पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेत असलेल्या आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात विकास कामांच्या श्रेयवादावरुन वाद सुरू झाला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाना साधल्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी शहरात येऊन लांडगे यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटातील वाद विकोपाला गेले आहेत.
औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. त्यामुळे महापालिकेवरील सत्तेसाठी भाजप आणि अजित पवार गट या दोन पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा महापालिका ताब्यात घ्यायची आहे, तर शहरात चार आमदार असलेल्या भाजपला महापालिकेतील सत्ता कायम राखायची आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. प्रभाग रचनेचे आदेश येताच भाजपने महापालिकेच्या विकास कामांची उद्घाटने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतीच करुन घेतली. त्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करुन एक प्रकारे निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण झालेले संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प आणि संतसृष्टी ही कामे राष्ट्रवादीची सत्ता असताना सुरू झाल्याचा दावा अजित पवार गटाने केला. त्याला भाजपने तीव्र आक्षेप घेतला.
‘निविदा प्रक्रिया नसताना विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने भूमिपूजन केले. ही कामे भाजपच्या काळात पूर्ण झाली. मी पैलवान आहे, काेणाला घाबरत नाही, काेणी अंगावर आला तर त्याला अंगावर घ्यायची सवयच आहे.’ असे आमदार लांडगे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता आव्हान दिले.
त्यावर अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, ”संतपीठाच्या कार्यक्रमात महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर बोलून आपल्या अकलेचे दिवाळे काढले. ज्यांनी राजकारणात आणले, नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष केले, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या लांडगेंच्या डाेक्यात सत्तेची हवा गेल्याने काहीही बरळत आहेत. लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत. शहराचा विकास अजितदादांमुळेच झाला’.
या दावे आणि प्रतिदाव्यांमुळे भाजप आणि अजित पवार गटात वाद निर्माण झाला आहे.
श्रेयवादाचा विषय वेगळा आहे. राज्यात महायुती असल्याने प्रत्येकाने विचारपूर्वक व्यक्त व्हावे. या वादाचा महायुतीवर परिणाम होता कामा नये. भाजपचे ७७ नगरसेवक होते. स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी आहे. चार आमदार असल्याने पक्षाची मोठी ताकद आहे. स्वबळवार लढावे अशी सर्वांची इच्छा आहे. पण, वरिष्ठांचा निर्णय अंतिम राहील. – शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप
१९९२ ते २०१७ शहाराचा विकास अजित पवार यांनीच केला. २०१७ नंतर भाजपच्या काळात झालेली कामे नाकारली नाहीत. मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यामुळे प्रशासकीय राजवटीतील कामांचे श्रेय महायुतीला जाते. महेश लांडगे यांच्या बोलण्याला जास्त महत्व देण्याची आवश्यकता नाही. ते पवार यांच्यापेक्षा खूप लहान आहेत. नेत्यांच्या आदेशानुसार महापालिकेची निवडणूक लढविली जाईल. – योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)