सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील आष्टा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होऊनही आमदार पाटील यांच्यावर अथवा विरोधकांवर अवाक्षरही निघाले नाही. यामागे मुंबई ते कोल्हापूर हा सकाळी झालेला विमानातून सहप्रवास कारणीभूत आहे, की अन्य काही याचीच चर्चा सध्या सांगलीत सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस सांगली दौऱ्यावर येऊनही ना राजकीय बोलले ना सामाजिक विषयाला त्यांनी हात घातला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगली दौऱ्याचे बऱ्याच दिवसांनी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका झाल्यानंतर सांगली व साताऱ्यातील भाजपमध्ये बरीच उलथापालथ झाली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुका या महायुती म्हणून न लढता सोयीस्कर भूमिका बहुतांशी ठिकाणी घेण्यात आली. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपची भूमिका वेगवेगळी राहिली आहे. मात्र, जत पंचायत समिती वगळता अन्य ठिकाणी भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही. जिल्हा परिषदेत आमचीच सत्ता येणार असे भाजपचे नेते सांगत असताना महाविकास आघाडीकडून महायुतीच्या घटक पक्षांना सोबत घेत सत्ता स्थापन करण्यात आमदार जयंत पाटील यांनी बाजी मारली. तर मिरजेतील गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी महायुतीतील मित्र पक्षांची मदत घ्यावी लागली. सांगली महापालिकेत विरोधात लढलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घ्यावे लागले. तालुका पातळीवर वेगवेगळी गणिते मांडून भाजप जिल्ह्यात एक नंबरवर असल्याचे सांगितले जात आहे. या राजकीय खेळीमागे आमदार पाटील यांच्यासह विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांचे समन्वयाचे राजकारण भाजपला अडचणीचे ठरत असताना मुख्यमंत्री मात्र जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात येऊनही टीकेचा एक शब्दही न बोलता सर्व काही अलबेल असल्याचे दर्शवत होते.

आष्ट्याचा कार्यक्रम ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या ९१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात आला होता. हा कार्यक्रम चिमण डांगे यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांना सोबत घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. या कार्यक्रमाला साताऱ्यातून मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्यासह सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महायुतीचे आमदार उपस्थित होते. महायुतीतील जनसुराज्यचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर आदी उपस्थित होते.

devendra-fadnavis-jayant-patil-sangli-visit
ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांचा ९१ व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.(छायाचित्र : लोकसत्ता टीम)

जयंत पाटलांच्या मतदारसंघात येऊन त्यांच्यावर कोणतेच भाष्य अथवा टीका टिप्पणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली नाही. साखर कारखानदारीवर त्यांच्याकडून काही तरी वक्तव्य होईल अशी अपेक्षा होती. राजकीय टिप्पणी तर राहोच, जिल्ह्यातील प्रश्नाबाबतही त्यांनी काहीच आश्वासन दिले नाही. ज्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, त्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. चिमण डांगे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, याही मुद्द्याला त्यांनी स्पर्शही केला नाही. ना राजकीय, ना सामाजिक विषय त्यांनी चर्चेत आणले. केवळ ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपच्या जडणघडणीतील स्थान यावरच त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.

तथापि, मुंबईहून आमदार पाटील यांच्यासोबत केलेला विमान प्रवास चर्चेत आला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या साक्षीने विमान प्रवासात चर्चा झाली का? आमदार पाटील यांनी काही शब्द दिला आहे का, यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका टाळली तर नाही ना, अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.