मुंबई : उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळे करून पक्षात जबाबदारी देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करण्याचे जाहीर केल्यावर त्यांना वरिष्ठ नेत्यांनी तातडीने नवी दिल्लीत पाचारण केले. फडणवीस यांनी बुधवारी रात्रीच दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. तीन पायांच्या सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर फडणवीस ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणवीस यांनी मुंबईला परतल्यावर सकाळी नागपूरला प्रयाण केले. त्यानंतर ते सायंकाळी पुन्हा नवी दिल्लीला जाणार असून शुक्रवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील मुद्दे केंद्रीय पातळीवरील असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व व सरकारची कामगिरी यावरून झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात आलेल्या अपयशाचे खापर फडणवीस यांच्यावर फोडल्यास पक्षश्रेष्ठींची अडचण होणार आहे. त्यांना तोच न्याय उत्तरप्रदेशातील अपयशाबाबत मुख्य मंत्री योगी आदित्यनाथ यांना लावावा लागेल व मुख्य मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा लागेल. महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा मोठा फटका भाजपला बसला. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी विश्वासघात केल्याने व शब्द न पाळल्याने त्यांना दंड देण्याची सूचना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली होती. हेही वाचा >>> Lok Sabha Election Result 2024 Updates: भाजपाचा पराभव फक्त अयोध्येत नाही, एकूण ५ जागा गमावल्या; वाराणसी वगळता १२ पैकी ९ ठिकाणी बसला फटका! पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच फडणवीस यांनी ही कामगिरी केली. मात्र त्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान न होता त्यांची कामगिरी सरस झाली व भाजपचे हात पोळले. भाजपचे गेल्या निवडणुकीत २३ व शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. एकनाथ शिंदेंबरोबर १३ खासदार आले व यंदा त्यांचे ७ खासदार निवडून आले. ठाकरे गटाकडे पाच खासदार उरले होते व या निवडणुकीत त्यांचे संख्याबळ जवळपास दुप्पट म्हणजे ९ वर गेले. अजित पवार व अन्य महत्वाचे नेते जाऊनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ चारवरून दुप्पट आठ झाले व अजित पवारांना एकच जागा मिळाली. दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करता त्यांच्या शिवसेना एकूण १६ व राष्ट्रवादी काँग्रेस ९ जागांवर विजयी झाली आणि भाजपचे संख्याबळ ९ पर्यंत घटले. काँग्रेसने मात्र एकवरून १३ पर्यंत मुसंडी मारली. पक्षश्रेष्ठींना ठाकरे व शरद पवार यांना दंड द्यायचा होता व भाजपचे हात पोळले गेले. याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींची की फडणवीस यांची, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. हेही वाचा >>> सत्तास्थापनेचं ठरलं, आता मंत्रीपदांसाठी चढाओढ; १२ खासदारांच्या संख्याबळावर नितीश कुमार तीन खात्यांसाठी आग्रही! सरकार चालविताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर अनेक निर्णय व मुद्द्यांवर फडणवीस यांचे वाद झाले आहेत. त्यावेळी आणि निवडणूक जागावाटपात पक्षश्रेष्ठींनी शिंदे-पवार यांना झुकते माप दिले. त्यामुळे तीन पायांचे सरकार चालविताना कंटाळलेल्या फडणवीस यांनी आता त्यातून बाहेर पडून पक्षाची जबाबदारी सांभाळण्याचा मनोदय जाहीर केला आहे. मात्र फडणवीस यांना सरकार चालविताना पर्याय कोण आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी गतिमानतेने निर्णय घेण्याची क्षमता असलेला दुसरा नेता कोण आहे, हा प्रश्न पक्षश्रेष्ठींना पडला आहे. त्यामुळे आता फडणवीस यांच्याबरोबरच भाजप पक्षश्रेष्ठी शिंदे-पवार यांच्याशीही चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे.