ठाणे : भिवंडीच्या जागेवर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने केलेला दावा आणि पक्षातील नेत्यांसोबत सुरू असलेले शीतयुद्ध यातूनच राज्यमंत्री कपिल पाटील यांना यंदाची लोकसभेची निवडणूक सोपी नसल्याचे चित्र होते. परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जागा गेल्याने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असतानाच त्यात आता भिवंडी पूर्वतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील घडामोडी पाहता कपिल पाटील यांच्यासाठी अवघड वाटणारी ही निवडणूक आता त्यांच्या पथ्यावर पडते की काय, असे चित्र दिसून येत आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदारसंघांचा समावेश आहे. आगरी, कुणबी, आदिवासी आणि मुस्लिम अशा मतदारांचा भारणा असलेल्या हा मतदारसंघ आहे. २०१४ पासून या मतदारसंघातून भाजपचे खासदार कपिल पाटील हे निवडून येत आहेत. यंदाही त्यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. परंतु मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे सातत्याने समोर येत असून कथोरे हे पाटील यांना निवडणुकीत मदत करणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचेही समोर आले होते. तसेच मध्यंतरी शिंदेच्या सेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन कपिल पाटील यांच्यावर आरोप केले होते. भिवंडी मतदारसंघ शिवसेनेलाच द्यावा अन्यथा आम्ही आगामी निवडणुकीमध्ये भाजपा उमेदवाराचे काम करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. यामुळे यंदाची निवडणूक पाटील यांच्यासाठी सोपी वाटत नव्हती. परंतु अवघड वाटणारी ही निवडणूक आता मविआतील घडामोडींमुळे कपिल पाटील यांच्यासाठी सोपी होताना दिसत आहे.

हेही वाचा – हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय?

भिवंडी मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. पण, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला गेल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले. यातूनच पदाधिकाऱ्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला होता. पण, हा प्रस्ताव वरिष्ठांनी अमान्य केल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. तर, काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्यासह जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे इच्छुक होते. त्यापैकी सांबरे यांनी जिजाऊ विकास पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची घोषणा केली. असे असतानाच भिवंडी पूर्वतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे राजीनामा दिला आहे.

हेही वाचा – तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख हे आमदार असून त्यांचा मतदारसंघात तगडा जनसंपर्क आहे. समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभा निवडणुकीत आमदार रईस शेख यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. परंतु महाविकास आघाडीला त्यांची साथ मिळत नसल्याच्या कारणावरून त्यांचे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासोबत वाद झाले आणि यातूनच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. रईस शेख हे अपक्ष निवडणूक लढवतील किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा रंगली. एकूणच मविआतील या सर्व घडामोडी पाहता ही निवडणूक कपिल पाटील यांच्या पथ्यावर पडते की काय, असे चित्र सध्या दिसून येत आहे.