आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानावरून फोन येताच मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेसेनेला मोठा धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… आरक्षणासाठी रखरखत्या उन्हात कठोर उपोषण करणार असून मला मरण आले तरी चालेल, अशी कठोर भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली… सध्या वीर सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी तरी त्यांना वाचले आहे का? अशा शब्दात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले… मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नये, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले… सत्तेच्या मस्तीत महायुतीला पराभव अशक्य वाटत असला तरी जनतेचा रोष उसळतोय, अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
मातोश्रीवरून फोन अन् शिंदेसेनेला धक्का?
मुंबई महापालिका क्षेत्रातील मोक्याच्या जमिनी आणि महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत सुधारणा समितीमार्फत घेतल्या जाणाऱ्या चार मोठ्या निर्णयांना तुर्तास ब्रेक लावण्यात आला आहे. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानावरून मध्यरात्री फोन येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावांना ब्रेक लावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या सुधारणा समितीमध्ये सध्या शिंदे गटाचे वर्चस्व आहे. ही समिती बांधकाम प्रकल्प, रस्त्यांची सुधारणा आणि पायाभूत सुविधांना मंजुरी देणारी अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते. मात्र, या सुधारणा समितीच्या माध्यमातून मोक्याच्या जमिनी लाटण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या कथित अनियमिततेची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी या चारही वादग्रस्त प्रस्तावांना तात्काळ स्थगिती देण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. हा शिंदे गटाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्याबरोबर आपली चर्चा झाली नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे यांची कठोर भूमिका
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेत आपल्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली. येत्या ३० मेपासून आरक्षणासाठी रखरखत्या उन्हात कठोर उपोषण करणार असून मला मरण आले तरी चालेल, अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली. “मला अंतिम टोकाचे आणि कठोर उपोषण करायचे आहे. रखरखत्या उन्हात खाट टाकून मी हे उपोषण करणार आहे. या उपोषणात मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही, शिवाय पायात चप्पल घालणार नाही. माझ्या शरीरात अनेक वेदना आहेत. उष्णघाताचा बळी गेला तरी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमुळे गेला, असे समजावे. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरीही हरकत नाही. कारण- माझ्या (मराठा समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला आहे, असे जरांगे म्हणाले. त्यांच्या या भूमिकेनंतर आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले
सध्या वीर सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी तरी त्यांना वाचले आहे का? अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त यांनी आज समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली. “सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत. आणि सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का?”, अशा त्यांनी राजकीय पक्षांना सुनावले. सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणे मान्य नव्हते. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते, असेही राज यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
भास्कर जाधव यांची महायुतीवर टीका
सत्तेच्या मस्तीत महायुतीला पराभव अशक्य वाटत असला तरी जनतेचा रोष उसळतो आहे, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आमदार भास्कर जाधव यांनी केली. चिपळूण येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर “अहंकार आणि गैरव्यवहार” असे म्हणत टीकेची झोड उठवली. महायुती सरकारवर टीका करताना जाधव म्हणाले की, महाराष्ट्र आणि देशातील सत्ताधाऱ्यांना आता आपल्याला कोणीही हरवू शकत नाही, असा भयंकर भ्रम झाला आहे. मात्र, जनता सर्व पाहत आहे. सरकारविरोधातील नाराजी आता हळूहळू उघडपणे समोर येऊ लागली आहे. राज्यात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्न गंभीर असताना सत्ताधारी मात्र स्वतःच्या सुविधांवर कोट्यवधी खर्च करत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान भास्कर जाधव यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्री विखे यांचे मनोज जरांगेंना आवाहन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नये, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. एखाद्या व्यक्तीवर टीका करून प्रश्न सुटत नाहीत. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी का झाली आणि सातारा गॅझेटची का झाली नाही, हे मी जरांगे यांची भेट घेऊन त्यांना सांगेन, असेही ते म्हणाले. मंत्री विखे यांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेतली. “मनोज जरांगे पाटील यांच्या मी सातत्याने संपर्कात आहे. या सगळ्या विषयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील अतिशय सकारात्मक आहेत. शुक्रवारी मी जरांगे यांची भेट घेणार असून सरकारने मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये काय काय केले त्याची कल्पना त्यांना देणार आहे,” असे विखे यांनी माध्यमांना सांगितले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून वेगाने हालचाली सुरू असल्याचे संकेतही त्यांनी दिले. यादरम्यान शुक्रवारी जरांगे यांची भेट घेऊन मंत्री विखे त्यांना काय माहिती देणार आणि त्यावर जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून आहे.
