मोहन अटाळकर

राज्‍याचे तत्‍कालीन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा धक्‍कादायक पराभव करून मोर्शी मतदार संघातून निवडून आलेले देवेंद्र भुयार हे अचानक चर्चेत आले. एका सामान्‍य शेतकरी कुटुंबातील देवेंद्र भुयार यांचा राजकीय प्रवास खाचखळग्‍यांचा आहे. जिल्‍हा परिषद सदस्‍य असताना त्‍यांची शेतीच्‍या प्रश्‍नांवरील आंदोलने गाजली. त्‍यांच्‍यावर अनेक गुन्‍हे दाखल झाले. पण, जनतेचा चेहरा म्‍हणून ते आपली स्‍वतंत्र ओळख निर्माण करण्‍यात यशस्‍वी झाले.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

गव्‍हाणकुंड हे देवेंद्र भुयार यांचे मूळ गाव. मोर्शी मतदार संघात सुमारे ४८ हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्रात संत्री बागा आहेत. भुयार यांनी संत्री उत्‍पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍न हाती घेतले. निवडणूक म्हटली की, लाखो रुपये उमेदवाराला खर्च करावा लागतो. ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणूकीपर्यंत विना पैश्याने निवडणूक लढवता येत नाही, असेच बहूतांश ठिकाणचे चित्र राहते. मात्र वरूड तालुक्यातील बेनोडा येथून जिल्‍हा परिषद सदस्‍यपदाच्‍या निवडणुकीत देवेंद्र भुयार हे उभे ठाकले, तेव्‍हा ते स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेत होते. त्‍यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी अक्षरश: गावोगावी झोळी फिरवून लोकवर्गणीतून निवडणुकीचा खर्च केला होता.

हेही वाचा: अमित साटम : व्यवस्थापन क्षेत्राकडून राजकारणाकडे

‘प्रहार’चे आमदार बच्‍चू कडू यांच्‍या कार्यशैलीचा प्रभाव त्‍यांच्‍यावर होता. त्‍यांनी ‘प्रहार’मध्‍ये काही वर्षे काम केले. राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे यांचे समर्थक म्‍हणूनही देवेंद्र भुयार यांनी काम केले, परंतु राजकीय मतभेदामुळे ते वेगळे झाले. भुयार यांनी वेगळी संघटना उभारली.
त्यानंतर त्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्‍कासाठी अनेक आंदोलन त्यांनी केली. राजकारणात सक्रीय झालेल्‍या देवेंद्र भुयार यांनी पंचायत समिती आणि जिल्‍हा परिषदेनंतर आमदारकीचा गड सर केला. काही वर्षांपुर्वी आंदोलनातील गुन्‍ह्यांचा संदर्भ जोडत त्‍यांना जिल्‍ह्यातून तडीपार देखील करण्‍यात आले. त्‍यामुळे जनतेतून नाराजी व्‍यक्‍त झाली. सहा महिन्‍यांत ही कारवाई रद्दबातल ठरविण्‍यात आली.

गेल्‍या निवडणुकीच्‍या वेळी संत्र्याला राजाश्रय देण्यात सत्ताधारी पक्षाला अपयश येत असल्याचे सांगण्यात भुयार यशस्वी ठरले. पण, निवडणुकीत ऐन मतदानाच्या दिवशी भुयार यांच्यावरचा हल्ला त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली, मतदारांची सहानुभूतीची त्यांच्या बाजूने वळली आणि ते विधानसभेत पोहचले.

हेही वाचा: प्रा. सुनील शिंत्रे : कोल्हापूरच्या दुर्गम भागातील नवे नेतृत्व

देवेंद्र भुयार हे स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्‍यक्षही होते. शेतकरी चळवळीतील त्‍यांच्‍या सक्रीय सहभागामुळे त्‍यांना स्‍वाभिमानी पक्षाने गेल्‍या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. मध्‍यंतरीच्‍या काळात देवेंद्र भुयार यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीकता वाढली होती. या कालावधीत ते स्वाभिमानी पक्षाच्या संपर्कात नसल्याचे आरोप त्यांच्यावर होते. स्‍वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्‍याशी त्‍यांचे मतभेद वाढले होते. त्‍यातच त्‍यांची पक्षातून हकालपट्टी करण्‍यात आली. आपल्‍या वक्‍तव्‍यातून ते अनेकवेळा वादग्रस्‍त ठरतात. पण, आपण सत्‍तेच्‍या लोभापायी विचारधारा सोडली नाही, महाविकास आघाडीसोबत टिकून आहोत, हे ते स्‍पष्‍टपणे सांगतात. शेतीच्‍या प्रश्‍नांवर आजही आवाज उठवणारे देवेंद्र भुयार विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.