मुंबईत मीरा रोड परिसरात एका व्यक्तीने सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदुस्थान हिंदू राष्ट्रच आहे, ते घोषित करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्याच दिवशी विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्या खात्यात नऊ कोटी ८१ रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मुलगा अनिकेत तटकरे याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू झाल्याच्या चर्चांना ऊत आला होता. या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांनी खुलासा केला आहे. महत्वाच्या ५ राजकीय घडामोडी जाणून घ्या.

मीरा रोड परिसरात हल्ला, मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबईत मीरा रोड परिसरात एका व्यक्तीने सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकू हल्ला करणारा व्यक्ती कट्टरपंथी असल्याचा संशय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. तपासात हल्लेखोराच्या निवासस्थानी काही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याचेही फडणवीस यांनी यावेळी माध्यमांना सांगितले. सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी संशयित हल्लेखोर कट्टरपंथी असल्याचा संशय व्यक्त केला. “हा व्यक्ती कट्टरपंथी असल्याचे दिसते, त्याच्या राहत्या घरातून काही आक्षेपार्ह पुस्तकं आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तो अमेरिकेत राहत होता अलिकडेच तो माघारी परतला आहे. तो कट्टरपंथी झालाय आणि जिहादच्या नावाखाली इतर धर्मातील सदस्यांवर हल्ला करत आहे. त्यातून ही घटना घडल्याचे दिसते,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “या प्रकरणाचा तपास सध्या दहशतवादी विरोधी पथक करत असून यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेची देखील मदत घेतली जात आहे. या तपासातून असे आणखी कोणी कट्टरपंथी झालेत का? यामागे कोण आहे का? याचा शोध घेतला जात आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार दोन्ही तपास यंत्रणांना संपूर्ण सहाकार्य करत आहे. यामागे काही मोठा कट आहे का किंवा नेटवर्क आहे का? याचा शोध घेतला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी घेतले ताब्यात

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बुलढाणा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा काढून पुस्तक वाचनाचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी त्यांना बुलढाण्यात पोहोचण्यापूर्वीच चिखली येथे ताब्यात घेतले. प्रशांत आंबी हे समर्थकांसह बुलढाण्याकडे रवाना झाले असताना शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली येथे पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, बुलढाणा शहरात आंबी यांच्या समर्थनार्थ जमलेल्या शेकडो आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांनी “आमदार संजय गायकवाड मुर्दाबाद” अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. काही आंदोलकांना पोलिसांनी फरपटत नेत ताब्यात घेतल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

नरेंद्र मोदींच्या २०१४ च्या सत्तास्थापनेवर सरसंघचालकांचे मोठे विधान

राम मंदिर बांधले जाईपर्यंत हिंदुस्तान एक हिंदू राष्ट्र आहे, या विधानावर जे लोक हसायचे ते आज हे मान्य करतात. आम्हाला हिंदू राष्ट्र घोषित करायला सांगतात. आम्ही म्हणतो की, हिंदुस्थान हिंदू राष्ट्रच आहे, ते घोषित करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सूर्य पूर्वेला उगवतो हे घोषित करायला हवे का? तो पूर्वेलाच उगवतो, असे भागवत म्हणाले. २०१४ मध्ये, जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकारने शपथ घेतली, तेव्हा लंडनच्या ‘गार्डियन’ वृत्तपत्राने लिहिले, “आजच्या दिवशी, भारतीयांनी अखेर ब्रिटिशांना निरोप दिला आहे.” तांत्रिकदृष्ट्या, आम्ही १५ ऑगस्ट १९४७ रोजी निरोप दिला होता, पण आम्ही अजूनही साशंक होतो. भारताचा उदय झालाच पाहिजे. पण भारत म्हणजे काय? हा कसला उदय आहे? भारत, भारत आहे का? या द्विधा मनस्थितीत बराच काळ गेला असेही सरसंघचालक म्हणाले.

अपघाताच्या दिवशी नऊ कोटींची रक्कम खात्यात

‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. सरकार आणि तपास यंत्रणा हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ‘अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्याच दिवशी विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्या खात्यात नऊ कोटी ८१ रुपये हस्तांतरित करण्यात आले. अंत्यविधीच्या दिवशी सिंग यांच्या खात्यात १६ कोटी ८८ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. आतापर्यंत व्ही. एस. आर. विमान कंपनीच्या खात्यात तब्बल १४५ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले’ असा आरोप रोहित पवार यांनी केला. अजित पवार विमान अपघात प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर रोहित पवार हे तपासाचा आढावा घेण्यासाठी सीआयडी कार्यालयात आले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ अधिकारी कार्यालायात उपस्थित नसल्याचे दिसून आल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

विधानसभेच्या उमेदवारीबाबत सुनील तटकरेंच्या पुत्राचे स्पष्टीकरण

विधान परिषदेच्या जागेची उमेदवारी मला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रयत्न करत आहे अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. पण या बातम्या निराधार आणि तथ्यहीन असल्याचे  माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हंटले आहे. मी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छूक नाही. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विधानपरिषदेच्या रिक्त जागासाठी निवडणुक होत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळावी तिन्ही घटक पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे. उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुलगा अनिकेत तटकरे याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू झाल्याच्या चर्चांना ऊत आला होता. या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांनी हा खुलासा केला आहे.