मुंबई : पक्षात पुणे आणि सांगली या जिल्ह्यांनाच सत्ता किंवा अन्य उमेदवारीमध्ये प्राधान्य देण्यात येत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमधील भाजपचे निष्ठावान नेते आपली खदखद पक्षाचे राज्यातील सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या आठवड्यात भेट घेऊन व्यक्त करणार आहेत.

पुण्याच्या मेधा कुळकर्णी यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. आता पुण्याचे मुरलीधर मोहोळ केंद्रात मंत्री झाले आहेत. नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये पुण्याला झुकते माप देण्यात आले. पुणे जिल्ह्यात उमा खापरे या विधान परिषदेवर असताना योगेश टिळेकर आणि अमीत गोरखे या पुणे जिल्ह्यातील नेत्यांची परिषदेवर वर्णी लावण्यात आली. गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील नेते परिषदेवर असताना पुन्हा त्याच जिल्ह्यातील सदाभाऊ खोत यांना परिषदेवर घेण्यात आले.

हेही वाचा – आता तुम्हीच लक्ष द्या साहेब! काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची व्यथा

हेही वाचा – परभणीचे बाबाजानी दुर्राणी पुन्हा स्वगृही !

पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सांगली जिल्ह्याला झुकते माप देण्यात येत असल्याबाबत सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील निष्ठावानांमध्ये नाराजी आहे. या तीन जिल्ह्यांतील भाजपचे निष्ठावान नेते देवेंद्र फडणवीस यांची या आठवड्यात भेट घेणार आहेत. मुंबई व कोकणावर अधिक लक्ष देणे व पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करणे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला मोठ्या अडचणीचे ठरु शकते, हे आम्ही नेतृत्वाच्या लक्षात आणून देणार आहोत, असे भाजपच्या एका निष्ठावान नेत्याने सांगितले.