Dera chief Ram Rahim get Parole before Election : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी २०१७ साली २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत जवळपास १० वेळा त्याला तुरुंगातून ‘पॅरोल’ किंला ‘फर्लो’ मिळाला आहे. १३ ऑगस्ट रोजी राम रहीमला पुन्हा एकदा २१ दिवसांची फर्लो रजा मिळाली. ही फर्लो रजा धरून राम रहीम एकूण २५५ दिवस म्हणजे जवळपास आठ महिने तुरुंगाबाहेर राहिला आहे. विशेष म्हणजे हरियाणा आणि शेजारच्या राज्यात निवडणुका असताना राम रहीमची तुरुंगातून सुटका होते. आताही हरियाणा निवडणुकीच्या आधी त्याला ‘फर्लो’ मिळाला आहे.
कोणकोणत्या निवडणुकीआधी राम रहीम तुरुंगाबाहेर
२०२२ साली गुरमीत राम रहीम तीन वेळा तुरुंगातून बाहेर आला होता. फेब्रुवारी महिन्यात पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या एक आठवडा आधी त्याला पहिल्यांदा २१ दिवसांचा फर्लो मिळाला. त्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ९२ जागांवर विजय मिळविला होता आणि काँग्रेसला १८, तर भाजपाला केवळ दोन जागी विजय मिळविता आला होता.
त्यानंतर त्याच वर्षी जून महिन्यात त्याला ३० दिवसांचा पॅरोल मिळाला. त्यावेळी राज्यात पंचायत निवडणुका होत्या. उत्तर प्रदेशच्या बागपत येथील आश्रमात राहण्याचे आदेश त्याला देण्यात आले होते. मात्र, रोहतक जिल्ह्यात ऑनलाइन सत्संग घेतल्यामुळे आणि भाजपाचे नेते व कर्नालचे माजी महापौर रेणू बाला गुप्ता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राम रहीमचे दर्शन घेतल्यामुळे वाद उद्भवला होता.
त्यानंतर आदमपूर येथील विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा त्याला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला.
पुढच्याच वर्षी हरियाणात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. त्याआधी जुलै २०२३ मध्ये राम रहीमला ३० दिवसांचा पॅरोल मिळाला. नोव्हेंबर २०२३ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा त्याला २१ दिवसांची फर्लो रजा मिळाली. हरियाणा, पंजाब व उत्तर प्रदेशमप्रमाणेच राजस्थानमध्येही डेरा सच्चाचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. याही वर्षी जानेवारी २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीआधी त्याला ५० दिवसांचा पॅरोल मिळाला होता.
राम रहीमला राजकीय वरदहस्त
तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारावासात राम रहीमला कोणत्याही प्रकारची विशेष सुविधा मिळत नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला वागणूक देण्यात येते. सरकारच्या २०२३ मधील आकडेवारीनुसार, हरियाणाच्या तीन केंद्रीय कारागृहांत ५,८४२ आणि १७ जिल्हा कारागृहांत २,८०१ कैदी आहेत. त्यापैकी २,००७ कैदी पॅरोलवर आणि ७९४ कैदी फर्लोवर बाहेर आहेत. काही कैद्यांना दोन्ही प्रकारची रजा आणि तीही वर्षातून अनेकदा मिळाली आहे. वरील आकडेवारीत तात्पुरत्या स्वरूपात तुरुंगातून मुक्त केलेल्या १८३ कैद्यांना वगळण्यात आले आहे.
राम रहीमला राजकीय वरदहस्त आहे. हरियाणाचे कारावास मंत्री आणि सध्या भाजपावासी असलेल्या रंजीत सिंह चौटाला यांना विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रनिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. रनिया विधानसभा मतदारसंघ सिरसा जिल्ह्यात येत असून, याच जिल्ह्यात डेरा सच्चाचे मुख्यालय आहे. रंजीत सिंह हे देशाचे माजी उपपंतप्रधान देवी लाल यांचे सुपुत्र आहेत. तसेच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर हेदेखील राम रहीमच्या पॅरोल आणि फर्लोला समर्थन देतात.
हे ही वाचा >> विश्लेषण : ‘पॅरोल’ व ‘फर्लो’बाबत न्यायालयाचे निर्णय चर्चेत का? या सवलती कैद्यांना कधी मिळू शकतात?
डेरा सच्चाच्या पाठिंब्यामुळे हरियाणात भाजपाला यश
राम रहीमला जानेवारी महिन्यात तुरुंगातून रजा मिळाली तेव्हा भाजपा नेते रंजीत सिंह चौटाला यांनी कारागृह नियमांचा हवाला देऊन एका वर्षात कोणत्याही कैद्याला ७० दिवसांचा पॅरोल किंवा फर्लो मिळतो, असे सांगितले होते. २०१४ साली जेव्हा डेरा सच्चाने भाजपाला पाठिंबा दिला होता, तेव्हा ९० सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाच्या आमदारांची संख्या चारवरून थेट ४७ वर पोहोचली होती. त्यानंतर अनेक भाजपा नेते राम रहीमचे दर्शन घेण्यासाठी सिरसा येथील डेरा सच्चाच्या मुख्यालयात गेल्याचे दिसले.
मात्र, २०१७ साली राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्यानंतर २०१९ साली डेरा सच्चाने लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाला अधिकृतपणे पाठिंबा दिला नाही. तेव्हा भाजपा आणि डेरा सच्चा यांच्यामध्ये सौहार्दता उरली नसल्याची चर्चा होती. मात्र, या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत डेरा सच्चाने भाजपाला पाठिंबा दिला होता.
© IE Online Media Services (P) Ltd