नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान हे मागील काही वर्षांत भाजपातील एक महत्त्वाचे नेते म्हणून उदयास आले होते. एक संघटक, मंत्री आणि राजकीय व्यवस्थापक म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती. दरम्यान, ते भाजपा पक्षश्रेष्ठींच्या अत्यंत जवळचे मानले जातात. राष्ट्रीय राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या ओडिशातील काही मोजक्याच नेत्यांपैकी धर्मेंद्र प्रधान एक आहेत.
शिक्षणमंत्री पदाचा वादग्रस्त ठरलेला कार्यकाळ
शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकाळात धर्मेंद्र प्रधान यांची भूमिका प्रशासकापासून बदलून एका राजकीय योद्ध्याची झाली होती. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे (NEP) समर्थन केले होते. मातृभाषेतील आणि विविध भाषांमधील शिक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांनी पीएम-श्री आणि इतर अजेंडा राबवला होता. परंतु त्यांचे शिक्षण मंत्रालय अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. परीक्षांच्या प्रामाणिकपणाबद्दल तसेच पारदर्शकतेबद्दल उद्भवलेला वाद, भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांबरोबर त्यांच्या मंत्रालयाचे उडालेले खटके आणि शिक्षण मंत्रालयाच्या धोरणांच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या अडचणी वाढवल्या.
राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांचे पेपर फुटल्याने सर्वात मोठा फटका धर्मेंद्र प्रधान यांना बसला. पेपरफुटीचे आरोप, परीक्षा रद्द होण्यामुळे विद्यार्थ्यांना होणार मानसिक त्रास यांमुळे प्रधान चर्चेत राहिले. विरोधी पक्षांनी देखील नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका केली. तसेच भरती परीक्षांबाबत देखील अनेक आरोप झाले.
धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणात त्रिभाषेचे सूत्र लागू करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावरून तामिळनाडू सरकारबरोबर त्यांचा वाद दीर्घकाळ चालला. केंद्र सरकार हिंदी भाषा सक्तीने लागू करत आहे, असा आरोप तामिळनाडू सरकारने केला होता. केंद्र विरूद्ध राज्य असा वाद शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांमुळे दिसून आला होता. तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिक्षण व्यवस्थेतील हस्तक्षेप वाढत आहे, असा आरोपही झाला. शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड करत शिक्षणाचे भगवेकरण केले जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. या सगळ्या घडामोडींमुळे धर्मेंद्र प्रधान हे विद्यार्थी, विरोधी पक्ष आणि इतर राज्यांमधील सरकार यांच्यातील वाढत्या असंतोषाचे कारण ठरले.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात
धर्मेंद्र प्रधान यांचा जन्म २६ जून १९६९ रोजी एका राजकीय कुटुंबात झाला. बालपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्यात सामील झाले होते. त्यांचे वडील देवेंद्र प्रधान हे डॉक्टर होते. तसेच ते भाजपाचे ओडिशातील एक अत्यंत महत्त्वाचे नेते होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजकारणाची सुरूवात विद्यार्थी चळवळीपासून झाली. १९८५ मध्ये ओडिशातील तालचेर कॉलेजमधील विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष होते. १९९३ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) ते राज्य (ओडिशा) सचिव झाले. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी ABVP चे राष्ट्रीय सचिव पद स्वीकारले होते.
प्रधान यांनी मानववंशशास्त्राचे (ॲन्थ्रॉपॉलॉजी) पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. भुवनेश्वर येथील उत्कल विद्यापीठात असताना त्यांनी १९९० मध्ये विद्यार्थी निवडणूक लढवली होती. त्यात अरूण साहू यांनी त्यांचा पराभव केला होता. अरूण साहू हे सध्या बिजू जनता दल पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत धर्मेंद्र प्रधान यांनी १९९८ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००० मध्ये ते पहिल्यांदा पल्लाहारा येथून विधानसभेत गेले. त्यावेळी भाजपा व बिजू जनता दलाचे युती सरकार ओडिशामध्ये होते. त्यावेळी त्यांना ओडिशा विधानसभेतील सर्वोत्तम आमदार असल्याचा पुरस्कार (उत्कलमणी गोपबंधू प्रतिभा सन्मान) मिळाला होता. भाजपामध्ये सक्रिय असताना प्रधान यांना २००१ मध्ये पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर २००२ मध्ये त्यांना युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव बनवण्यात आले. २००४ मध्ये धर्मेंद्र प्रधान भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते.
धर्मेंद्र प्रधान यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय
२००४ मध्ये धर्मेंद्र प्रधान ओडिशातील देवगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. २०१२ मध्ये प्रधान यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावेळी प्रधान यांनी उज्ज्वला योजना आणि एलपीजीशी संबंधित योजनांवर जवळून काम केले होते.
२०१४ मध्ये देशात भाजपाचा विस्तार होत असताना धर्मेंद्र प्रधान हे ओडिशातील एक महत्त्वाचे नेते म्हणून समोर आले. तसेच त्यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी थेट संबंध आहेत. त्यामुळे २०१८ मध्ये त्यांना पुन्हा एकदा पक्षाने राज्यसभेवर पाठवले. तसेच नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. धर्मेंद्र प्रधान यांना २०२१ मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री पद देण्यात आले. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संबलपूरमधून ते विजयी झाले. त्यानंतर त्यांच्याकडे असलेली केंद्रीय शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली होती.
धर्मेंद्र प्रधान हे अमित शाह, विनोद तावडेंचे निकटवर्तीय
ओडिशामध्ये भाजपाचा संघटनात्मक पाया मजबूत करण्यात धर्मेंद्र प्रधान यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी ओडिशामध्ये भाजपाचे संघटन उभे केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या रणनीतीमुळे भाजपाला २०१७ मध्ये ओडिशात पंचायत निवडणुकांमध्ये यश मिळाले. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आठ जागा जिंकता आल्या. २०२४ मध्ये ओडिशात भाजपाने बिजू जनता दलाचा पराभव करून सरकार स्थापन केले. धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या संघटनात्मक कौशल्यांसाठी ओळखले जातात. प्रधान हे अमित शाह, विनोद तावडे आणि भूपेंद्र यादव यांचे निकटवर्तीय आहेत.
