आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या टोलेबाजीमुळे काही सरकारमधील मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… अजित पवार यांच्या विमानाचा अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे हे अजूनही महाराष्ट्राला समजत नाही, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले… रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा हवा असल्यामुळे ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत असल्याचा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला… राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केले… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत भाजपाच्या मंत्र्याने आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

फडणवीसांच्या टोलेबाजीने मंत्र्यांमध्ये अस्वस्थता?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या टोलेबाजीमुळे सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मुख्यमंत्री असताना मंत्र्यांना काहीच अधिकार नसतो. आपणही उपमुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अधिकारातच काम करीत होतो, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना ही सुरू करतानाच त्यात सहभागी झालेल्या तरुणांना सेवेत कायम करू, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. त्याकडे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले. त्यावर ज्या मंत्र्यांनी या योजनेतील तरुणांना कायम नोकरीचे आश्वासन दिले होते, त्याचे पुरावे द्या, लगेच त्या मंत्र्यांचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना दिलेला हा टोला लगावल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात रंगल्याने शिंदे गटातील काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवारांच्या अपघातावर ठाकरेंचा संशय

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे हे अजूनही महाराष्ट्राला समजत नाही, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील सर्व माहिती ठाकरेंना सांगितली. यादरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवारांच्या अपघात प्रकरणात काही काळंबेरं आहे का? असा संशय निर्माण होतोय. कारण सरकार एफआयआर का दाखल करून घेत देत नाहीये? एफआयआरला सरकार का घाबरतंय? असे ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर विमानाचा अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा : शिंदे गटाला सत्तेतून दूर ठेवण्याची तयारी? बड्या नेत्याच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ; वाचा ५ घडामोडी…

आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा हवा असल्यामुळे ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत असल्याचा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला. अजित पवार यांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या केला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल पाटील आणि सुनील शेळके यांनी संताप व्यक्त केला आहे. रोहित पवारांना पक्षाचा कब्जा हवा आहे, त्यासाठीच ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असे अनिल पाटील म्हणाले, तर रोहित पवार हे नाटक करीत असल्याची टीका सुनील शेळके यांनी केली. त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत, असेही दोन्ही आमदारांनी म्हटले.

राज्यसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा

राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा केवळ एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केले. २०२० मध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती.आता संख्याबळानुसार आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल. शरद पवार हे मोठे नेते आहेत; मात्र आम्ही आमचा राज्यसभेच्या जागेसाठीचा दावा सोडणार नाही, असेही वरुण सरदेसाई म्हणाले.

हेही वाचा : कोण आहेत उदय भानू चिब? युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक का झाली? कारण काय?

भाजपाच्या मंत्र्याचा सरकारला घरचा आहेर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला. राज्य शासनाने विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून आणले आणि त्याच्यात लाडकी बहीण योजनाही स्वीकारली. या योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत असल्याची परिस्थिती आहे. मात्र तरीदेखील लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या अनेक योजनांपैकी लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरीत करण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे.