आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे बोलून दाखवली… राष्ट्रवादीला केलेल्या सहकार्यामुळे रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी पसरली असून पक्षाच्या ३८ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले… विजय वडेट्टीवार यांनी परवानगी दिल्यास हर्षवर्धन सपकाळ यांचे सगळेच बाहेर काढेन, असा इशारा काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या नेत्याने दिला… अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली… कर्जमाफी योजनेतील अनेक अटी शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या असून त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदे मुख्यमंत्री अन् फडणवीस केंद्रात मंत्री?
देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून त्यावर भाजपा आणि शिंदेसेनेतील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. “जशी भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी असते, तशीच आमची इच्छा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही आहे,” असे म्हणत शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांच्या विधानाची पाठराखण केली, तर “देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय विकसित महाराष्ट्र घडवणे असून राज्याला देशातील अग्रगण्य राज्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीला जावे, अशा चर्चांना फारसे महत्त्व देऊ नये,” असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदासारख्या संवेदनशील विषयांवर सार्वजनिकपणे भूमिका मांडण्यापूर्वी संबंधित पक्ष नेतृत्वाशी चर्चा व्हायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला. सध्या एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे.
सामूहिक राजीनाम्यामुळे शिंदेसेनेत खळबळ
विधान परिषदेच्या रायगड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादीला केलेल्या सहकार्यामुळे शिंदेसेनेत नाराजी पसरली आहे. याच नाराजीतून पक्षातील तब्बल ३८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. औरंगजेबाच्या सुतारवाडीच्या तहामध्ये जसे मराठे हरले, तशीच परिस्थिती शिवसैनिकांची झाली आहे, अशी नाराजी शिंदेसेनेचे खालापूरचे माजी तालुका अध्यक्ष संदेश पाटील यांनी बोलून दाखवली आहे. शिवसैनिकांच्या भावना आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मान डावलला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. रायगड विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला गेली. या जागेवर खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यावरून जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे नाराज पदाधिकाऱ्यांची कशी मनधरणी करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या नेत्याचा इशारा
चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळू आला आहे. काँग्रेसचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर गंभीर आरोप करत संघटनात्मक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुकीदरम्यान पक्षातील काही नेत्यांनी अधिकृत उमेदवाराला अपेक्षित पाठबळ न देता उलट त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी परवानगी दिल्यास हर्षवर्धन सपकाळ यांचे सगळेच बाहेर काढेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पक्षातील काही नेते जिल्ह्यात अहिंसा शिबिराला येतात ‘जय जगत’ म्हणत गांधी टोपी घालता आणि मटणाच्या पार्ट्या करायला वर्ध्यात कोणत्या नेत्यांच्या घरी जातात, याची माहिती आपण वरिष्ठांना देणार असल्याचेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.
किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्याबाबतची माहिती माध्यमांना दिली. काही दिवसांपूर्वी किशोर मासाळ यांची एक कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये ते राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करीत असल्याचा आरोप झाला. त्यानंतर मासाळ यांनी जाहीरपणे माफीही मागितली होती. सदरील ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून अजित पवार यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेले. या वक्तव्याबद्दल मी अजित पवार यांचे कुटुंबीय आणि बारामतीकरांसह सर्व जनतेची हात जोडून माफी मागतो, असे ते म्हणाले होते. प्रायश्चित्त म्हणून आपण एका दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करून आत्मक्लेश करणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले होते. यादरम्यान त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.
शेतकरी कर्जमाफीबाबत शरद पवारांचा सल्ला
कर्जमाफी योजनेतील अनेक अटी शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या असून त्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. ते बारामती येथे माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर केली. या योजनेनुसार पात्र असलेल्या शेतकऱ्याचे दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने अटी आणि निकषही जाहीर केले आहेत. या अटी-निकष खुपच क्लिष्ट असल्याचे म्हणत शेतकरी संघटना सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कर्जमाफी योजनेमधील अनेक अटी शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या असून त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील संबंधित लोकांशी बोलावे आणि कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे, त्यातील अटी कशा दुरुस्त करता येतील आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.
