राज्यसभा निवडणुकीतील यशामुळे धनंजय महाडिक हे रातोरात राष्ट्रीय पातळीवरील तारांकित राजकीय व्यक्तिमत्त्व बनले आहे. पराभवाकडून पराभवाकडे अशी महाडिक कुटुंबियांची सुरू असणारी मालिका थांबली असून आता यानिमित्ताने पन्नाशीतील महाडिक यांची नवी राजकीय कारकीर्द सुरू होत आहे. विद्यार्थी दशेतील काँग्रेस कार्यकर्ता ते लोकसभा, राज्यसभा सदस्य अशी वाटचाल करणाऱ्या महाडिक यांनी काँग्रेस, शिवसेना, अपक्ष, राष्ट्रवादी आणि भाजप अशा सर्वपक्षीय प्रवासाचे वर्तुळही सत्तेच्या राजकारणासाठी पूर्ण केले आहे.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांमध्ये महाडिक घराण्याचे गेल्या ३० वर्षापासून राजकीय अस्तित्व आहे. सांगली जिल्ह्यातून आलेल्या महादेवराव महाडिक यांनी कोल्हापूरच्या राजकारणात लक्ष घालत एकेक सत्तास्थान काबीज करण्यास सुरुवात केली. विधान परिषदेच्या माध्यमातून ते आमदार बनले. कोल्हापूर महापालिका, जिल्हा बँक आणि गोकुळ यासारख्या संस्थांवर महाडिक यांचा प्रभाव राहिला. कोल्हापूर जिल्हा आणि महादेवराव महाडिक हे जिल्ह्यातील यशाचे एक अनोखे समीकरण बनले होते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होऊन अनेक तरुण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागले. त्यापैकी दोन प्रमुख म्हणजे त्यांचा पुतण्या धनंजय महाडिक आणि दुसरे सतेज पाटील.

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
rohit pawar and udayanraje bhosale
साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार? रोहित पवारांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “उदयनराजे…”
rahul gandhi wayanad election
सीपीआयने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसला वायनाडमधून राहुल गांधीच का हवेत?
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक

वाणिज्य शाखेतील पदवीधर असलेल्या धनंजय यांना कुस्ती मुष्टियुद्ध या घराण्यात आवड असलेल्या क्रीडा क्षेत्राचे वेड होते. पुढे युवक काँग्रेसच्या माध्यमातून धनंजय महाडिक तथा मुन्ना व सतेज पाटील तथा बंटी या मुन्ना – बंटीच्या जोडीने राजकारणात प्रभाव दाखवायला सुरुवात केली. महादेवराव महाडिक यांचे विरोधक दिग्विजय खानविलकर यांना सतेज पाटील यांनी अपक्ष राहून पराभूत केले; तेव्हा त्यांना महाडिक कुटुंबीयांची मोठी मदत झाली. इकडे धनंजय महाडिक यांनी २००४ साली शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांना यश आले नाही. पुढील निवडणुकीवेळी म्हणजे २००९ साली ते राष्ट्रवादीत गेले. परंतु उमेदवारी संभाजीराजे छत्रपती यांना मिळाली. २०१४ साली मात्र ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर संजय मंडलिक यांचा पराभव करून लोकसभेत पोहचले. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांनी पराभवाची परतफेड केली.

बंटी- मुन्ना मैत्री आणि संघर्ष

कोल्हापूरच्या राजकारणामध्ये यापूर्वी महाडिक परिवाराचा निर्विवाद प्रभाव राहिला. तर गेल्या दशकभरात सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा डंका वाजत आहे. मुन्ना- बंटी यांच्यातील मैत्री आणि संघर्ष हे ही जिल्ह्याच्या राजकारणाचे वैशिष्ट्यपूर्ण वळण राहिले आहे. २००९ साली बंटी – मुन्ना हे एकमेकांविरोधात विधानसभा निवडणुकीत उभे ठाकले होते. त्यामध्ये सतेज पाटील यांनी विजय मिळवला; तेव्हा पाटील – महाडिक यांच्यात पहिल्यांदा कटुता निर्माण झाली. पुढे राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक हे पहिल्यांदा लोकसभेसाठी रिंगणात उतरले. तेव्हा वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर सतेज पाटील यांनी त्यांचा प्रचार केला. महाडिक यांना विजयाचा गुलाल लागला परंतु त्यांनी नंतर सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी पुरेसे सहकार्य केले नाही असा आक्षेप नोंदवला. त्यातूनच सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महादेवराव महाडिक व धनंजय महाडिक यांनी अमल महादेवराव महाडिक यांना सतेज पाटील यांच्या विरोधात उभे करून विजय मिळवला.

हा पराभव जिव्हारी लागल्याने सतेज पाटील यांनी नंतर आलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा विधानपरिषदेचा प्रवास खंडित केला. तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक यांना सहकार्य करताना धनंजय महाडिक यांचा लोकसभेचा प्रवास रोखला. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकीत पुतण्या ऋतुराज पाटील यास उभे करून अमल महाडिक यांच्याकडील आमदारकी हिसकावून घेतली. महापालिका, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक येथेही सतेज पाटील यांनी प्रभाव दाखवला. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी करून सतेज पाटील यांनी महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम यांना पराभूत केले.

जिगरी मैत्री आणि टोकाचे शत्रूत्व अशी वळणं घेणारा मुन्ना – बंटी यांचा प्रवास. आता महाडिक हे भाजपकडून राज्यसभेत गेले असल्याने त्यांच्याकडून सतेज पाटील यांच्या राजकारणाला आव्हान मिळणार आहे. आजच्या विजयानंतर धनंजय महाडिक यांनी आपला वाईट काळ (बॅड पॅच ) संपला आहे. महाडिक घराला वारंवार पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या भाजपच्या पाठिंबा मुळे राज्यसभेचा विजय मिळवू शकलो. या संधीचे भविष्यात नक्कीच सोने करू. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध राहीन, असे म्हणत त्यांनी सतेज पाटील यांच्यासह महा विकास आघाडीला आव्हान दिले आहे.