छत्रपती संभाजीनगर : ‘महायुती’ बरोबर रहा असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश असले तरी सत्तास्थापनेत ठाकरे गटाशी हातमिळवणी करण्यासाठी तानाजी सावंत पुढाकार घेत आहेत. त्यामुळे त्यांना व त्यांच्या समर्थकांना वगळून भाजपबरोबर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करावी अशी विनंती कळंब तालुक्यातील एकथान शिंदे यांच्या यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अध्यक्ष तर माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उपाध्यक्ष अशी रचना केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा-वाशी हा शिंदे सेनेचे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांचा मतदार संघ वगळता जिल्हा परिषद निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात महायुती झाली. निवडणुकीनंतर महायुती बाहेर लढलेल्या आमदार सावंत यांना महायुतीत कशाला घ्यायचे असा सूर उमटत आहे. महायुतीतील आपल्याच पक्षाच्या सहकाऱ्यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांना रसद पुरवणाऱ्या सावंतांचा गट महायुतीत नको, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सांगण्यात आले आहे. कळंबचे अजित पिंगळे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या एकूण ५५ जागा आहेत. त्यापैकी सर्वाधिक १९ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यापाठोपाठ शिंदे सेनेचे १५ सदस्य विजयी झाले. या १५ सदस्यांपैकी भूम-परंडा-वाशी या मतदारसंघातून महायुतीला आव्हान देत आमदार तानाजी सावंत यांनी शिंदे सेनेचे आठ सदस्य स्वतःच्या बळावर निवडून आणले आहेत. उर्वरित सात सदस्यांपैकी चार सदस्य माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
राहिलेल्या तीन सदस्यांना तुळजापूर आणि धाराशिव विधानसभा मतदारसंघातून विजयी करण्यासाठी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सहकार्य केले. त्यामुळे शिंदे सेनेच्या उर्वरित सात सदस्यांपैकी सहा सदस्य महायुतीसोबत ठाम असल्याचा दावा केला जात आहे. भाजपाचे १९, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ०६ आणि शिंदे सेनेचे ०६ असे ३१ सदस्य महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी सरसावले आहेत. बहुमतासाठी २८ सदस्य लागतात. या राजकीय घडामोडीला धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह शिंदे सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांनीही पाठबळ दिले असले तरी तानाजी सावंत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत हातमिळवणी करुन सत्तेसाठी चाचपणी सुरू केली. या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनाच सत्तेबाहेर ठेवण्याच्या प्रक्रियेस वेग दिला जात आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्षांनी उपाध्यक्ष या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर महिला विराजमान होतील असे चित्र आहे. अध्यक्षपदासाठी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची तर उपाध्यक्षपदी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषाताई गायकवाड यांची वर्णी लागेल अशी चर्चा सुरू आहे.

