नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना ‘राहुल गांधी यांचा मेंदू चोरीला गेला आहे’, अशी टिप्पणी नागपुरात केली. राहुल गांधी यांच्या ‘व्होटचोरी’च्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ‘मेंदूचोरी’ हा नवा राजकीय शब्दप्रयोग चर्चेत आला. विशेष म्हणजे, ‘मतचोरी’ आणि ‘मेंदूचोरी’ या दोन्ही शब्दप्रयोगांना नागपूरचे राजकीय संदर्भ जोडले गेले आहेत. एक शब्द काँग्रेसचे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या माध्यमातून पुढे आला, तर दुसऱ्या शब्दाचे जनक मुख्यमंत्री फडणवीस ठरले.

राजकारणातील भाषेचा स्तर गेल्या दशकभरात सातत्याने घसरत असल्याची चर्चा असताना आणि उलट नेत्यांकडून ज्या भाषेचा वापर केला जातो ती कानावरच पडू नये, असे सर्वसामान्यांना वाटत असताना राजकीय संघर्षातून पुढे आलेले ‘मतचोरी’ आणि ‘मेंदूचोरी’ हे शब्द नागपूरशी जोडले जाण्याची कहानीही रंजक आहे.

‘मतचोरी’चा संसदेतून प्रवास

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला मोठे यश मिळाले. या निकालातील मतदारसंख्या, मतदानाची आकडेवारी आणि मतदार याद्यांमधील बदलांचा अभ्यास करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

याच राजकीय संघर्षात ‘व्होटचोरी’ हा शब्द देशभर चर्चेत आला. मात्र, या शब्दाचा संसदेतून राजकीय वापर करणाऱ्यांमध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांचा समावेश होतो. निवडणूक आयोगावर टीका करताना त्यांनी त्यांच्या मतदारसंघात ‘मतचोरी’ झाल्याचा आरोप संसदेत केला. त्यानंतर काँग्रेसच्या निवडणूक आयोगविरोधातील आंदोलनांमध्ये हा शब्द घोषणांचा भाग बनला आणि पुढे देशभरातील राजकीय चर्चेत रूढ झाला.

गेल्या काही काळात काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राजकारणाचा मोठा भाग निवडणूक आयोग, मतदार याद्या आणि कथित मतचोरीच्या आरोपांभोवती केंद्रित झाला आहे. राहुल गांधींकडून पत्रकार परिषदांमधून विविध आकडेवारी व कागदपत्रांच्या आधारे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगाकडून हे आरोप फेटाळले जात आहेत, तर भाजपकडूनही राहुल गांधी यांच्या दाव्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे ‘मतचोरी’ हा शब्द मात्र राजकीय चर्चेतून बाजूला गेलेला नाही.

आयुक्तांच्या मतभेदांनी चर्चेला नवे वळण

निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने
दिल्यानंतर या वादाला नवे वळण मिळाले. विरोधकांकडून आयोगाच्या कामकाजावरील पूर्वीच्या आरोपांचा पुन्हा उल्लेख करण्यात आला. राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाबाबतचे प्रश्न पुन्हा उपस्थित केले. यावर भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली. नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राहुल गांधी यांना लक्ष्य करताना ‘त्यांचा मेंदू चोरीला गेला आहे’, असा टोला लगावला. त्यामुळे ‘व्होटचोरी’ला उत्तर म्हणून ‘मेंदूचोरी’ हा मुख्यमंत्र्यांचा शब्दप्रयोग राजकीय चर्चेत आला.

मेंदूचोरी नेमकी कोणाची?

फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर मात्र ‘मेंदूचोरी’च्या राजकारणाची दुसरी बाजूही चर्चेत आली आहे. फडणवीस यांनी नागपुरात ‘तीनही निवडणूक आयुक्तांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतल्याने राहुल गांधी यांच्या आरोपातील हवाच निघून गेली’, असे म्हटले. प्रत्यक्षात आयुक्तांनी संयुक्त पत्रकार परिषद न घेता संयुक्त निवेदन प्रसिद्ध केल्याचे समोर आले. त्यामुळे वक्तव्याच्या अचूकतेवरही प्रश्न उपस्थित झाले.

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीनंतर मतदार याद्यांमधील कथित घोळाचा मुद्दा नागपुरात भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही उपस्थित केला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मतदार याद्यांबाबत भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. मतदार याद्या तयार करण्याची आणि त्यातील दुरुस्तीची प्रक्रिया निवडणूक यंत्रणेच्या अखत्यारित येते. त्यामुळे त्या वेळी उपस्थित करण्यात आलेले आक्षेपही अप्रत्यक्षपणे निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित करणारे होते.

मग निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेताना तो प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचाही ‘मेंदू चोरीला गेला होता का?’, असा प्रतिप्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

‘मतचोरी’चा आरोप असो वा त्याला प्रत्युत्तर म्हणून पुढे आलेली ‘मेंदूचोरी’—दोन्ही शब्द राजकीय संघर्षातून पुढे आले. योगायोग असा की, या दोन्ही शब्दांच्या राजकीय प्रवासाला नागपूरचे संदर्भ जोडले गेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजापेक्षा आता ‘चोरी’च्या या दोन शब्दांभोवतीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांची नवी लढाई रंगताना दिसत आहे.