महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : मुंबई महापालिकेने अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडीओ आपल्या समाजमाध्यमांवरील खात्यावरून हटवल्याने भाजपा-शिंदे गटात नवा वाद उफाळून आला… देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची टीका अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली… भाजपाला महाराष्ट्राची चिंता असती तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली नसती, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी भाजपाच्या टीकेला दिले… शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यास मायक्रो फायनान्स कंपन्यांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला… आशुतोष रांका यांना पाकिस्तानातून आणि अभिजीत दिपकेंना विदेशातून पैसे मिळाल्याचा सनसनाटी आरोप भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून भाजपा-शिंदे गटात जुंपली
मुंबई महापालिकेने अभिनेत्री दिया मिर्झाचा दिवाळी प्रदूषणाबाबत जनजागृतीचा संदेश देणारा व्हिडिओ आपल्या समाजमाध्यमांवरून हटवला. या प्रकरणावरून भाजपा आणि शिंदे गटात नवा वाद उफाळून आला. दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करा, अशी मागणी शिंदेसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी केली. तसेच सणासुदीच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करू नका, अशा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. दिवाळीच्या तोंडावर मुंबई महापालिकेकडून प्रदूषण मुक्त मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत दिया मिर्झाचा एक व्हिडिओ महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. त्यावर भाजपाचे नेते अमित साटम यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर महापालिकेने दिया मिर्झाचा व्हिडीओ तातडीने डिलिट केला. दुसरीकडे महापौर रितू तावडे यांनी तर जाहीर पत्रकार परिषद घेऊन दिया मिर्झा हिंदुविरोधी असल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्या या टीकेनंतर दियाचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करावा आणि सणासुदीच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करू नये, असे उपमहापौर घाडी म्हणाले. महायुतीतील दोन मित्रपक्षांतील या वादाची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.
देवेंद्रजींना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातंय : अमृता फडणवीस
‘राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, पक्षांतर्गत वाद आणि पदवीधर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजींना विरोधकांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, निवडणूक आयोगाची प्रक्रिया, महिला सक्षमीकरण आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून पाच हजार रुपयांची मदत दिली जात असली, तरी त्यापलीकडेही अधिक मदतीची गरज आहे, असे अमृता म्हणाल्या. ‘निवडणूक आयोगाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. मतदार याद्यांमधील नावांमध्ये दुरुस्ती, नवीन नावांचा समावेश आहे. त्यामुळे विरोधकांनी प्रत्येक प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याऐवजी जागरूक नागरिक म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सत्ताधारी पक्षात सर्व काही सुरळीत सुरू असून मुख्यमंत्र्यांना अस्थिर करण्याचा कोणताही प्रयत्न होत नसल्याचेही अमृता यांनी स्पष्ट केले.
खासदार संजय राऊत यांचे भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘जन महाभियोग’ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. या आंदोलनात विरोधी पक्षांतील अनेक खासदारांची उपस्थिती होती. यादरम्यान इंडिया आघाडीच्या आंदोलनात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलू दिले नाही, असा टोला भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपाने महाराष्ट्राची अजिबात चिंता करू नये. त्यांना जर महाराष्ट्राची खरंच चिंता असती तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडलीच नसती, असा पलटवार राऊत यांनी केला. मोर्चाला आलेली लोक सकाळी ८ पासून एकाच ठिकाणी बसून होते. त्यातच साऊंड सिस्टिममध्ये वारंवार व्यत्यय येत होता. त्यामुळे फक्त राहुल गांधी यांनी भाषण करून आंदोलनाचा समारोप करावा, अशी सर्वांची इच्छा होती, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा
कर्जवसुलीच्या बाबतीत शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यास मायक्रो फायनान्स कंपन्यांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. शिंदे आज नांदेड दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते वाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आणि शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ही तात्पुरती तत्काळ मदत असून या नंतर भरीव मदत केली जाईल. विरोधकांनी पसरवलेल्या खोट्या नरेटिव्ह आणि भुलथापांना जनता आता बळी पडणार नाही. महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे आणि कष्टकऱ्यांचे सरकार असून त्याला विकासाच्या कामांतूनच चोख उत्तर दिले जाईल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
“आशुतोष रांकाला पाकिस्तानातून पैसा मिळाला”
आशुतोष रांका यांना पाकिस्तानातून आणि अभिजीत दिपकेंना विदेशातून पैसे मिळाल्याचा सनसनाटी आरोप भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेतून केला. विदेशात राहणारे भारतीय नागरिक भारतात करमुक्त व्याज मिळवण्यासाठी एफसीआर खाती उघडतात. अनेक संस्था या एफसीआरच्या लाभार्थी आहे. सीजेपीचे अभिजीत दीपके यांनाही विदेशी मदत होत आहे. त्याचवेळी ऑपरेशन सिंदूरविरोधात जनमत तयार करण्यासाठी दीपके यांचे सहकारी आशुतोष रांका यांना पाकिस्तानच्या सानिया निसारकडून पैसे मिळाले, असा आरोप शुक्ला यांनी केला. देशात अराजकता परसरविण्यासाठी नेहा बोरा, ध्रुव राठी काम करीत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. रविवारी रामलिला मैदानावरील कॉंग्रेस नेते राहुललिला फ्लॉप ठरल्याचा दावाही शुक्ला यांनी केला. विरोधकांनी या आंदोलनात १ लाख लोक आल्याचा दावा केला. प्रत्यक्षात मात्र २० ते २५ हजार नागरिक यात सहभागी होते. त्यातही एसआयआरद्वारे नावे वगळण्यात आलेले कुणीही नव्हते. केवळ काँग्रेसचेच कार्यकर्ते होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
