कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच महत्त्वाचा भूभाग मानला गेला आहे. सहकार चळवळ, साखर कारखाने, शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण अर्थकारणावर मजबूत पकड असलेल्या या पट्ट्यात दशकानुदशके ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मोठे प्राबल्य राहिले आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर बदलाचे वारे वाहताना दिसत आहे. या बदलत्या स्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपले पाय घट्ट रोवण्यासाठी आणि पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी विशेष रणरचना आखली असून त्यांचे वाढते दौरे व जनसंपर्क याच धोरणाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाची विभागीय महत्त्वपूर्ण बैठक उद्या गुरुवारी सोलापुरात आयोजित केली असून त्यासही फडणवीस मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहात आहेत.
काही काळापूर्वी पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला. येथे शिवसेना – भाजपची डाळ काही केल्या शिजत नसे. या भागात कमळ फुलवणे कठीण होते. परंतु, लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आणि गेल्या काही महिन्यांतील घडामोडींनी हा समज बदलण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्रदिनपूर्व सोहळ्यानिमित्त पुण्यात नागरिकांशी साधलेला संवाद, सातारा जिल्ह्यातील तिरंगा रॅलीला लावलेली हजेरी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवघ्या चार महिन्यांत झालेले तीन दौरे यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढत्या सक्रियतेची पुष्टी मिळते.
या दौऱ्यांमध्ये केवळ राजकीय सभा किंवा गाठीभेटी नव्हेत तर अनेक महत्त्वाच्या विकासकामांचे लोकार्पण करून त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला आहे. सांगली जिल्ह्यात माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती आणि सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या आगामी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन या सर्व गोष्टी पक्षाची पकड मजबूत करणाऱ्या ठळक पायऱ्या असल्याचे दिसून येते.
विरोधकांची ताकद विभागली
या वाढत्या सक्रियतेमागे पश्चिम महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांची सध्याची कमकुवत स्थिती कारणीभूत आहे. एकेकाळी या भागात एकहाती सत्ता गाजवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात मोठी फूट पडली असून, स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्वाचा अभाव जाणवू लागला आहे. त्यातच महायुतीमधील घडामोडी आणि राजकीय अस्थिरतेमुळे राष्ट्रवादीच्या जुन्या नेतृत्वाला ओहोटी लागली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाला प्रभाव टिकवता आला नाही. दुसरीकडे, काँग्रेस पक्षही संघटनात्मक पातळीवर आधीच्या तुलनेत निष्प्रभ होत चालल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेचा प्रभाव ठरावीक क्षेत्रांपुरताच मर्यादित राहिला आहे. प्रादेशिक पक्षांमधील या आपापसातील अंतर्विरोध आणि नेतृत्वाच्या पोकळीमुळे विरोधकांची ताकद विभागली गेली आहे. याचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी भाजप शिस्तबद्ध पद्धतीने पावले टाकू लागला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा ठसा
सध्याची अनुकूल राजकीय परिस्थिती हेरून देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वतःचा आणि भाजपचा भक्कम ठसा निर्माण करण्याची रणनीती अमलात आणली आहे. एका बाजूला संघटन मजबूत करणे, पक्षाच्या अंतर्गत बैठकांद्वारे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरणे आणि दुसऱ्या बाजूला विकासकामांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे, अशी दुहेरी भूमिका ते पार पाडत आहेत. सहकार आणि शेतीच्या राजकारणात पारंपरिक विरोधकांच्या हातातून सूत्रे निसटत असताना भाजपचे हे आक्रमक नेतृत्व आगामी काळातील राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र बदलणारे ठरू शकते.
भाजपचे काँग्रेसीकरण
याचवेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार पट्ट्यात झपाट्याने काँग्रेसीकरण होऊ लागले आहे. काल राष्ट्रवादी – काँग्रेसमध्ये असलेले साखर, दूध, शिक्षणसम्राट आज भाजपत झपाट्याने आले असले तरी त्यांची घराणेशाही, खाबूगिरी, वर्चस्ववाद वृत्ती तीच राहिल्याने राजकीय गुणात्मक फरक तो काय पडला, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या सर्वांचे शुद्धीकरण करण्याचेही आव्हान फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.
