यांची आक्रमक भाषणशैली अमरावती जिल्ह्यासाठी नवीन नाही. त्यांचे आजवर जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी खटके उडाले आहेत. भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांच्यापासून ते आमदार बच्चू कडूंपर्यंत अनेकांशी त्यांनी वाद ओढवून घेतला आहे. निवडणूक जवळ येत असताना त्यांचा शब्दांची धार वाढली आहे. मी गरिबांना किराणा वाटतो, तुम्ही साखरेचा कण वाटून दाखवा, असे आव्हान ते विरोधकांना देतात. पण, या दरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये रवी राणांसह विरोधकांनी वापरलेल्या भाषेमुळे समाजमाध्यमांवर रोषही व्यक्त होऊ लागला आहे.